#CoronaUpdate | भारतात कोरोना दुसऱ्या टप्प्यातच : आरोग्य मंत्रालय
कोरोना व्हायरस देशात अजून तरी दुसऱ्या टप्प्यात आहे. सर्व नागरिकांनी सरकारच्या सूचनांचं पालन करण्याचं आवाहन आरोग्य मंत्रालयाने केलं आहे.
नवी दिल्ली : देशात कोरोना व्हायरस अद्याप दुसऱ्या टप्प्यातच आहेत. कोरोना व्हायरसच्या संसर्गाचा तिसरा टप्पा धोकादायक मानला जातो. तिसऱ्या टप्प्यात एका मोठ्या समुदायाकडून दुसऱ्या समुदायाकडे (कम्युनिटी ट्रान्समिशन) असा कोरोनाचा प्रसार होतो. मात्र अद्याप भारत त्यापासून दूर आहे. आमच्य बोलण्यात कम्युनिटी शब्द आला म्हणजे त्याचा अर्थ कम्युनिटी ट्रान्समिशन घेऊ नका. भारत तिसऱ्या टप्प्यात गेला तर त्यांची माहिती देऊ, असं केंद्रीय आरोग्य मंत्रालयाकडून सांगण्यात आलं.
जगभरातील इतर देशांच्या तुलनेत भारताने वेळेत उपाययोजना राबवल्या. कोरोनाचा फैलाव होऊ नये यासाठी लॉकडाऊनसारखा मोठा निर्णय घेतला. त्यामुळे कोरोनाचं कम्युनिटी ट्रान्समिशन जास्त प्रमाणात दिसत नाही. नागरिकांनी सरकारने केलेल्या सूचनांचं पालन करावं आणि योग्य ती खबरदारी घ्यावी, असं आरोग्य मंत्रालयाने म्हटलं आहे. देशभरात आतापर्यंत 1263 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. तर 29 जणांचा यामध्ये मृत्यू झाला आहे. दिलासादायक बाब म्हणजे 102 रुग्ण या कोरोना आजारातून बरे झाले आहेत. कोरोना व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी 14 एप्रिलपर्यंत देशभरात लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. तसेच लॉकडाऊनचा काळ पुढे आणखी वाढण्याची कोणताही विचार नसल्याचंही सरकारच्या वतीने बोललं जात आहे.
लॉकडाऊनचा काळ वाढवण्याचा विचार नाही
गेल्या दोन-तीन दिवसांपासून सोशल मीडिया आणि माध्यमांच्या रिपोर्टमधून 21 दिवसांचा लॉकडाऊन वाढणार असल्याच्या बातम्यांचं केंद्रीय सचिव राजीव गाबा यांनी खंडन केलं आहे. कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी केंद्र सरकारने देशात 21 दिवसांचा लॉकडाऊन जाहीर केला आहे. हा लॉकडाऊन वाढण्याच्या शक्यता मीडिया रिपोर्टमधून सांगितल्या जात आहे. तर, सोशल मीडियावर हा लॉकडाऊन मोठ्या कालावधीसाठी वाढणार असल्याचे मेसेच फिरत आहेत. याची दखल घेत केंद्रीय माहिती प्रसारण विभागाने घेत अफवा पसरावणाऱ्यांवर कारवाई करण्याचा इशारा दिला.
राज्यातील जिल्हा आणि मनपानिहाय कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची माहिती
- मुंबई - 92
- पुणे ( शहर व ग्रामीण भाग ) - 43
- सांगली - 25
- मुंबई वगळून ठाणे मंडळातील इतर मनपा - 23
- नागपूर - 16
- यवतमाळ - 4
- अहमदनगर - 5
- सातारा, कोल्हापूर - 2
- औरंगाबाद, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, गोंदिया, जळगाव, बुलढाणा, नाशिक - प्रत्येकी 1
- इतर राज्य - गुजरात - 1
- दहा रुग्णांचा आतापर्यंत मृत्यू झाला
संबंधित बातम्या
- Corona Update | राज्यातील कोरोना बाधितांचा संख्या 220 वर, आज दिवसभरात दोघांचा मृत्यू
- Corona | ज्येष्ठ नागरिकांनी 'या' गोष्टी पाळा, केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या मार्गदर्शक सूचना जारी
- Lock Down | लॉकडाऊनचा पॉझिटिव्ह इफेक्ट; मुंबई, इटली, चीनमधील प्रदूषण घटलं!
- Coronavirus | अमेरिकेत 1 ते 2 लाख लोकांचा मृत्यू होण्याची भीती, संसर्गजन्य रोगतज्ज्ञ डॉ. अँथनी फाऊची यांचा दावा
- India Lockdown | वाट दिसू दे गा देवा... लॉकडाऊनमुळे काम गेलं, घरी जाण्यासाठी धडपड