कोरोना व्हायरस | एअर इंडियाचे विशेष विमान 324 भारतीयांसह चीनहून दिल्लीच्या दिशेने रवाना
एअर इंडियाचे विशेष विमान चीनच्या वुहान शहरातील 324 भारतीय लोकांसह दिल्लीकडे रवाना झाले आहे. यातील बहुतेक लोक विद्यार्थी आहेत. या सर्वांना भारतीय लष्कराने हरियाणाच्या मानेसर येते तात्पुरतं उभारलेल्या रुग्णालयात ठेवण्यात येणार आहे.
बीजिंग : चीनमध्ये प्राणघातक अशा कोरोना व्हायरसने आतापर्यंत 259 जणांचा मृत्यू झाला आहे, तर जवळपास 11,791 लोकांना या व्हायरसचा प्रादुर्भाव झाला आहे. चीनमधील वुहान शहरात या व्हायरसचा कहर पाहायला मिळत आहे. याठिकाणी शेकडो भारतीय लोक राहतात. या गंभीर परिस्थितीतून भारतीयांची सुटका करण्यासाठी भारत सरकारने एअर इंडियाचं एक स्पेशल विमान पाठवलं. हे विमान वुहान शहरातील 324 भारतीयांना घेऊन दिल्लीला निघालं आहे.
भारतात येणाऱ्या सर्व नागरिकांचं आधी मेडिकल चेकअप करण्यात आलं, म्हणून विमान टेकऑफसाठी उशीर झाला. या सर्व नागरिकांना भारतात आल्यावर लगेच घरी पाठवलं जाणार नाही. या सर्वांसाठी भारतीय लष्कराने हरियाणाच्या मानेसर येते तात्पुरतं रुग्णालय उभारलं आहे. याठिकाणी 300 लोकांच्या राहण्याची आणि उपचाराची सुविधा लष्कराने केली आहे. चीनमधून येणाऱ्या नागरिकांमध्ये विद्यार्थ्यांची संख्या सर्वाधिक आहे. या सर्वांना मानेसर येथे डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवलं जाणार आहे.
Air India Spokesperson: Air India special flight takes off from Wuhan (China) with 324 Indians on board. #Coronavirus https://t.co/kgrd7kTxjT pic.twitter.com/FRDJIo7X3E
— ANI (@ANI) January 31, 2020
खबरदारीचा उपाय म्हणून गेल्या दोन आठवड्यात चीनमध्ये गेलेल्या पर्यटकांना अमेरिकेने प्रवेश नाकारला आहे. त्यामुळे चीनमध्ये गेलेले लोक अमेरिकेत येऊ शकत नाहीत. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनने (WHO) आधीच या व्हायरसला ग्लोबल इमर्जन्सी घोषित केलं आहे. तर चीनमधील वुहान शहरातील आणि आजूबाजूच्या परिसरात नागरिकांना कुठेही बाहेर जाण्याची परवानगी नाही. इतर नागरिकांना या व्हायरसचा प्रादुर्भाव होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं आहे.
Coronavirus death toll now 259 in China, 11,791 confirmed cases
Read @ANI story | https://t.co/3hPhtuQ3ef pic.twitter.com/Tl8caSPjRo — ANI Digital (@ani_digital) February 1, 2020
कोरोना व्हायरस म्हणजे काय?
कोरोना व्हायरसचे विषाणू प्राण्यांपासून मनुष्यापर्यंत पसरतात, असं म्हटलं जातं. वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननुसार, हा विषाणू समुद्री खाद्यपदार्थांशी निगडीत आहे. याची सुरुवात चीनच्या हुवेई प्रांताच्या वुहान शहरातील सीफूड मार्केटमधून झाली आहे. डब्ल्यूएचओने देखील हा विषाणू एका व्यक्तीकडून दुसर्या व्यक्तीपर्यंत पसरू शकतो, अशी भीती व्यक्त केली आहे.
लक्षणे कोणती आहेत
कोरोना व्हायरसचा प्रादुर्भाव झालेल्या व्यक्तीस ताप, सर्दी, श्वास घेण्यास त्रास होणे, नाक वाहणे, घसा खवखवणे अशी लक्षणं जाणवतात.
काय काळजी घ्याल?
तोंडाला मास्क लावा, बोटांनी डोळे, नाक आणि तोंडाला स्पर्श करणे टाळा, हात वारंवार धुवावे, भरपूर पाणी प्या, उघड्यावरचे पदार्थ खाणे टाळा, संक्रमित व्यक्तीपासून लांब राहा, तापासाठीचे आणि घसा खवखवण्यासाठीचे औषधे घ्यावे.