Vibhuti Patel : 15 दिवसांचा पगार मागितला, दलित युवकाला बेदम मारहाण; कोट्याधीश विभूती पटेलसह 6 जणांवर गुन्हा दाखल
Dalit Youth Beaten In Gujarat : 15 दिवसांचा पगार मागितला म्हणून दलित युवकाच्या तोंडात पादत्राणे कोंबत बेदम मारहाण करण्यात आली असल्याची धक्कादायक घटना घडली आहे.
अहमदाबाद : गुजरातमधील मोरबी (Morbi) जिल्ह्यात एका दलित तरुणाला मारहाण झाल्याची घटना समोर आली आहे. सोशल मीडियावर चर्चेत असलेल्या उद्योजक विभूती पटेल (Vibhuti Patel) उर्फ राणी बा (राणीबा) हिच्यावर दलित तरुणाला मारहाण केल्याचा आरोप करण्यात आला आहे. हा पीडित तरुण उर्वरीत पगार घेण्यासाठी राणीबा इंडस्ट्रीजमध्ये गेले असता अमानुष मारहाण झाली असल्याचे सांगण्यात येत आहे. तरूणाच्या तोंडात 12 जणांनी जोडा घातला आणि बेल्टने मारहाण केल्याचा आरोप आहे. ही घटना उघडकीस आल्यानंतर राणी बा इंडस्ट्रीजच्या अध्यक्ष आणि संस्थापक विभूती पटेल फरार झाल्या आहेत. तरुणाच्या तक्रारीवरून मोरबी पोलिसांनी विभूती पटेलसह सहा जणांविरुद्ध ए डिव्हिजन पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. विभूती पटेलच्या इन्स्टाग्रामवरील फोटोमध्ये तिने स्वतःला राणीबा म्हणून जाहीर केले आहे.
15 दिवसांचा पगात होता शिल्लक
'नवभारत टाइम्स डॉट कॉम'ने याबाबतचे वृत्त दिले आहे. मोरबी ए डिव्हिजन पोलीस ठाण्यात दिलेल्या तक्रारीनुसार, निलेश किशोरभाई दलसानिया असे या घटनेतील पीडित तरुणाचे नाव आहे. ते राणीबा इंडस्ट्रीजच्या निर्यात विभागात 2 ऑक्टोबरपर्यंत कार्यरत होते. काही कारणास्तव त्याने 18 ऑक्टोबर रोजी कामावर येण्यास नकार दिला. यानंतरही काही अडचण आली नाही, पण जेव्हा कंपनीकडून पगार आला नाही तेव्हा त्याने आपल्या शिल्लक पगारासाठी फोन केला. त्यावेळी त्याला ऑफिसमध्ये येऊन पगार घेऊन जाण्यास सांगितले.
त्यानंतर हा तरुण आपल्या एका शेजाऱ्यासोबत कंपनीमध्ये गेला. त्यावेळी त्याचे केस पकडून मारहाण केल्याचा आरोप आहे. त्याला बेदम मारहाण होत असताना त्याच्या तोंडात पादत्राणांचे जोडे कोंबले गेले. तेथे उपस्थित लोकांनी मारहाण करुन घटनास्थळावरून पळ काढला असल्याचे तक्रारीत म्हटले. तक्रारीत विभूती पटलेने मारहाण केल्याचा आरोपही करण्यात आला आहे.
जखमी तरुण रुग्णालयात दाखल
पोलिसांनी तरुणाला मोरबी येथील शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. निलेशने मोरबी ए डिव्हिजन पोलिसात विभूती पटेल उर्फ राणीबा याच्यासह सहा जणांविरुद्ध तक्रार दाखल केली. आता पोलिसांनी सर्व आरोपींविरुद्ध भादंविच्या 323, 504, 506 आदी कलमांखाली जातीय अत्याचार प्रतिबंधक कायद्याअंतर्गतही गुन्हा दाखल केला आहे.
गुन्हा दाखल झाल्यानंतर विभूती पटेल फरार असल्याचे सांगण्यात येत आहे. सोशल मीडियावर उपलब्ध असलेल्या व्हिडिओंमध्ये विभूती पटेल स्वत:ला लेडी डॉन असे म्हणवून घेते. या घटनेबाबत राणीबा इंडस्ट्रीजकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.