Corona Cases In India: वाढत्या कोरोना रुग्णांच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान मोदी साधणार मुख्यमंत्र्यांशी संवाद
देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत.
Corona Cases In India: देशात कोरोना रुग्णांचा कमी झालेला धोका पुन्हा वाढत आहे. देशात कोरोना रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत असल्याचे चित्र दिसत आहे. या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी संवाद साधणार आहेत. येत्या बुधुवारी (27 एप्रिल) पंतप्रधान व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे मुख्यमंत्र्यांसोबत बैठक घेणार आहेत. केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने दिलेल्या माहितीनुसार शनिवारी देशात 2 हजार 527 नवीन कोरोना रुग्णांची नोंद झाली होती. त्यामुळे नागरिकांना काळजी घेण्याचे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
देशात दिल्लीसह हरियाणा आणि उत्तर प्रदेशमध्येही मास्क घालणं बंधनकारक केलं आहे. तसंच पंजाब सरकारनं देखील लोकांना गर्दीच्या ठिकाणी मास्क घालावा असा सल्ला दिला आहे. तज्ञांनी दिलेल्या माहितीनुसार, सध्या देशात कोरोना पुन्हा वाढू लागला आहे. मास्क मुक्ती, शाळा सुरु करणं, कार्यक्रमांवरील बंधने हटवल्याने कोरोनाची रुग्णसंख्या वाढू लागली असल्याचं तज्ञांचं म्हणणं आहे. कोरोनाच्या वाढत्या केसेस पाहता दिल्ली सरकारनं सार्वजनिक ठिकाणी मास्क न घालणारांना 500 रुपयांचा दंड ठोठावण्याचे आदेश दिले आहेत.
केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने आकडेवारीनुसार, शनिवारी देशात 2 हजार 527 कोरोना रुग्णांची नोंद करण्यात आली आहे. त्यामुळे आत्तापर्यंत भारतातील कोरोना रुग्णांची एकूण संख्या ही 4 कोटी 30 लाख 54 हजार 952 वर पोहोचली आहे. तर सध्या देशात सक्रिय रुग्णांची संख्या ही 15 हजार 79 पर्यंत वाढली आहे. आत्तापर्यंत कोरोनामुळे देशात 5 लाख 22 हजार 149 रुग्णांचा मृत्यू झाला आहे. तर 4 कोटी 25 लाख 17 हजार 724 लोक कोरोनातून बरे झाले आहेत.
देशाची राजधानी दिल्लीत पुन्हा एकदा कोरोनाचे रुग्ण वाढू लागले आहेत. दिल्लीत गेल्या 24 तासात कोरोनाचे 1 हजार 42 नवीन रुग्ण आढळले आहेत. त्याचवेळी विषाणूमुळे दोन जणांचा मृत्यू झाला आहे. सध्या दिल्लीत संसर्गाचा दर 4.64 टक्क्यांवर गेला आहे. महाराष्ट्रात काल 194 नव्या कोरोना (Corona Update) रुग्णांची नोंद झाली आहे. तर 141 रुग्ण कोरोनामुक्त होऊन घरी परतले आहेत.
महत्त्वाच्या बातम्या: