COVAXIN : कोवॅक्सिनच्या लसीकरणानंतर साईड इफेक्ट झाला तर भारत बायोटेक देणार भरपाई
Covaxin लस अद्याप क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात असल्याने लसीचे गंभीर दुष्परिणाम झाल्यास बीबीआयएलकडून भरपाई दिली जाईल, अशी घोषणा भारत बायोटेक कंपनीनं केली आहे.
मुंबई : कोविड 19 चे तब्बल 55 लाख डोस भारत बायोटेक ही कंपनी वितरित करणार आहे. ही लस घेतल्यानंतर एखाद्याला त्रास झाल्यास त्या व्यक्तीला भारत बायोटेक कंपनी लसीची भरपाई देणार आहे. लस टोचून घेणाऱ्यांच्या एका फॉर्मवर सह्या घेतल्या जातील, ज्यावर "कोणतेही प्रतिकूल किंवा गंभीर प्रतिकूल परिणाम झाल्यास तुम्हाला शासकीय अधिकृत केंद्रात किंवा हॉस्पिटलमध्ये उपचारासाठी वैद्यकीय मान्यता दिली जाईल" असा उल्लेख केलेला आहे. सामंजस्य करारानुसार, जर या लसीचे गंभीर दुष्परिणाम झाल्याचं सिद्ध झालं तर बीबीआयएलकडून भरपाई दिली जाईल.
लस आली तरी सावध राहणं गरजेचं
लस उत्पादकांच्या मते ही लस वैद्यकीयदृष्ट्या प्रभावी आहे हे अद्याप निश्चित झालेलं नाही आणि अजून ही लस क्लिनिकल ट्रायलच्या तिसऱ्या टप्प्यात आहे, जिचा अभ्यास अजूनही सुरू आहे. लस जरी कोरोनाप्रतिबंधक असली तरी लस घेतल्यानंतरही स्वच्छता आणि आरोग्याच्या दृष्टीने योग्य ती काळजी घेणं आवश्यक आहेच.
भरपाई देणं ही कंपनीची जबाबदारी
तज्ज्ञांच्या मते ही लस अजूनही क्लिनिकल ट्रायलमध्ये असल्याने जर लस घेतल्यास त्याचा गंभीर दुष्परिणाम झाल्यास नुकसान भरपाई देण्याची जबाबदारी कंपनीची आहे.
मुख्यमंत्री म्हणाले, सावधगिरीमध्ये हलगर्जीपणा नको.. राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील बीकेसी येथे आयोजित करण्यात आलेल्या लसीकरण मोहिमेला उपस्थिती लावत लसीकरणाचा शुभारंभ केला. यावेळी लसीकरणाच्या रुपात आपण एक क्रांतीकारक पाऊल टाकत आहोत असं म्हणत त्यांनी एका नव्या आणि सकारात्मक उर्जेनं जनतेला संबोधित केलं.कोरोना काळात सुरुवातीच्या दिवसांमध्ये या संसर्गानं ज्या प्रकारे थैमान घातलं होतं, ते दिवस आठवताना या दिवसांमध्ये रुग्णांची सेवा करणाऱ्या प्रत्येक कोविड योद्ध्याला मुख्यमंत्र्यांनी मानाचा मुजरा केला. कोरोना काळात मोलाचं सहकार्य देणाऱ्या टास्क फोर्स टीममधील डॉक्टरांचा उल्लेख मुख्यमंत्र्यांनी आरोग्य व्यवस्थेचा भक्कम आधार, म्हणून केला.
कोरोनाच्या सुरुवातीच्या दिवसांमध्ये परिस्थिती किती बिकट होती, हे सांगताना मुख्यमंत्र्यांनी लसीचा शुभारंभ झाल्याचा आनंद वयक्त केला. यावेळी संकट अजूनही टळलेलं नाही, असं म्हणत त्यांनी जनतेला सावधगिरीचा इशारा दिला. सध्या आपल्या हाताशी लस आली असली तरीही ती सर्वांपर्यंत पोहोचण्यासाठी काही दिवस आणि महिन्यांचा कालावधी लागणार असून, त्याचा प्रभावही किती दिवसांसाठी राहणार हेसुद्धा येत्या दिवसांतच स्पष्ट होणार असल्याचा मुद्दा मुख्यमंत्र्यांनी सर्वांपुढे स्पष्टपणे मांडला. कोरोनावरील प्रतिबंधात्मक लस मिळाली असली तरीही सर्वात उत्तम लस म्हणजे तोंडावर असणारा मास्क, असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी मास्कचं महत्त्वं पुन्हा एकदा पटवून देत मास्कला अंतर देणं योग्य नसल्याचं सांगितलं. पंतप्रधानांनी ज्याप्रमाणं लसीच्या वापरानंतरही मास्कच्या वापरावर भर दिला, त्याचप्रमाणं मुख्यमंत्र्यांनीही कोरोनाचं संकट टाळण्यासाठी मास्कच्या वापराला प्राधान्य दिलं.
देशातील पहिली लस सफाई कामगार मनीष यांना राजधानी दिल्लीतील एम्स हॉस्पिटलमध्ये देशातील कोरोनाची पहिली लस एका आरोग्य कर्मचाऱ्याला टोचली गेली. यावेळी केंद्रीय आरोग्यमंत्री डॉ हर्षवर्धन उपस्थित होते. सफाई कामगार असलेल्या मनीष यांनी लस घेतल्यानंतर सांगितलं की, माझा अनुभव खूप चांगला होता. लस घेताना मला काहीही अडचण आली नाही. लोकांनी घाबरुन जाऊ नये. माझ्या मनात जी भीती होती ती देखील निघून गेली आहे. सर्वांनी लस घ्यावी, असं मनीष कुमार यांनी म्हटलं.
दुसऱ्या टप्प्यात 30 कोटी लोकांना लस देण्याचा मानस इतिहासात कधीही अशाप्रकारचं आणि एवढ्या मोठ्या स्तरावर लसीकरण अभियान कधी झालेलं नाही. तीन कोटींपेक्षा कमी लोकसंख्या असलेले 100 पेक्षा जास्त देशत जगात आहेत. तर भारतात लसीकरणाच्या पहिल्या टप्प्यातच 3 कोटी लोकांना लस दिली जाणार आहे. दुसऱ्या टप्प्यात ही संख्या 30 कोटींवर नेण्याचा केंद्राचा मानस आहे.
विदेशी लसीच्या तुलनेत भारतीय लस स्वस्त भारतीय लस, विदेशी लसींच्या तुलनेत अतिशय स्वस्त असल्याचं पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सांगितलं. तसंच त्यांचा वापरही तितकाच सोपा असल्याची बाब त्यांनी अधोरेखित केली. यावेळी त्यांनी परदेशी आणि भारतीय लसींच्या बनावटीची तुलना केली. साठवणीपासून लसीच्या वाहतुकीपर्यंत देशातील भौगोलिक परिस्थितीलाही लक्षात घेण्यात आल्याचा मुद्दा यावेळी त्यांनी मांडला.