(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Coronavirus | पंजाबमधील लुधियानात RPF चे 14 जवान कोरोना पॉझिटिव्ह; श्रमिक ट्रेनमध्ये होते तैनात
काही दिवसांपूर्वी नांदेडमधून पंजाबमध्ये परतलेल्या भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. अशातच आता पंजाबमधील लुधियानामध्ये RPF चे 14 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे जवान श्रमिक ट्रेनमध्ये तैनात होते.
नवी दिल्ली : पंजाबमधील लुधियानामध्ये रेल्वे प्रोटेक्शन फोर्स म्हणजेच, RPF चे 14 जवान कोरोना पॉझिटिव्ह आढळून आले आहेत. हे सर्व जवान श्रमिक ट्रेनमध्ये तैनात होते. देशभरात लॉकडाऊनमुळे अडकलेल्या मजुरांना घरी पोहोचवण्यासाठी श्रमिक ट्रेन चालवण्याचा निर्णय केंद्र सरकारकडून घेण्यात आला आहे. त्यामुळे देशभरात श्रमिक ट्रेन चालवण्यात येत आहेत. दरम्यान, पंजाबमध्ये याआधी नांदेड येथून परतलेल्या भाविकांना कोरोनाची लागण झाल्याचं स्पष्ट झालं होतं. हे प्रकरण ताजं असतानाच आता श्रमिक ट्रेनमध्ये तैनात असलेले जवान कोरोना पॉझिटिव्ह असल्यामुळे पंजाब राज्याच्या चिंतेत वाढ झाली आहे.
दरम्यान, देशभरात लॉकडाऊनमुळे 17 मेपर्यंत रेल्वे सेवा रद्द करण्यात आल्या आहेत. परंतु, देशातील वेगवेगळ्या भागांमध्ये अडकलेल्या लोकांसाठी 'श्रमिक स्पेशल ट्रेन' चालवण्यात येत आहे. यामध्ये काही निवडक लोकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. या ट्रेनमधून इतर कोणीही प्रवास करू शकत नाही. या ट्रेनमधून लॉकडाऊनमुळे अडकलेले मजुर, विद्यार्थी, भाविक आणि पर्यटक यांनाच प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे. परंतु, यांपैकी ज्यांना राज्य सरकारकडून परवानगी देण्यात येणार त्याच व्यक्ती प्रवास करू शकणार आहेत.
रेल्वे मंत्रालयाने श्रमिक स्पेशल ट्रेन सुरु केली असून त्यासाठी नव्या गाइडलाइन्स जारी केल्या आहेत. यानुसार, श्रमिक स्पेशल ट्रेन ज्या राज्यांमध्ये जाणार आहे. तिथे तीन स्थांनकांवर थांबणार आहे. याव्यतिरिक्त स्लीपर बर्थच्या सर्व सीटांवर प्रवास करता येणार आहे. आतापर्यंत ट्रेनच्या एका बोगीमध्ये 72 प्रवासी प्रवास करत होते आता 56 लोकांना प्रवास करण्याची परवानगी देण्यात आली आहे.
दरम्यान, काल (सोमवारी) देशातील सर्व राज्यांतील मुख्यमंत्री आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यात व्हिडीओ कॉन्फरन्सिगद्वारे बैठक पार पडली. या बैठकीत पंजाबचे मुख्यमंत्री कॅप्टन अंरिंदर सिंह यांनी लॉकडाऊनबाबत रणनिती आखण्यासाठी सांगितलं आहे. तसेच या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी देशात चौथ्या लॉकडाऊनचे संकेत दिले आहेत. याच पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी आज पुन्हा एकदा देशाच्या जनतेशी संवाद साधणार आहेत. पंतप्रधान लॉकडाऊन संदर्भात कोणती घोषणा करणार का याची उत्सुकता आहे.
संबंधित बातम्या :