Cyclone Michaung : आज आंध्र प्रदेशात धडकणार मिचॉन्ग, चक्रीवादळानं दक्षिण भारताला झोडपलं; चेन्नईत पाच जणांचा मृत्यू
Heavy Rain News : आज मिचॉन्ग चक्रीवादळ आंध्र प्रदेशात धडकणार आहे. चेन्नई, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेश तसेच दक्षिण किनारपट्टी भागात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे.
Cyclone Update : मिचॉन्ग चक्रीवादळामुळे (Cyclone Michaung) देशभरात अनेक ठिकाणी मुसळधार पावसाची हजेरी (Rain Update) पाहायला मिळत आहे. चक्रीवादळ मिचॉन्गमुळे हवामान विभागाने (IMD) हलक्या गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह पावसाचा अलर्ट (Rain Alert) जारी केला आहे. चेन्नई (Channai), तामिळनाडू (Tamil Nadu) आणि आंध्र प्रदेश (Andhra Pradesh) तसेच दक्षिण किनारपट्टी भागात रविवारपासून मुसळधार पाऊस सुरु आहे. चेन्नई, तामिळनाडू आणि आंध्र प्रदेशमध्ये शाळा आणि महाविद्यालयांनाही सुट्टी देण्यात आली आहे. गेल्या 24 तासांच चेन्नईमध्ये अतिमुसळधार पाऊस झाला आहे.
आज आंध्र प्रदेशात धडकणार चक्रीवादळ
हवामान खात्याने (IMD) दिलेल्या माहितीनुसार , "मिचॉन्ग चक्रीवादळ गेल्या सहा तासांमध्ये सात किमी प्रतितास वेगाने उत्तर-वायव्य दिशेने सरकलं आहे. मध्यरात्री 2.30 वाजता चक्रीवादळ नेल्लोरच्या उत्तर-ईशान्येस सुमारे 20 किमी, चेन्नईच्या उत्तरेस 170 किमी, बापटलापासून 150 किमी दक्षिणेस आणि मछलीपट्टणमच्या 210 किमी दक्षिण-नैऋत्येस पोहोचलं. चक्रीवादळाचं तीव्र चक्रीवादळात रुपांतर झालं असून ते वेगाने उत्तरेकडे किनार्याजवळ सरकत आहे. आज दुपारपर्यंत चक्रीवादळ दक्षिण आंध्र प्रदेश किनार्यावर धडकण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाचा लँडफॉलचा धोका पाहता या भागात अलर्ट जारी करण्यात आला आहे.
चेन्नईमध्ये पाच जणांचा मृत्यू, विमानसेवा बंद
चेन्नईत चक्रीवादळामुळे विजेचा धक्का लागून आणि झाडं कोसळणे यासारख्या दुर्घटनांमुळे सोमवारी पाच जणांचा मृत्यू झाला आहे. मुसळधार पाऊस आणि पाणी साचल्याने निर्माण झालेल्या भीषण पूरसदृश परिस्थितीमुळे सोमवारी शहर आणि परिसरातील जनजीवन पूर्णपणे विस्कळीत झालं. चेन्नई विमानतळावरही पूरस्थिती निर्माण झाली होती. रनवे पाण्याखाली गेल्याने विमाने उड्डाणे रद्द करण्यात आली होती, तर काही विमाने दुसऱ्या मार्गाने वळवण्यात आली. मंगळवारी सकाळी 9 वाजेपर्यंत विमानसेवा बंद ठेवण्यात आली आहे.
तामिळनाडूमध्येही चक्रीवादळाचा कहर
'मिचॉन्ग' चक्रीवादळामुळे भारताच्या दक्षिण भागात विध्वंस सुरू आहे. चक्रीवादळाच्या तडाख्याने तामिळनाडूमध्ये दोन जणांचा मृत्यू झाला आहे तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. अनेक झाडे उन्मळून पडली आहेत. कांचीपुरममध्येही जोरदार पाऊस सुरु आहे. जोरदार पावसामुळे रस्त्यांवर पाणी साचलं आहे. काही ठिकाणी रस्त्यांवर वाहने पाण्याखाली गेली आहेत. शहरात मुसळधार पावसामुळे पाणी साचल्यामुळे पीरकंकरनई आणि पेरुंगलाथूर जवळील तांबरम भागात सुमारे 15 जण अडकले होते, त्यांन वाचवण्यात एनडीआरएफ पथकाला यश आलं आहे. चेन्नई, आंध्र प्रदेश आणि तामिळनाडूमध्ये राष्ट्रीय आपत्ती प्रतिसाद दल (NDRF) च्या पथकं तैनात करण्यात आली आहे.