Cyber Fraud: ऑनलाइन शॉपिंग करत असाल तर 'या' गोष्टींची घ्या विशेष काळजी, नाहीतर बँक खाते होईल रिकामे
देशाच्या वाढत्या डिजिटायझेशनच्या (Digitalisation) युगात लोकांचे जीवन सोपे झाले आहे. व्यस्त जीवन शैलीमुळे आजकाल लोकांकडे वेळ कमी आहे.
देशाच्या वाढत्या डिजिटायझेशनच्या (Digitalisation) युगात लोकांचे जीवन सोपे झाले आहे. व्यस्त जीवन शैलीमुळे आजकाल लोकांकडे वेळ कमी आहे. अशा परिस्थितीत गेल्या काही वर्षांत ऑनलाइन शॉपिंगचा (Online Shopping) ट्रेंड झपाट्याने वाढला आहे. आपण कोणत्याही शॉपिंग वेबसाइटला भेट देऊन आपल्या आवडीची कोणतीही वस्तू सहज खरेदी करू शकता. परंतु, ऑनलाइन शॉपिंगच्या वाढत्या ट्रेंडमुळे सायबर फ्रॉडच्या (Cyber Fraud) घटनांमध्येही झपाट्याने वाढ होताना दिसत आहे. कोरोना महामारीच्या (Corona Pandemic) काळात या प्रकरणांमध्ये वाढ झाली आहे. होळीचा सण (Holi Festival 2022) आता काही दिवसांवर येऊन ठेपला आहे. अशातच लोक मोठ्या प्रमाणात ऑनलाइन शॉपिंग (Online Shopping Tips) करत आहेत. अशा स्थितीत सायबर फोर्डचे प्रमाण देखील वाढले आहे. यापासून तुम्ही स्वतःला कसं वाचू शकता, याबाबतच आम्ही तुम्हाला या बातमीच्या माध्यमातून सांगणार आहोत.
मोठ्या सवलतीच्या ऑफरपासून रहा सावध
अनेकवेळा सायबर गुन्हेगार महागड्या वस्तूंवर मोठ्या सवलतीच्या ऑफर देऊन ग्राहकांना लुबाडतात. अशा परिस्थितीत ग्राहक या ऑफर्सच्या लालसेत पडून मोठ्या सायबर गुन्ह्यांना बळी पडतात. लोकांना जाळ्यात अडकवण्यासाठी हे भामटे त्यांच्या ईमेल खात्यांवर फिशिंग लिंक पाठवून फसवतात. या क्लिक केल्यावर तुमची वैयक्तिक माहिती चोरीला जाते आणि तुमचे बँक खाते हॅक करून रिकामे केले जाते. यासोबतच ऑनलाइन शॉपिंग करताना वेबसाइट https:// ने सुरू होत आहे का ते पहा. अशी वेबसाइट सुरक्षित असते. तसेच एखादी वेबसाइट http:// ने सुरुवात होत असेल, तर ती असुरक्षित असून त्यावर चुकूनही क्लिक करू नका.
वैयक्तिक माहिती शेअर करू नका
ऑनलाइन खरेदी करताना तुमची वैयक्तिक माहिती जसे की नेट बँकिंग पासवर्ड, UPI पिन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड तपशील इत्यादीसारख्या बँकिंग तपशील कधीही शेअर करू नका. कोणत्याही शॉपिंग वेबसाइटवर खरेदी करताना विशेष काळजी घ्या की, कोणत्याही कंपनीची ग्राहक सेवा तुम्हाला कधीही बँकिंग तपशील मागत नाही. अशातच वैयक्तिक माहिती मागणाऱ्यांपासून सावध रहा.