Coronavirus : जगभरात कोरोनाची भीती! देशात 188 नवीन रूग्णांचं निदान; सक्रिय रूग्णांची संख्या तीन हजारांच्या पार
Coronavirus Cases in India : आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत एकूण 91.01 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत.
Coronavirus Cases in India : कोरोना व्हायरस भारतातील काही शहरांमध्ये पुन्हा एकदा दहशत निर्माण करायला सुरुवात केली आहे. गेल्या 24 तासांत 188 कोरोना संसर्गाचे नवीन रुग्ण आढळले आहेत. नवीन कोरोना (कोविड-19) रुग्ण आढळल्यानंतर, देशातील सक्रिय रुग्णांची संख्या 3,468 वर पोहोचली आहे. मात्र, गेल्या 24 तासांत 141 लोक बरे झाले असून एकूण बरे झालेल्यांची संख्या 4,41,43,483 झाली आहे.
आरोग्य मंत्रालयाकडून दिलेल्या माहितीनुसार, भारतात आतापर्यंत एकूण 91.01 कोटी कोरोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. तर, गेल्या 24 तासांत 1,34,995 चाचण्या झाल्या. त्याचवेळी, देशव्यापी लसीकरण मोहिमेअंतर्गत आतापर्यंत लोकांना एकूण 220.07 कोटी लसींचे डोस देण्यात आले आहेत. ज्यामध्ये 95.12 कोटी दुसरा डोस आणि 22.38 कोटी सावधगिरीचा डोस देण्यात आला आहे. सरकारच्या म्हणण्यानुसार, देशभरात गेल्या 24 तासांत कोरोना लसींचे 90,529 डोस लोकांना देण्यात आले आहेत.
देशाचा कोविड रिकव्हरी रेट 98.8%
कोरोना संसर्गाची भीती सर्वत्र असताना दिलासा देणारी बाब म्हणजे देशात कोरोनाग्रस्त रूग्ण बरे होण्याचे प्रमाणही वाढले आहे. सध्या कोरोना रुग्णांचा रिकव्हरी रेट 98.8% आहे. तर देशातील सक्रीय रूग्णांची संख्या 3,468 आहे. ही संख्या एकूण प्रकरणांच्या 0.01% आहे. तर, दिवसाला कोव्हिड पॉझिटीव्ह रूग्णांचा रेट 0.14% आहे आणि साप्ताहिक कोविड पॉझिटीव्ह रेट 0.18% आहे.
'भारतात लोकांची प्रतिकारशक्ती अधिक मजबूत'
आरोग्य तज्ज्ञांच्या म्हणण्यानुसार, देशात कोरोनाचे रुग्ण जरी आढळून येत असले तरी यावेळी लॉकडाऊनची गरज भासणार नाही. इंडियन मेडिकल असोसिएशनचे (आयएमए) डॉ. अनिल गोयल यांनी ही माहिती दिली. अनिल गोयल यांच्या मते, भारतीयांची प्रतिकारशक्ती चीनमधील लोकांपेक्षा अधिक मजबूत आहे. भारतातील 95% लोकसंख्येची कोरोना विरूद्ध लढण्यासाठी प्रतिकारशक्ती वाढली आहे. त्यामुळे देशात लॉकडाऊन लागू होणार नाही.
नाकावाटे घेता येणार कोरोना लसीचा बूस्टर डोस
भारत बायोटेकच्या (Bharat Biotech) नाकावाटे देण्यात येणाऱ्या कोरोना लसीला (Covid Nasal Vaccine) बूस्टर डोस (Booster Dose) म्हणून वापराला केंद्र सरकारने मंजुरी दिली आहे. त्यानंतर आता भारत बायोटेकची नेझल कोरोना वॅक्सिन कोविन (CoWin) ॲपवर उपलब्ध करुन देण्यात आली आहे. भारत बायोटेकची नाकावाटे देण्यात येणारी लस आता कोविन ॲपवरसुद्धा उपलब्ध आहे. भारत बायोटेकची iNCOVACC या इंट्रानेझल कोविड-19 लसीचा पर्याय कोविन ॲपवर (CoWin App) उपलब्ध करुन देण्यात आला आहे. दरम्यान, कंपनीकडून अद्याप लसीची किंमत आणि उपलब्धता याबाबत माहिती जाहीर करण्यात आलेली नाही.
महत्त्वाच्या बातम्या :