(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Covid-19 : कोविड-19 मधून बरे झालेल्यांना 'न्यूरोसायकियाट्रिक' होण्याची शक्यता अधिक, एका अभ्यासातून समोर
Covid-19 : एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोविडमधून बरे झालेल्या लोकांमध्ये न्यूरोसायकियाट्रिक रोगाचा उच्च धोका आढळून आला आहे.
Covid-19 : जग अजूनही कोविड-19 (Coronavirus) संसर्गाशी झुंज देत आहे. महामारी सुरू झाल्यापासून जगभरात सुमारे 600 दशलक्ष रुग्णसंख्या नोंदवली गेली आहेत. तसेच भविष्यात या गोष्टी आणखी गंभीर होऊ शकतात. एका नवीन अभ्यासात असे दिसून आले आहे की, एकदा कोविडमधून बरे झालेल्या लोकांमध्ये न्यूरोसायकियाट्रिक (neuropsychiatric) विकाराचा उच्च धोका आढळून आला आहे.
1.28 दशलक्ष लोकांच्या आरोग्याचे विश्लेषण
लॅन्सेट मानसोपचार जर्नलमध्ये प्रकाशित झालेल्या निष्कर्षांनुसार, कोविड-19 ग्रस्त लोकं निदानाच्या दोन वर्षानंतरही न्यूरोलॉजिकल डिमेंशिया आणि सायकोसिस आदी मानसिक स्थितीला बळी पडतात. ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या संशोधकांनी केलेल्या अभ्यासात 20 जानेवारी 2020 ते 13 एप्रिल 2022 दरम्यान कोविड-19 चे निदान झालेल्या सुमारे 1.28 दशलक्ष लोकांच्या आरोग्याचे विश्लेषण करण्यात आले. टीमने या डेटाची तुलना इतर श्वसन संक्रमण असलेल्या लोकांच्या समान संख्येशी केली.
न्यूरोलॉजिकल आणि मानसिक विकार आढळल्याचे समोर
अभ्यासात न्यूरोलॉजिकल आणि मानसिक विकार आढळल्याचे समोर आले. कोविड-19 नंतर प्रौढांमध्ये मूड डिसऑर्डर तसेच चिंतेचा धोका वाढला आहे, कोविडनंतर दोन महिन्यांत हे आजार बळावल्याचे समजले. मेंदूचे विकार, स्मृतिभ्रंश, मनोविकार, फीट या नावाने ओळखल्या जाणार्या संसर्गाची लागण झाल्याचे आढळले. संशोधकांनी अभ्यास केलेल्या रुग्णांचे तीन वयोगटात वर्गीकरण केले: 18 वर्षाखालील मुले, 18-64 वयोगटातील प्रौढ आणि 65 वर्षांपेक्षा जास्त वयाचे प्रौढ.
स्मृतिभ्रंशाच्या घटनांमध्ये वाढ
कोविड-19 ची लागण झालेल्या 64 वर्षांपेक्षा जास्त वयाच्या प्रौढांना इतर श्वसन संक्रमण असलेल्यांपेक्षा (12.3 टक्के) अधिक म्हणजेच (15.4 टक्के) धोका अनुभवला. त्याचप्रमाणे, कोविड-19 ची लागण झालेल्या त्याच वयोगटातील डिमेंशियाची शक्यता 1.2 टक्के जास्त होती. निद्रानाश, मनोविकार इत्यादींचे प्रमाणही संक्रमित वृद्ध प्रौढांमध्ये वाढल्याचे अभ्यासातून दिसून आले आहे. चिंताजनक बाब म्हणजे, कोविड-19 ची लागण झालेल्या मुलांना इतर श्वसन संक्रमण असलेल्या मुलांपेक्षा फीट येण्याची शक्यता जास्त असते. कोविड-19 असलेल्या मुलांना इतर श्वसन संक्रमण असलेल्या मुलांपेक्षा फीट येण्याचा धोका 2.6 टक्के असतो (1.3 टक्के).
अप्रत्यक्ष कारणांमुळे अशा आजारांमध्ये वाढ
इंडिया टुडेच्या डेटा इंटेलिजेंस युनिटशी बोलताना, एम्स नवी दिल्ली येथील मानसोपचार विभागाचे प्राध्यापक राजेश सागर म्हणाले, "भारतात कोविड-19 चे निदान झालेल्या रुग्णांमध्ये अशा प्रकारचे विकार आढळून आले आहेत, आणि अशा परिस्थितीचे प्रमाण जास्त होते, विशेषत: दुसऱ्या लाटेत कोविडने देशाला भयंकरपणे वेढले. ते पुढे म्हणाले की, कोविड-19 च्या थेट परिणामाव्यतिरिक्त, नोकरी गमावणे, आर्थिक संकट, शाळा बंद होणे इत्यादी अप्रत्यक्ष कारणांमुळे देखील अशा आजारांमध्ये वाढ झाली आहे.
प्रकारानुसार धोका
अभ्यासामध्ये कोविड-19 च्या विविध प्रकारांच्या उदयादरम्यान विकारांच्या जोखमीची तुलना केली गेली. डेल्टा आणि ओमिक्रॉन लहरी दरम्यान न्यूरोलॉजिकल आणि मानसिक परिणाम समान असल्याचे आढळले. अभ्यासात आढळल्याप्रमाणे कोविड-19 नंतर निदान झालेल्या नैराश्य आणि चिंता यासारखे विकार तसेच स्मृतिभ्रंश, आदी परिस्थिती कोविड-19 संसर्गानंतर दोन वर्षांनंतरही आढळण्याची शक्यता असते.
याआधीच्या अभ्यासातही हेच चित्र
मागील वर्षी याच ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटीच्या टीमने केलेल्या अभ्यासात असे दिसून आले आहे की, कोविड-19 ची लागण झालेल्या तीनपैकी एक व्यक्ती किंवा 33.62 टक्के लोकांना कोरोनाचा संसर्ग झाल्यानंतर सहा महिन्यांनी मूड डिसऑर्डर, स्ट्रोक किंवा स्मृतिभ्रंश झाला. अहवालात असेही अधोरेखित करण्यात आले आहे की, 12.84 टक्के किंवा कोविड-19-संक्रमित आठपैकी एकाला पॉझिटिव्ह चाचणी झाल्यानंतर सहा महिन्यांत पहिल्यांदा अशा प्रकारच्या विकारांचा अनुभव आला. लॅन्सेटमध्ये गेल्या वर्षी प्रकाशित झालेल्या एका अभ्यासात कोविड-19 मुळे जागतिक स्तरावर मेजर डिप्रेसिव्ह डिसऑर्डर आणि चिंता यांसारख्या आजारांमध्ये अनुक्रमे 28 टक्के आणि 26 टक्क्यांनी वाढ झाल्याचे दिसून आले. भारतासाठी, दोन्ही विकारांच्या घटनांमध्ये प्रत्येकी 35 टक्के वाढ होती, जी जागतिक सरासरीपेक्षा लक्षणीय आहे.