Coronavirus In India | भारतात कोरोनाचा उद्रेक का होतोय? केंद्र सरकारचे काही अनुमान
Coronavirus In India : देशात सध्या कोरोनाचा प्रसार हा गेल्या वर्षीच्या प्रसाराच्या किती तरी अधिक आहे. या वर्षी कोरोनाचा प्रसार इतक्या जलद का वाढला याची काही कारणे केंद्र सरकारने सांगितली आहेत.
Coronavirus : देशात कोरोना नियंत्रणात येतोय असं वाटत असतानाच पुन्हा एकदा कोरोनाची दुसरी लाट आल्याचं पहायला मिळतंय. देशात सातत्याने कोरोनाच्या रुग्णसंख्येत भर पडत आहे. सोमवारी एकाच दिवसात कोरोनाचे 96, 517 नवीन रुग्ण सापडले. त्याच्या आधी एक दिवस लाखाहून जास्त रुग्णसंख्येची भर पडली होती. सध्या एकूण कोरोना रुग्णांची संख्या एक कोटी 26 लाख 84 हजार 477 इतकी झाली आहे. देशातील कोरोनाच्या वाढत्या रुग्णसंख्येवर काय उपाय योजना करता येतील हे पाहण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी गेल्या आठवड्यात एक उच्च स्तरीय बैठक बोलवली होती. या बैठकीत देशात कोरोनाची संख्या का वाढतेय याची मिमांसा करण्यात आली.
देशात केवळ दहा राज्यात कोरोनाचे बहुतांश रुग्ण आढळतात. नागरिक कोरोनाच्या नियमावलीचे पालन करत नाहीत त्यामुळे देशातील कोरोनाच्या रुग्णसंख्येत पुन्हा एकदा वाढ झाल्याचं केंद्र सरकारचे स्पष्ट मत आहे.
मास्कचा वापर नाही
देशातील नागरिक मास्कचा वापर करत नाहीत असं लक्षात आलं आहे. तज्ज्ञांच्या मते, मास्कचा योग्य पद्धतीने वापर करणे हाच कोरोनावर नियंत्रण ठेवण्याचे पहिले पाऊल आहे. जागतिक आरोग्य संघटनेने मास्कचा योग्य पद्धतीने कसा वापर करायचा याची नियमावली सांगितली आहे. त्याच्या मते, मास्कचा वापर करण्याआधी पहिला हात स्वच्छ धूणे गरजेचं आहे तसेच ते सॅनिटाईज करणेही गरजेचं आहे. मास्क शक्यतो डबल लेयर असेल तर चांगलं आहे. मास्कमुळे तुमचे नाक, तोंड आणि त्याच्या खालच्या गळ्यापर्यंतचा भाग झाकला जातोय का हे पाहणे आवश्यक आहे.
सोशल डिस्टन्सिंगचे पालन नाही
केंद्र सरकारने सांगितलेले 'दो गज की दुरी' हा नियम बहुतांश नागरिक पाळत नसल्याचं केंद्र सरकारचं मत आहे. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोशल डिस्टन्सिंगचे पालन करणे अत्यंत महत्वाचं आहे. तसेच विनाकारण फिरणे, गर्दीत जाणे या गोष्टी लोक करत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार आणखी वाढताना दिसता आहे.
त्यामुळे बाहेर फिरताना जास्तीत जास्त अंतर म्हणजे किमान चार चे पाच मीटरचे अंतर असल्यास कोरोनाच्या प्रसाराचा कोणताही धोका नाही. सायकलिंग करत असाल तर किमान दहा मीटरचे अंतर असायला हवं.
भारतात एकाच दिवशी एक लाखाहून जास्त कोरोनाच्या रुग्णांची भर पडली असून आतापर्यंतची ही आकडेवारी म्हणजे एक विक्रम आहे. येत्या तीन दिवसात केंद्र सरकार सर्व राज्यातील मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांची एक बैठक घेणार आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन हे देशातील प्रमुख 11 राज्ये, ज्या राज्यात कोरोनाचा प्रसार वेगाने होतोय, त्यांच्याशी चर्चा करणार आहेत. या 11 राज्यात महाराष्ट्र. छत्तीसगड, पंजाबं, गुजरात, हरियाणा, दिल्ली, हिमाचल प्रदेश, झारखंड, मध्य प्रदेश, कर्नाटक आणि राजस्थानचा समावेश आहे.
गेल्या वर्षी दरदिवशी 20 हजार रुग्णांपासून ते दरदिवशी एक लाखांपर्यंत रुग्णांची संख्या वाढण्यासाठी 76 दिवस लागले होते. आता हा टप्पा केवळ 25 दिवसात गाठला आहे. त्यामुळे यावेळचा कोरोनाचा प्रसार किती जलद आहे ते लक्षात येतं.