Delhi Pollution: दिल्लीत वाढत्या प्रदूषणामुळे एक आठवडा शाळा बंद, सरकारी काम वर्क फ्रॉम होम तर बांधकामंही थांबवण्याचा निर्णय
Delhi Air Pollution : वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत तातडीच्या उपाय योजना जाहीर करण्यात आल्या आहेत.
नवी दिल्ली : दिल्लीमधील वाढत्या प्रदूषणाच्या पार्श्वभूमीवर केजरीवाल सरकारनं कठोर निर्णय घ्यायला सुरुवात केली आहे. त्यानुसार सोमवारपासून शाळा एका आठवड्यासाठी बंद राहणार आहेत. या काळात ऑनलाईन शिक्षण सुरूच राहणार आहे. तसंच सरकारी कार्यालयं देखील बंद राहणार असून सर्वांना वर्क फ्रॉम होम करण्याचे आदेश देण्यात आले आहेत.
वाढत्या प्रदूषणामुळे दिल्लीत तातडीच्या उपाय योजना जाहीर करण्यात आल्या आहेत. खाजगी कार्यालयांसाठीही आवाहन करणारी नियमावली जाहीर करण्यात आली आहे. तसेच 14 ते 17 नोव्हेंबर हे चार दिवस दिल्लीतली बांधकामाची कामेही बंद राहणार आहे.
दिल्लीत प्रदूषण नियंत्रण करण्यासाठी संपूर्ण लॉकडाऊन करण्याची चर्चा सुरू होती. मात्र सर्व विभागासोबत चर्चा झाल्यानंतरच या पर्यायाचा विचार होईल असं अरविंद केजरीवाला यांनी स्पष्ट केले आहे. दिल्लीत ऑक्टोबर महिन्यापासून हवेची प्रदूषण पातळी वाढायला लागली आहे. आसपासच्या राज्यांमध्ये शेत जाळण्याच्या प्रकारातून हे प्रदूषण होत असल्याचं समोर आलंय. सध्य प्रदूषणामुळे दिल्लीत आणीबाणीची स्थिती निर्माण झाली आहे.
कोरोना संकटात दिल्लीत प्रदूषणाची पातळी वाढली आहे. दिल्लीत काल हवेचा गुणवत्ता निर्देशांक सरासरी 462 इतका नोंदवला गेला. हाच निर्देशांक आज 550 इतका होण्याची शक्यता आहे. येत्या तीन दिवसांत प्रदूषणाची पातळी आणखी गंभीर होण्याची भीती व्यक्त होतेय. तज्ज्ञांच्या अंदाजानुसार दिल्लीतील हवा गुणवत्ता निर्देशांक सहाशेपार जाण्याची शक्यता आहे. वाढत्या प्रदूषणामुळे डोळ्यांमध्ये जळजळ आणि श्वसनाचा त्रास होत असल्याच्या तक्रारी इथले नागरिक करतायत. त्यातच पंजाब, हरियाणात पराली जाळल्याने प्रदूषणाचा धोका वाढत असल्याचं बोललं जातंय.
संबंधित बातम्या :
Mumbai Pollution : मुंबई दिवाळीतील ध्वनी प्रदूषणाच्या पातळीत यंदा किंचीत घट
जगातील 50 टक्के प्रदूषण आणि तापमान वाढीसाठी फक्त 'हे' पाच देश जबाबदार! भारताचाही समावेश
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोडी पाहा लाईव्ह - ABP Majha