(Source: ECI/ABP News/ABP Majha)
India COVID-19 Cases : गेल्या 24 तासांत 2259 नव्या कोरोना रुग्णांची नोंद; 20 लोकांचा मृत्यू
Coronavirus Cases Today : कोरोनाच्या प्रादुर्भावात घट होत असल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या 24 तासांत 2259 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे.
India COVID-19 Cases : काही दिवसांच्या वाढीनंतर देशातील कोरोना (Covid-19) प्रादुर्भावात पुन्हा एकदा घट झाल्याचं पाहायला मिळत आहे. गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या आकडेवारीत (Coronavirus) चढ-उतार पाहायला मिळत आहेत. गेल्या 24 तासांत कोरोनाच्या 2259 नव्या रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. तर 20 लोकांचा कोरोनामुळं मृत्यू झाला आहे. यापूर्वी 19 मे रोजी जवळपास 2300 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली होती.
आरोग्य मंत्रालयाकडून जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, देशभरात सध्याची अॅक्टिव्ह रुग्णांची संख्या 15044 वर पोहोचली आहे. यापूर्वी एका दिवसाआधीच्या रुग्णसंख्येची तुलना करायची झाली, तर कालच्या तुलनेत आजच्या संख्येत काहीशी घट झाल्याचं दिसून आलं आहे. तर मृतांच्या आकड्यात मात्र काहिशी वाढ झाली आहे. 19 मे रोजी कोरोनामुळे 10 जणांचा मृत्यू झाला होता, तर एका दिवसातच हा आकडा दुप्पट झाला आहे. गेल्या 24 तासांत 20 रुग्णांनी कोरोनामुळं जीव गमावला आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून कोरोनाबाधितांच्या संख्येत घट झाल्याचं पाहायला मिळत आहे.
कोरोना (Coronavirus Cases Today) संसर्गावर नियंत्रण ठेवण्यासाठी देशभरात लसीकरण मोहीम राबवण्यात आली होती. त्याचाच परिणाम कोरोनाच्या आकड्यांवर दिसून येत आहे. आता कोरोनाचा तिसरा म्हणजेच, बूस्टर डोस सर्व लोकांना दिला जात आहे. याबाबत शासनाकडून मार्गदर्शक सूचना जारी करण्यात आल्या आहेत. ज्यामध्ये असं सांगण्यात आलं आहे की, दुसरा डोस लागू केल्यानंतर 9 महिन्यांनंतर तुम्ही कोरोनाचा बूस्टर डोस घेऊ शकता. मात्र, दुसऱ्या आणि तिसऱ्या डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी अनेकांकडून केली जात आहे. सध्या तरी सरकारने याबाबत कोणताही निर्णय घेतलेला नाही.
राज्यातील कोरोना रुग्णसंख्येत हळूहळू वाढ
राज्यातील कोरोनाची रुग्णसंख्या हळूहळू वाढताना दिसत आहे. बुधवारच्या तुलनेत काल (गुरुवारी) कोरोनाच्या रुग्णसंख्येत काहीशी वाढ झाली आहे. आज राज्यामध्ये 316 नव्या कोरोनाबाधितांची नोंद झाली आहे. तर गेल्या 24 तासांमध्ये एकूण 201 रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. बुधवारी राज्यांमध्ये 307 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. राज्यात काल एकाही कोरोनाबाधिताचा मृत्यू झाला नाही. राज्यातील मृत्यूदर हा 1.87 टक्के इतका आहे. तर राज्यात आतापर्यंत 77,32,282 कोरोना रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत. त्यामुळे राज्यातील रुग्ण बरे होण्याचे प्रमाण हे 98.10 टक्के इतके झाले आहे.