लहान मुलांवरील कोरोना लसीच्या चाचणीचा परिणाम चांगला, CSIRचे प्रमुख डॉ. शेखर मांडे यांची माहिती
Corona vaccine Update : लहान मुलांवर जी चाचणी सुरू आहे त्याचेही रिझल्ट चांगले येत आहेत असं CSIR चे संचालक डॉ. शेखर मांडे यांनी म्हटलं आहे. डॉ. मांडे यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला.
Corona vaccine Update : लहान मुलांवर जी चाचणी सुरू आहे त्याचेही रिझल्ट चांगले येत आहेत. या लसीचे रिजल्ट असेच राहिले तर लवकरच मान्यता मिळेल यात शंका नाही. इतर देशांच्या तुलनेत आपण मागे आहोत असेही नाही, असं ते म्हणाले. लवकरात लवकर लहान मुलांना लसीकरण करु शकलो तर चांगली गोष्ट आहे, मात्र आपण यात मागे नाहीत, असं CSIR चे संचालक डॉ. शेखर मांडे (DR Shekhar Mande)यांनी म्हटलं आहे. डॉ. मांडे यांनी एबीपी माझाशी एक्स्क्लुझिव्ह संवाद साधला.
डॉ. शेखर मांडे यांनी म्हटलं की, शंभर कोटी डोसचा पहिला टप्पा आपण पार केला आहे. आता पुढचं लक्ष 200 कोटी डोसेसचं आहे. पुढच्या दोन ते तीन महिन्यात आपण ते पार करावं असं टार्गेट आहे, असं ते म्हणाले. त्यात बहुतांश लोकांचे दुसरे डोसही कव्हर होतील, असंही ते म्हणाले.
डॉ. शेखर मांडे यांनी म्हटलं की, अजून काही लसींवर जोरात काम सुरू आहे. एमक्युअर नावाची कंपनी आहे. त्यांचेही पहिल्या फेज मधले रिझल्ट चांगले आहेत. लसीचं आपल्या देशात खूप चांगलं काम सुरु आहे. कोवॅक्सिनला जागतिक आरोग्य संघटनेची मंजुरी ही आनंदाचीच गोष्ट आहे. हाफ डेड व्हायरस वापरून लस वर्षानुवर्ष तयार केली जाते. जगात आपण ही टेक्निक पहिल्यांदा कोरोना काळात दाखवून दिली, असं ते म्हणाले.
मांडे यांनी म्हटलं की, रशिया आणि ब्रिटनमध्ये केसेस वाढत आहेत. पण ब्रिटनमध्ये लसीकरण योग्य झालेला आहे. आकडे वाढत असतानाही मृत्यूचे प्रमाण खूप कमी आहे. डेथ रेट 10 ते 20 टक्क्यांनी कमी झाला आहे. त्यांनी म्हटलं की, तिसऱ्या लाटेची शक्यता नेहमीच राहील. ती किती गंभीर असेल हे सांगता येत नाही. कोरोना आता एंडेमिक स्टेजवर आहे असं वैज्ञानिक म्हणतात, म्हणजे दरवर्षी ही लाट येत राहील पण त्याचा प्रभाव लसीकरणामुळे कमी होईल, असं डॉ मांडे म्हणाले.