Corona Test | चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्ट किट्सबाबत तक्रारी, ICMR कडून वापर थांबवण्याच्या सूचना
चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्ट किट्सबाबत राजस्थानातून तक्रारी आल्या आहेत. या तक्रारी आल्यानंतर या किट्सचा वापर थांबविण्याचा निर्णय इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने घेतला आहे.
नवी दिल्ली : चीनमधून भारतात आलेल्या रॅपिड टेस्ट किट्स खराब असल्याची तक्रार राजस्थानातून आली आहे. चीनने पाठवलेल्या रॅपिड टेस्ट किटमधून केलेल्या कोरोनाच्या टेस्ट चुकीच्या येत असल्याने राजस्थान सरकारने या रॅपिड टेस्ट किट्सचा वापर पूर्णपणे थांबवला आहे. त्यामुळे चीनने भारताची फसवणूक केली का? असा प्रश्न आता उपस्थित होऊ लागला आहे. राजस्थानमधील प्रकार समोर आल्यानंतर याबाबत इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चने आदेश दिले आहेत की, चीनमधून आलेल्या रॅपिड टेस्ट किटची तपासणी होईपर्यंत कोणत्याही राज्याने या किट्सचा वापर करु नये.
भारताने चीनकडून जवळपास साडेनऊ लाख रॅपिड टेस्ट किट्स खरेदी केल्या आहेत. यापैकी साडेपाच लाख किट्स भारताला मिळाल्या आहेत. राजस्थानमधून रॅपिड टेस्ट किट खराब असल्याची तक्रार आल्यानंतर इंडियन काऊंसिल ऑफ मेडिकल रिसर्चचे वरिष्ठ वैज्ञानिक डॉ. रमन गंगाखेडकर यांनी म्हटलं की, एका राज्यातून रॅपिड टेस्ट किटबाबत तक्रार आल्यानंतर आणखी तीन राज्यांमध्ये याबाबत चौकशी करण्यात आली. रॅपिड टेस्ट किट आणि आरटी-पीसीआर टेस्ट रिपोर्ट्स यांच्यात 6 ते 71 टक्क्यांचं अंतर असल्याचं समोर आलं आहे. आणि ही बाब ठीक नाही. त्यामुळे पुढील दोन दिवस या किट्सचं मुल्यांकन केलं जाईल, तोपर्यंत या किट्सचा वापर न करण्याच्या सूचना सर्व राज्यांना दिल्या आहेत.
Coronavirus Test | राज्यात रॅपिड टेस्टिंगला का होतोय विलंब?
दरम्यान, इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल सायन्सने आठ प्रयोगशाळांच्या फील्ड टीममार्फत या किट्सचं पुन्हा मूल्यांकन करण्याचा निर्णय घेतला आहे. यानंतर राज्यांना स्पष्ट सूचना दिल्या जातील. जर रॅपिड टेस्ट किट्समध्ये गडबड असल्यास आम्ही त्या कंपनीला परत पाठवून देऊ, असं डॉ. रमण गंगाखेडकर म्हणाले.
रॅपिड टेस्ट किटबाबत चीन सोबत झालेल्या करारावर आधीही प्रश्न उपस्थित झाले आहेत. कारण रॅपिड टेस्ट किट ठरलेल्या तारखेच्या खुप उशीरा भारताला मिळाले. चीनच्या वन्डफो कंपनीकडून अडीच लाख रॅपिड टेस्ट किट्स 16 एप्रिलला भारतात दाखल झाल्या. तर 19 एप्रिलला 3 लाख रॅपिड टेस्ट किट्स एअर इंडियाच्या विशेष विमानाने राजस्थान आणि तामिळनाडू येथे दाखल झाल्या. या किट्ससाठी भारताने मोठी रक्कम चीनी कंपनी मोजली आहे. मिळालेल्या माहितीनुसार एका किटची किंमत जवळपास 610 रुपये आहे. मात्र तरीही या टेस्ट किट्सबाबत शंका उपस्थित होणे चिंतेची बाब आहे.
संबंधित बातम्या
- मुंबई- पुणे भागात लॉकडाऊनबाबतीत सवलती रद्द, वाढलेल्या गर्दीमुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंचे आदेश
- Attack on Doctors | आयएमएचे डॉक्टर 23 एप्रिलला काळा दिवस पाळणार!
- मुंबईतील झोपडपट्ट्यांना बिल्डर, आर्किटेक्ट जबाबदार; रतन टाटा यांची टीका
- Coronavirus | राष्ट्रपती भवन परिसरात कोरोनाचा शिरकाव; 100 कुटुंब सेल्फ क्वॉरंन्टाईन