(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Cyclone Yaas : 'यास' चक्रीवादळाची भीषणता वाढली, येत्या 24 तासात ओडिशा-बंगालच्या किनारी धडकणार
Cyclone Yaas : ओडिशाच्या पराद्वीप आणि बंगालच्या दीघा बेटाच्या दरम्यान असलेलं हे चक्रीवादळ आता ईशान्येकडं सरकत आहे आणि मंगळवारी ते ओडिशा आणि पश्चिम बंगालच्या किनाऱ्याला धडकणार आहे.
कोलकाता : पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यानं 'यास' चक्रीवादळ निर्माण झालं असून त्याची तीव्रता आता वाढली आहे. येत्या 24 तासात यास हे ओडिशा-बंगालच्या किनारी धडकणार असून त्यामुळे या भागात मोठं नुकसान होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.
हवामान खात्याच्या एका अंदाजानुसार, यास चक्रीवादळाची तीव्रता वाढत असून 155-165 किमी वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे. सोमवारी सकाळी ओडिशाच्या पराद्वीप आणि बंगालच्या दीघा बेटाच्या दरम्यान असलेलं हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकत आहे आणि मंगळवारी या दोन राज्यांच्या किनारी धडकणार आहे. किनारी प्रदेशाकडे येताना ते अधिक भीषण होणार असल्याने सर्वत्र सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
या चक्रीवादळावर नजर ठेवण्यासाठी पश्चिम बंगालच्या सरकारने राज्य सचिवालयात एक नियंत्रण कक्ष उघडले आहे. या राज्याच्या किनारी जिल्ह्यांत मेदिनीपुर, दक्षिण आणि उत्तर 24 परगणा, हावडा, हुगळी या प्रदेशात मध्यम स्वरुपाच्या पावसाची शक्यता आहे.
ओडिशा सरकारने या चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी बचाव पथकं तयार ठेवली आहेत. संवेदनशील प्रदेशातून नागरिकांना सुरक्षित स्थळी हालवण्यास सुरुवात करण्यात आली आहे.
या दोन राज्यांमध्ये एनडीआरएफचे 109 पथकं तैनात आहेत. तसेच आंध्र, तामिळनाडू अंदमान निकोबार या ठिकाणीही सतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे. यास या चक्रीवादळाच्या संभाव्यतेमुळे या काळात कोणत्याही मच्छीमारांनी समुद्रात जाऊ नये तसेच किनारी भागातही राहू नये असा इशारा देण्यात आला आहे.
हवामान विभागाने या आधी सांगितलं होतं की, यास हे चक्रीवादळ ईशान्येकडे सरकणार आहे आणि 26 मे पर्यंत ओडिशा आणि बंगालच्या किनारपट्टीपर्यंत पोहोचण्याची शक्यता आहे. या दरम्यान, ओडिशा, पश्चिम बंगाल, आसाम आणि मेघालयामध्ये 25 मे पासून हलक्या पावसाला सुरुवात होणार आहे. त्यानंतर या पावसाची तीव्रता वाढण्याची शक्यताही वर्तवली आहे. 22 मे रोजी पूर्व-मध्य बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने या चक्रीवादळाची निर्मिती झाली आहे.
पश्चिम बंगालमध्ये अम्फान चक्रीवादळ येऊन गेलं आहे. त्यामध्ये अनेकांना आपला जीव गमवावा लागला होता. त्या वादळापेक्षाही यास ची तीव्रता जास्त असल्याचं सांगण्यात येतंय. या चक्रीवादळाच्या पार्श्वभूमीवर बंगाल आणि ओडिशामध्ये हाय अलर्ट जारी करण्यात आला असून त्यासाठी आवश्यक ती तयारी करण्यात येत आहे.
महत्वाच्या बातम्या :