देशातील महाविद्यालयांच्या परीक्षांबाबत युजीसीने जाहीर केलं वेळापत्रक
कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयं बंद करण्यात आली. त्यामुळे या वर्षातला जो पाठ्यक्रम अपूर्ण राहिला आहे त्यासाठी एक वेळापत्रक आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळापत्रक देण्यात आलं आहे.
नवी दिल्ली : कोरोनाच्या संकटात वाढत्या लॉकडाऊनमुळे विद्यापीठ, महाविद्यालयाच्या परीक्षा नेमक्या कशा घेणार? नवं शैक्षणिक वर्ष कधी सुरू होणार? याबाबत यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) निर्णय घेतला आहे. सध्या महाविद्यलयीन शिक्षण घेणाऱ्या द्वितीय आणि तृतीय वर्षातील विद्यार्थ्यांसाठी महाविद्यालयं ऑगस्टमध्ये सुरु होणार तर नव्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे प्रथम वर्षातील विद्यार्थ्यांसाठी ही महाविद्यालयं 1 सप्टेंबरपासून सुरु होणार असं यूजीसीने (विद्यापीठ अनुदान आयोग) स्पष्ट केलं आहे. पुढील वर्षी परीक्षा 26 मे ते 25 जूनच्या दरम्यान होणार आहे. 1 ते 30 जुलै दरम्यान विद्यार्थ्यांना सुट्या असणार आहे. पुढील वर्षी विद्यार्थ्याचे शैक्षणिक वर्ष 1 ऑगस्ट 2021 ला सुरू होणार आहे.
विद्यापीठातल्या परीक्षांबाबत यूजीसीने जाहीर केलेल्या गाईडलाईन्सनुसार शेवटच्या वर्षातील विद्यार्थ्यांची परीक्षा जुलैमध्ये घेण्यात येईल. तसेच विद्यार्थ्यांच्या अंतर्गत मूल्यमापन, असाइनमेंट, प्रोजेक्ट वर्क, इंटर्नशीपच्या आधारावर त्यांना ग्रेड दिले जातील. ज्या राज्यांमध्ये कोरोनाची स्थिती सामन्य आहे त्या राज्यात जुलै महिन्यात परीक्षा घेण्यात येणार आहे.
विद्यापीठ आयोगाने म्हटले आहे की, एमफिल, पीएचडीच्या विद्यार्थ्यांना सहा महिन्यांचा अधिक कालावधी देण्यात येणार आहे. यूजीसीने दोन वेळापत्रकं दिली आहेत. एक 2019-20 या वर्षासाठी आहे. कोरोनाचा प्रादुर्भाव टाळण्यासाठी महाविद्यालयं बंद करण्यात आली. त्यामुळे या वर्षातला जो पाठ्यक्रम अपूर्ण राहिला आहे. त्यासाठी एक वेळापत्रक आणि नव्या शैक्षणिक वर्षासाठी एक वेळापत्रक देण्यात आलं आहे.
कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव रोखण्यासाठी मार्च महिन्यात शाळा आणि महाविद्यालयं बंद करण्यात आली होती. महाविद्यालयीन परीक्षा देखील पुढे ढकलण्यात आल्या आहेत. त्याची तारीखही अद्याप जाहीर करण्यात आलेली नाही.
संबंधित बातम्या :
स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांना आता पुण्यात राहणं का शक्य नाही?
Corona Update | विद्यार्थ्यांचं कोणतंही शैक्षणिक नुकसान होणार नाही : उदय सामंत