Corona Review Meeting | पंतप्रधान मोदींची कोरोना आढावा बैठक संपली; ऑक्सिजन-औषध उपलब्धतेबाबत चर्चा
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तज्ज्ञांसोबत ऑक्सिजन आणि औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला.वैद्यकीय आणि नर्सिंग अभ्यासक्रमाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोविड ड्युटीमध्ये सामील करुन घेण्यासाठी बैठकीत बरीच चार्चा झाली असून त्याचा तपशील उद्या जाहीर केला जाईल.
नवी दिल्ली : एकीकडे पाच राज्यांचे विधानसभा निवडणुकीची निकाल आज हाती येत असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी कोरोनासंबंधी आढावा बैठकीत व्यस्त होते. ही बैठक आता संपली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे तज्ज्ञांसोबत ऑक्सिजन आणि औषधांच्या उपलब्धतेचा आढावा घेतला. पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या या बैठकीत अनेक मोठे निर्णय घेतल्याची माहिती सूत्रांकडून मिळत आहे. कोविड ड्युटीमध्ये एमबीबीएस आणि नर्सिंगच्या अंतिम वर्षाच्या विद्यार्थ्यांचा समावेश केला जाऊ शकतो. सरकारी भरतीत प्राधान्य देण्याबरोबरच कर्तव्य बजावणाऱ्या वैद्यकीय कर्मचार्यांना आर्थिकरित्या प्रोत्साहनही दिले जाईल.
विद्यार्थ्यांना प्रोत्साहित करण्यासाठी आणि वैद्यकीय आणि नर्सिंग अभ्यासक्रमाच्या उत्तीर्ण विद्यार्थ्यांना कोविड ड्युटीमध्ये सामील करुन घेण्यासाठी बैठकीत बरीच चार्चा झाली असून त्याचा तपशील उद्या जाहीर केला जाईल. सूत्रांच्या माहितीनुसार, या निर्णयामध्ये NEET परीक्षांना उशीर करणे आणि एमबीबीएस पास-आउट झालेल्यांना प्रोत्साहित करुन कोरोना ड्युटीमध्ये समाविष्ट करुन घेणे आहे.
देश भयंकर कोरोना साथीशी सामना करतोय
देशातील अनेक भागात कोरोनाबाधितांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे. रविवारी देशभरात 3 लाख 92 हजार 488 नवीन कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. यासह देशात कोरोना संसर्गाची एकूण प्रकरणे वाढून 1 कोटी 57 लाख 457 हजार झाली आहेत. तर गेल्या 24 तासात 3689 लोकांचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे.
देशातील कोरोनाच्या दुसर्या लाटेचा पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी सतत बैठका घेत आहेत. त्यांनी मुख्यमंत्री, अधिकारी, ऑक्सिजन उत्पादक आणि अन्य लोकांशी बैठका घेतल्या आहेत. अलीकडे लष्करप्रमुख आणि हवाई दल प्रमुख यांनीही पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती.