(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus Test | राज्यात रॅपिड टेस्टिंगला का होतोय विलंब?
रॅपिड टेस्टला परवानगी मिळालेली असली तरी या टेस्ट बाबत अद्यापही शंका उपस्थित केली जात आहे. स्वॅब टेस्टिंगच्या तुलनेत रॅपिड टेस्टिंग चाचण्या 100 टक्के अचूक निकाल देतील याची शाश्वती नसल्याचं अधिकाऱ्यांमधील एका गटाचं मत आहे.
मुंबई : केंद्रातून परवानगी मिळूनही राज्यात रॅपिड टेस्टिंगची अमलबजावणी होण्यास विलंब होत आहे. महाराष्ट्रात विशेषतः मुंबईत रुग्णांची वाढती संख्या लक्षात घेता कोविड - 19 साठीच्या चाचण्या आणखी वेगाने होणं गरजेचं आहे. मात्र आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दोन आठवड्यांपूर्वी घोषणा करूनही अद्याप रॅपिड टेस्टिंगला राज्यात हिरवा कंदील मिळालेला नाही.
याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची मुख्य सचिव, वैद्यकीय शिक्षण सचिव आणि मुंबई महापालिका आयुक्त यांच्यासोबत सातत्याने चर्चा सुरू आहेत. मात्र स्वॅब टेस्टिंगच्या तुलनेत रॅपिड टेस्टिंग चाचण्या 100 टक्के अचूक निकाल देतील याची शाश्वती नसल्याचं अधिकाऱ्यांमधील एका गटाचं मत आहे. त्यामुळे रॅपिड टेस्टिंगमध्ये जर कोविड - 19 चे पॉझिटिव्ह रुग्ण निगेटिव्ह आले तर या संकटात भर पडू शकते, अशी काहींना भीती आहे. तर अतिगंभीर क्षेत्रात रॅपिड टेस्टिंगच्या मदतीने किमान पॉझिटिव्ह, हाय रिस्क, लो रिस्क आणि निगेटिव्ह अशी प्रथमदर्शनी वर्गवारी करण्यास मदत होऊ शकते, असं काहींचं मत आहे. यामुळे हॉटस्पॉट आणि आसपासच्या परिसरात मास टेस्टिंग करून कोरोनाचा वाढता प्रसार आटोक्यात आणण्यासाठी मोठी मदत होऊ शकते. पण याबाबत तज्ज्ञांशी चर्चा करून योग्य उपाय शोधण्याचा सरकारचा प्रत्यन सुरू असल्याचं सांगितलं जात आहे.
काय असू शकतो यावर उपाय ?
रॅपिड टेस्टिंगच्या निकालांच्या विश्वासार्हतेवर जगभरात प्रश्न उपस्थित होत असले तरी सॅम्पल टेस्टिंग करून याबाबत निर्णय घेतला जाऊ शकतो असं तज्ज्ञांचं मत आहे. यासाठी एक विशिष्ठ सॅम्पल साईज ठरवून कोविड - 19 पॉझिटिव्ह रुग्णांची रॅपिड टेस्ट करून त्याचा निकाल काय येतो हे तपासले जाऊ शकते. यापैकी किती निकाल अचूक येतात यावर त्या टेस्टिंग किटची विश्वासार्हता तपासली जाऊ शकते.
तसेच स्वॅब टेस्टिंगमध्ये निगेटिव्ह आलेल्या लोकांचा सॅम्पल साईज ठरवून त्यांची पुन्हा रॅपिड टेस्टिंग करायची. त्यांच्या आलेल्या निकालांच्या सरासरीवर किती टक्के अचूक निकाल येतात याची तपासणी केली जाऊ शकते. मात्र अशा पद्धतीने रॅपिड टेस्टचा धोका पत्करण्यासाठी प्रशासनातील काही अधिकारी साशंक आहेत. त्यामुळे याबाबत निर्णय घेण्याच्या जबाबदारीतून अधिकाऱ्यांमध्ये टोलवाटोलवी सुरू असल्याची सूत्रांची माहिती आहे.
स्वॅब आणि रॅपिड टेस्टिंग मध्ये नेमका फरक काय?
कोविड - 19 च्या निदानासाठी रॅपिड टेस्टिंग प्रमाण मानलं जात नसलं तरी सध्याच्या परिस्थितीत कोरोनाचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी ही पद्धत प्रभावी असल्याचं मानलं जात आहे. रॅपिड टेस्टिंग आणि स्वॅब टेस्टिंगमधला मूळ फरक आहे तो निकालाच्या वेळेचा. पारंपरिक स्वॅब टेस्टिंगचा निकाल कळण्यासाठी जवळपास 24 तास लागू शकतात तर रॅपिड टेस्टिंगच्या माध्यमातून अवघ्या 10 ते 15 मिनिटात रिझल्ट कळू शकतो. स्वॅब टेस्टिंगमध्ये घशातील द्रव्याचे नमुने घेतले जातात. पण रॅपिड टेस्टिंगसाठी रक्ताचे नमुने घेतले जातात. स्वॅबचे नमुने चाचणीसाठी तत्सम लॅबमध्ये पाठवले जातात. मात्र रॅपिड टेस्टिंग किट तिथल्या तिथे निकाल सांगतं.