Corona Vaccine : लस घ्याच... टाळणं अत्यंत धोकादायक; अदर पुनावालांचं पुन्हा देशवासियांना आवाहन
Corona Vaccine : लस घेणं टाळणं अत्यंत धोकादायक... सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ (CEO) अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांचं देशवासियांना पुन्हा आवाहन
Corona Vaccine : देशाला कोरोनाच्या प्रादुर्भावात कोरोना प्रतिबंधक लस देऊन नवसंजवनी देणाऱ्या सीरम इंस्टीट्यूट ऑफ इंडियाचे सीईओ (CEO) अदर पुनावाला (Adar Poonawalla) यांनी बुधवारी देशवासियांना लस घेण्याचं आवाहन केलं. कोरोनावर मात करण्यासाठी लसीचा डोस घेणं अत्यंत आवश्यक आहे. जर कोणी लस घेण्याचं टाळत असेल, तर सध्या हा सर्वात मोठा धोका आहे. पुनावाला म्हणाले की, देशातील वेगवेगळ्या राज्यांमध्ये 20 कोटी लसीचे डोस अद्यापही उपलब्ध आहेत. त्यामुळे ज्यांनी अजूनही लस घेतली नाही, त्यांनी लवकरात लवकर लस घेतली पाहिजे.
अदर पुनावाला यांनी सर्व प्रौढ व्यक्तींना लस घेण्याचा आग्रह करत म्हटलं की, लस उद्योगानं राष्ट्रासाठी पुरेसा लस साठा उपलब्ध करुन देण्यासाठी अथक प्रयत्न केले आहेत. "आज राज्यांमध्ये 200 दशलक्षाहून अधिक डोस उपलब्ध आहेत. त्यामुळे तुम्हा सर्वांना विनंती आहे की, ज्यांनी आतापर्यंत लस घेतलेली नाही त्यांनी लवकरात लवकर लसीचा डोस घ्यावा."
दरम्यान, यापूर्वी केंद्रीय आरोग्य मंत्री मनसुख मांडविया (Mansukh Mandaviya) यांनी देशवासियांना कोरोना वॅक्सिनचे दोन डोस घेण्याचं आवाहन केलं होतं. अशातच केंद्रीय आरोग्य मंत्रालयानं सांगितलं की, 16 नोव्हेंबरपर्यंत देशभरात 112 कोटी 97 लाख 84 हजार कोरोना लसीचे डोस देण्यात आले आहेत. दरम्यान, काल दिवसभरात 59.75 लाख लसीचे डोस देण्यात आले होते.
कोरोनाची तिसरी लाट टळली? देशात कोरोना प्रादुर्भाव घटतोय
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाच्या वतीनं जारी करण्यात आलेल्या आकडेवारीनुसार, कोरोना महामारीमुळे जीव गमावलेल्यांची संख्या वाढून 4 लाख 64 हजार 153 वर पोहोचली आहे. आकडेवारीनुसार, आतापर्यंत एकूण 3 कोटी 38 लाख 73 हजार 890 रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत. देशव्यापी लसीकरण मोहिमेंतर्गत, आतापर्यंत 113 कोटींहून अधिक लसींचे डोस देण्यात आले आहेत. काल 67 लाख 82 हजार 42 डोस देण्यात आले, त्यानंतर आतापर्यंत 113 कोटी 68 लाख 79 हजार 685 डोस लसीचे डोस देण्यात आले आहेत.
कोविशिल्डच्या दोन डोसमधील अंतर कमी करा, राजेश टोपेंची मोदी सरकारकडे मागणी
कोविड प्रतिबंधात्मक कोविशिल्ड लशीच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे, अशी मागणी राज्याचे आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांच्याकडे केली आहे. मंगळावरी राजेश टोपे यांनी केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडविया यांची निर्माण भवन येथे भेट घेतली. याभेटीदरम्यान राजेश टोपे यांनी राज्यातील परिस्थितीची माहिती मनसुख मांडविया यांना माहिती दिली. यावेळी त्यांनी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्याची मागणी केली.
राजेश टोपे यांनी मंगळवारी केंद्रीय मंत्री मांडविया यांना राज्यातील कोरोना परिस्थितीबद्दल माहिती दिली. त्याशिवाय कोरोनावर मात करण्यासाठी राज्य शासनाने केलेल्या उपाययोजना, लसीकरणाच्या बाबतीत मुंबई महानगरपालिकेने केलेले उल्लेखनीय काम यासारख्या विविध मुद्यांबाबत सविस्तर माहिती दिली. कोरोना लसीकरणाला वेग येण्यासाठी कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर कमी करावे, अशी विनंती केली. कोविशिल्ड लसीच्या दोन डोसमधील अंतर 84 दिवसांवरुन 28 दिवस करता येईल का? याबाबत फेरविचार करवा, जेणेकरुन लसीकरणाला वेग येईल, असं मत राजेश टोपे यांनी व्यक्त केलं. काही देशांमध्ये लसीकरणाच्या दोन डोसमधील अंतर कमी करण्यात आलेय. त्याप्रमाणे आपल्या देशातही विचार व्हावा. परदेशी नोकरी अथवा शिक्षणासाठी जाणारे नागरिकांसाठी दोन मात्रांमधील अंतर कमी करण्यात आले आहे, त्याचप्रमाणे याचाही विचार व्हावा, अशी विनंती राजेश टोपे यांनी मांडविया यांना केली.
महत्त्वाच्या इतर बातम्या :