COVID19 Cases Update : देशात दैनंदिन कोरोनाबाधितांमध्ये घट; तर रिकव्हरी रेट 98.22 टक्क्यांवर
COVID19 Cases Update : आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 15054 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. तर 12,885 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे.
COVID19 Cases Update : भारतात गेल्या 24 तासांत 12,885 नव्या कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. तर 24 तासांत 461 रुग्णांनी जीव गमावला आहे. आरोग्य मंत्रालयानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, गेल्या 24 तासांत 15054 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. अशातच सक्रिय रुग्णांची संख्या दीड लाखांहून कमी आहे. देशात कोरोना लसीकरण मोहीमही वेगानं सुरु आहे. तसेच, याचा परिणाम दैनंदिन कोरोनाबाधितांच्या आकड्यावर काही प्रमाणात दिसत आहे. देशातील कोरोनाबाधितांच्या संख्येत घट होत असली, तर धोका मात्र अद्याप टळलेला नाही.
प्रशासनानं जारी केलेल्या आकडेवारीनुसार, देशात आतापर्यंत 1,07,63,14,440 लसीकरण झालं आहे. अशातच गेल्या 24 तासांत 30,90,920 लोकांना लस देण्यात आली आहे. आतापर्यंत 3,36,97,740 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. गेल्या 24 तासांत दैनंदिन रुग्णांहून कोरोनामुक्त झालेल्यांचा आकडा अधिक आहे. सध्या देशाचा रिकव्हरी रेट 98.22 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईत आज 330 रुग्णांची भर तर 5 जणांचा मृत्यू
गेल्या काही दिवसांचा विचार करता मुंबईतील कोरोना रुग्णसंख्येमध्ये घट झाल्याचं स्पष्ट झालं आहे. गेल्या 24 तासात मुंबईत 330 नव्या रुग्णांची नोंद झाली आहे तर 5 रुग्णांना आपला जीव गमवावा लागला आहे. गेल्या 24 तासात 378 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत. शहराचा रिकव्हरी रेट हा 97 टक्क्यांवर पोहोचला आहे.
मुंबईत सध्या 3386 इतकी सक्रिय रुग्णसंख्या आहे. शहरात आतापर्यंत 7,34,590 रुग्णं कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईतील रुग्णसंख्या दुप्पट होण्याचा कालावधी 1642 दिवसांवर पोहोचला आहे. तसेच शहरातील कोरोना वाढीचा दर हा 0.04 टक्के इतका झाला आहे.
मुंबईत दिवाळीत तीन दिवस लसीकरण बंद
गुरुवार दिनांक 4 नोव्हेंबर ते रविवार दिनांक 7 नोव्हेंबर 2021 असे चार दिवस मुंबईतील शासकीय व महानगरपालिका केंद्रांवर कोविड लसीकरण बंद राहणार आहे. त्यानंतर सोमवार दिनांक 8 नोव्हेंबर 2021 रोजी लसीकरण पूर्ववत सुरु करण्यात येईल अशी माहिती प्रशासनाकडून देण्यात येतेय.
दिवाळीत पुण्यात तीन दिवस लसीकरण बंद
पुण्यात तीन दिवस लसीकरण (Pune Vaccination) बंद राहणार आहे. पुण्यातील सरकारी रुग्णालयामध्ये गुरुवार, शनिवार आणि रविवारी म्हणजेच, लसीकरण होणार नाही. शुक्रवारी केवळ सकाळच्या सत्रात लसीकरण करण्यात येणार आहे. दिवाळीमध्ये लसीकरणाला नागरिकांचा प्रतिसाद मिळत नाही. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय महापालिकेनं घेतला आहे. लसीचा पहिला डोस 18 वर्षांवरील 100 टक्के पुणेकरांनी घेतला आहे. आता नागरिकांनी दुसरा डोस घ्यावा यासाठी नागरिकांना प्रोत्साहित करण्यात येणार आहे.
पुणेकरांचा लसीकरणाला उत्तम प्रतिसाद देत असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईच्या तुलनेत पुण्यातील लसीकरण वेगानं सुरु आहे. अशातच पुण्यात 18 वर्षांवरील 100 टक्के लोकांचं लसीकरण पूर्ण झालं आहे. दरम्यान, आता सणासुदीच्या दिवसात लोक कामांमध्ये गुंतलेली असतात. त्यामुळे लसीकरण बंद ठेवण्याचा निर्णय प्रशासनानं घेतला आहे. तसेच दिवाळी पाडव्याच्या दिवशी लसीकरण केंद्राचे कामकाज अर्धा दिवस सुरू राहील, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.
पुण्यात गेल्या दोन महिन्यांपासून कोरोनालसीकरणाचा वेग वाढला आहे. पण, दिवाळीमुळे केंद्रावर येऊन लस घेणाऱ्या नागरिकांची संख्या कमी झाली आहे. त्यामुळे येत्या उद्या (गुरुवारी) नरक चतुर्दशी आणि लक्ष्मीपूजन असल्यानं केंद्रावर लसीकरण होणार नाही. शुक्रवारी सकाळच्या सत्रात हे लसीकरण होईल. दुपारनंतर केंद्र बंद राहणार असल्यामुळे त्यानंतर येत्या शनिवारी आणि रविवारीसुद्धा लसीकरण केंद्र बंद ठेवण्यात येणार आहे, अशी माहिती पुणे महापालिकेचे लसीकरण अधिकारी डॉ. सूर्यकांत देवकर यांनी दिली आहे.