Coronavirus India : देशात मागील 24 तासांत 8439 कोरोनाबाधित, तर 195 जणांचा मृत्यू
Coronavirus India : देशात मागील 12 दिवसांपासून दररोज नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांपेक्षा कमी आहे.
Coronavirus updates India : देशात मागील 24 तासांमध्ये 8439 नवीन कोरोनाबाधितांची नोंद करण्यात आली आहे. त्यानंतर आता देशातील बाधितांची संख्या 3,46,56,822 इतकी झाली आहे. देशभरात उपचार घेत असलेल्या कोरोनाबाधितांची संख्या घटली आहे. सध्या 93,733 कोरोनाबाधितांवर उपचार सुरू आहेत. ही संख्या मागील 555 दिवसांमधील कमी संख्या आहे. मागील 24 तासांत 195 बाधितांचा मृत्यू झाला. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आज सकाळी कोरोनाबाधितांबाबतची नवीन आकडेवारी प्रसिद्ध केली.
देशात कोरोनामुळे झालेल्या मृतांची संख्या 4,73,952 इतकी झाली आहे. देशात मागील 12 दिवसांपासून दररोज नोंद होणाऱ्या कोरोनाबाधितांची संख्या 10 हजारांपेक्षा कमी झाली आहे. मागील 164 दिवसांपासून 50 हजारांपेक्षा कमी प्रकरणे समोर येत आहेत.
उपचार घेत असलेल्या बाधितांची संख्या 93,733 इतकी झाली आहे. ही संख्या बाधितांच्या एकूण प्रकरणाच्या 0.27 टक्के इतकी आहे. हा दर मार्च 2020 नंतरचा सर्वात कमी दर आहे. कोरोनावर मात देणाऱ्या रुग्णांची संख्या वाढत असून देशपातळीवर हा दर 98.36 टक्के इतका आहे. हा दर मार्च 2020 नंतर सर्वाधिक आहे.
संसर्ग दर 0.70 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मागील 65 दिवसांपासून हा दर दोन टक्क्यांपेक्षा कमी आहे. साप्ताहिक संसर्ग दर हा 0.76 टक्के इतका नोंदवण्यात आला आहे. मागील 24 दिवसांपासून हा दर एक टक्क्यांपेक्षाही कमी आहे. देशात आतापर्यंत 3,40,89,137 लोकांनी कोरोनावर मात केली आहे. तर, कोरोनामुळे होणारा मृत्यू दर हा 1.37 टक्के इतका आहे. राष्ट्रीय लसीकरण मोहिमेतंर्गत आतापर्यंत 129.54 कोटींहून अधिक लशी देण्यात आल्या आहेत.
राज्यात कोरोनामुळे 19 जणांचा मृत्यू, 699 नवीन रुग्ण
राज्यात दैनंदिन कोरोना रुग्णांच्या (coronavirus) संख्येत चढ उतार पाहायला मिळत आहे. आरोग्य विभागाने दिलेल्या माहितीनुसार, राज्यात मंगळवारी 699 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 1087 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मागील 24 तासांत राज्यात 19 जणांचा कोरोनामुळे मृत्यू झालाय. राज्यात आतापर्यंत 64 लाख 88 हजार 680 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 97.72 टक्के इतकं झालं आहे. राज्यातील सक्रिय रुग्णांची संख्या 6,445 इतकी आहे.