(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus in India : देशभरात 24 तासात अडीच लाख कोरोनाबाधित; पॉझिटिव्हीटी दर 19 टक्क्यांवर
Coronavirus Updates India : देशभरात कोरोनाबाधितांची संख्या वाढत असून पॉझिटिव्हीटी दरातही वाढ झाली आहे.
Coronavirus India : देशभरात कोरोनाबाधितांच्या संख्येत वाढ होत आहे. भारतात मागील 24 तासात दोन लाख 86 हजार 384 बाधित आढळले आहेत. तर, 573 कोरोनाबाधितांचा मृत्यू झाला आहे. देशातील कोरोना पॉझिटिव्हीटीचा दर 16 टक्क्यांहून 19.5 टक्के इतका झाला आहे.
देशात सध्या सक्रिय कोरोनाबाधितांची संख्या 22 लाख 2 हजार 472 आहे. मागील 24 तासामध्ये 14 लाख 62 हजार 261 जणांची कोरोना चाचणी करण्यात आली. देशात आतापर्यंत 72 कोटी जणांची कोरोना चाचणी करण्यात आली आहे. बुधवारी दोन लाख 85 हजार 914 कोरोनाबाधित आढळले होते.
महाराष्ट्रात 24 तासांत 35 हजार कोरोनाबाधित
बुधवारी राज्याच्या आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार 24 तासात राज्यात कोरोनाच्या 35 हजार 756 नव्या रुग्णांची भर पडली. तर, 79 जणांचा मृत्यू झाला आहे. राज्यात गेल्या 24 तासात 39 हजार 857 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
मुंबईत बुधवारी 1858 नव्या कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली. तर 13 जणांचा मृत्यू झाला आहे. याच कालावधीत मुंबईत 1656 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. बुधवारी आढळलेल्या एकूण 1858 रुग्णापैकी फक्त 233 कोरोनाबाधित रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले आहेत. मुंबईत 22 हजार 364 सक्रिय कोरोनाबाधित आहेत.
दरम्यान, कोरोना महामारीविरोधात लढण्यासाठी देशभरात सध्या लसीकरणाला वेग आला आहे. Covishield आणि Covaxin या लसी सध्या उपलब्ध आहेत. या दोन्ही लसी लवकरच खुल्या बाजारात विक्रीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडियाकडून (DCGI) याला लवकरच मान्यता मिळण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. ड्रग्स कंट्रोलर जनरल ऑफ इंडिया खुल्या बाजारात Covishield आणि Covaxin या लसींची किंमत किती असू शकते, यावर विचार करत आहे. अधिकृत सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, Covishield आणि Covaxin या लसींची खुल्या बाजारात किंमत प्रत्येकी 275 रुपये असू शकते. तसेच यावर सर्व्हिस चार्ज 150 रुपये इतका लागू शकतो. म्हणजेच, खुल्या बाजारात Covishield आणि Covaxin या लसीची किंमत अंदाजे 425 रुपये इतकी असण्याची शक्यता आहे.
इतर महत्त्वाच्या बातम्या: