Coronavirus Today: देशात मागील 24 तासात 41 हजार 831 नवीन रुग्ण, 541 रुग्णांचा मृत्यू
गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 41 हजार 831 नव्या रुग्णांची भर पडली असून 541 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या आता चार लाख 24 हजार 351 इतकी झाली आहे.
Coronavirus Today: देशात कोरोनाची दुसरी लाट अद्यापही कायम असल्याचं स्पष्ट झालंय. गेल्या 24 तासात देशात कोरोनाच्या 41 हजार 831 नव्या रुग्णांची भर पडली असून 541 लोकांना आपला जीव गमवावा लागला आहे. कोरोनामुळे मृत्यू झालेल्या एकूण लोकांची संख्या आता चार लाख 24 हजार 351 इतकी झाली आहे. दिलासादायक बाब म्हणजे गेल्या 24 तासात 39 हजार 258 लोक कोरोनामुक्त झाले आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने ही ताजी आकडेवारी जाहीर केली आहे.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या ताज्या आकडेवारीनुसार आता देशात कोरोनामुक्त झालेल्या रुग्णांची संख्या 3 कोटी 8 लाख 20 हजार 521 झाली आहे. देशात आतापर्यंत 3 कोटी 16 लाख 55 हजार 824 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
राज्यात काल 7 हजार 786 रुग्ण कोरोनामुक्त
राज्यात दैनंदिन कोरोना (Maharashtra corona cases) बाधित रुग्णांची संख्या काही दिवसांपासून नऊ हजारांच्या आत येऊ लागली आहे. काल शनिवारी 6,959 नवीन रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 7 हजार 786 रुग्ण कोरोनामुक्त झाले. राज्यात आतापर्यंत 60 लाख 90 हजार 756 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण 96.62 टक्के आहे. राज्यात काल 225 रुग्णांच्या मृत्यूची नोंद झाली आहे. त्यामुळे राज्याचा मृत्यूदर 2.01 टक्के झाला आहे. तब्बल 32 महापालिका क्षेत्र आणि जिल्ह्यांमध्ये काल एकही मृत्यूची नोंद झालेली नाही. राज्यात सध्या 76 हजार 755 रुग्णांवर उपचार सुरु आहेत. नंदूरबार (9), हिंगोली (72), वाशिम (86), गडचिरोली (15) या चार जिल्ह्यात अॅक्टिव्ह रुग्णसंख्या 100 च्या खाली आहे. पुणे जिल्ह्यात सध्या सर्वात जास्त 15, 674 अॅक्टिव्ह रुग्ण आहेत.
मालेगाव मनपा, परभणी मनपा जिल्ह्यात काल शून्य रुग्ण आढळले आहेत. तर साताऱ्यात सर्वाधिक 798 रुग्णांची नोंद झाली आहे. कालपर्यंत तपासण्यात आलेल्या 4,79,67,609 प्रयोगशाळा नमुन्यांपैकी 63,03, 715 (13.14 टक्के) नमुने पॉझिटिव्ह आले आहेत. सध्या राज्यात 4,76,609 व्यक्ती होम क्वारंटाईनमध्ये आहेत तर 3,166 व्यक्ती संस्थात्मक क्वारंटाईनमध्ये आहेत.
मुंबईत 24 तासात 346 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
मुंबईत गेल्या काही दिवसांपासून कोरोना नियंत्रणात असल्याचं पाहायला मिळत आहे. मुंबईत गेल्या 24 तासात 346 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. तर 444 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे. मुंबईत आतापर्यंत 7,11,517 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. मुंबईचा रिकव्हरी रेट 97 टक्के झाला आहे. तर मुंबईत गेल्या 24 तासात 9 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. सध्या मुंबईत 5,972 सक्रिय रुग्ण आहेत. तर रुग्ण दुपटीचा दर 1465 दिवसांवर गेला आहे.