सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin ला मंजूरी, जाणून घ्या दोन्ही लसींबाबत...
सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती. जाणून घ्या या दोन्ही लसींबाबत अधिक माहिती...
Corona Vaccine : ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया DCGI चे संचालक व्हीजी सोमाणी यांनी सीरमच्या covishield, भारत बायोटेकच्या Covaxin लसीला आपातकालीन वापरासाठी परवानगी दिली आहे. शनिवारीच कोविशिल्ड आणि कोवॅक्सिन या लसींना तज्ज्ञ समितीनं मान्यता दिली होती. ज्यानंतर ड्रग कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया अर्थात DCGI कडून आज परवानगी मिळाली आहे. ज्यानंतर देशभरातील आरोग्य यंत्रणांना धीर मिळाला आणि देशवासियांना मोठा दिलासा मिळाला आहे. या घोषणेनंतर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी संपूर्ण देशवासियांचं अभिनंदन केलं आहे.
सीरमची कोविशिल्ड सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच!
सीरम इन्स्टिट्यूटच्या कोविशिल्ड लसीला आज आपातकालीन वापरासाठी मंजूरी मिळाली. कोविशिल्ड लस वापरासाठी 23 हजार परदेशी नागरिकांवरचा क्लिनिकल डेटा प्राथमिक टप्प्यात सादर करण्यात आला. त्यानंतर दुसऱ्या-तिसऱ्या क्लिनिकल फेजमध्ये देशात 1600 लोकांवर चाचणी करण्यात आली. ही लस 70.42 टक्के प्रभावी असल्याचा दावा करण्यात आला आहे. सीरम इन्स्टिट्यूटमध्ये आतापर्यंत 4 कोटी डोसची निर्मिती झाली आहे. सिरम इन्स्टीट्यूटने ऑक्सफर्ड-अस्त्राझेनेकासोबत करार केला आहे. सर्व सामान्य जनतेला परवडेल अशीच लशीची किंमत असणार आहे. जुलै 2021 पर्यंत 30 ते 40 कोटी डोस उपलब्ध करणार असंही पुनावाला यांनी स्पष्ट केलं. कोरोनावरील लसीवर संशोधन करणाऱ्या ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांना एप्रिल महिन्यात प्राथमिक यश मिळाल्यावर लगेच त्या फॉर्म्युलाचा उपयोग करून सीरम इन्स्टिट्यूटने कोरोनावरील कोव्हीशील्ड या लसीचे डोस बनवणं सुरु केलं. कोरोना लसीच्या चाचण्या पूर्ण होण्याआधीच सीरम इन्स्टिट्यूटने लस निर्मिती सुरू करुन आणि त्यासाठी कोट्यवधी रुपयांची गुंतवणूक करुन एक प्रकारे जुगार खेळला होता. ऑक्स्फर्ड विद्यापीठाच्या शास्त्रज्ञांकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीच्या चाचण्या यशस्वी होत गेल्या आणि सीरम इन्स्टिट्यूटकडे सगळ्यांच्या नजरा लागल्या. सीरम इन्स्टिट्यूटचा कारभार मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून आता अदर पुनावाला पाहतात. सीरम इन्स्टिट्यूटकडून तयार करण्यात येत असलेल्या लसीपैकी नव्वद टक्के लस ही सुरुवातीला भारतीय लोकांना दिली जाईल असं अदर पुनावाला यांनी जाहीर केलंय. ही एक लस सरकारला अडीचशे रुपयांना खरेदी करावी लागेल, असंही त्यांनी सांगितलं आहे.
COVISHIELD लसीला देशात परवानगी मिळताच पूनावालांचं आणखी एक सूचक ट्विट
भारत बायोटेकची लस पूर्णपणे स्वदेशी
भारत बायोटेकची लस पूर्णपणे स्वदेशी आहे. भारत बायोटेकच्या स्वदेशी कोवॅक्सिन लसीलाही आज आपातकालीन वापरासाठी मंजूरी मिळाली. उंदीर, ससा यासारख्या प्राण्यांवर लसीची प्राथमिक चाचणी केली. पहिल्या आणि दुसऱ्या क्लीनिकल फेजमध्ये 800 जणांवर चाचणी करण्यात आली. तिसऱ्या टप्प्यासाठी 22,500 लोकांची आतापर्यंत चाचणी झाली आहे. देशात आपत्कालीन स्थितीत मर्यादित वापरासाठी परवानगी मिळालेली ही दुसरी लस आहे. भारत बायोटेकने कोवॅक्सिनच्या आपत्कालीन वापरासाठी केंद्र सरकारकडे परवानगी मागितली आहे. भारत बायोटेकच्या वतीने सात डिसेंबर रोजी डीसीजीआयकडे परवानगी मागण्यासाठीचा अर्ज दाखल करण्यात आला होता. भारतातील कोरोनावर तयार होणारी पहिली लस कोवॅक्सिन ही किमान 60 टक्के प्रभावी असेल असा दावा भारत बायोटेकनं केला होता.
कोरोना लसींच्या मंजूरीनंतर पंतप्रधान मोदी म्हणाले, 'अभिनंदन भारत, हा निर्णायक टप्पा!'
सिरम इन्स्टिट्यूट भारत बायोटेक आणि कॅडीला या तीनही लसी 2 ते 8 डिग्री सेल्सिअसमध्ये साठवल्या जाऊ शकतात. म्हणजे आपल्या घरातील रेफ्रिजरेटरमध्ये देखील या लसी साठवल्या जाऊ शकतात. अमेरिकन Pfizer लस प्रदीर्घकाळ टिकवायची असेल तर -70 डिग्री सेल्सिअस तापमान लागते. 2 ते 8 डिग्री सेल्सिअस तापमानात Pfizer लस केवळ पाच दिवस टिकू शकते.