Constitution Day : भारताचं संविधान जगात भारी! आज संविधान दिन; जाणून घ्या या दिवसाचा इतिहास आणि रंजक गोष्टी
Constitution Day : आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपलं संविधान कसं तयार केलं म्हणजेच त्याचा इतिहास काय आहे आणि याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया...
History of the constitution of india : 26 नोव्हेंबर, 1949 आणि 26 जानेवारी, 1950, भारतीय संविधानाच्या इतिहासातील हा दोन महत्त्वाच्या तारखा आहेत. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी आपण संविधानाचा स्वीकार केला होता तर 26 जानेवारी, 1950 रोजी तो लागू करण्यात आलं. संविधान ज्या दिवशी स्वीकारलं त्या तारखेला म्हणजे 26 नोव्हेंबरला संविधान दिन साजरा केला जातो आणि 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिन. भारत सरकारने 2015 मध्ये 'संविधान दिन' साजरा करण्यास सुरुवात झाली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या योगदानाचा सन्मान करण्यासाठी आणि संविधानाच्या महत्त्वाचा प्रसार करण्यासाठी 'संविधान दिन' साजरा केला जातो. आज संविधान दिनाच्या निमित्ताने आपलं संविधान कसं तयार केलं म्हणजेच त्याचा इतिहास काय आहे आणि याच्याशी संबंधित काही रंजक गोष्टी जाणून घेऊया...
1946 मध्ये ब्रिटिशांनी भारताला स्वतंत्र करण्याबाबत गांभीर्याने विचार सुरु केला. ब्रिटीश सरकारने एक कॅबिनेट मिशन भारतात पाठवल्यानंतर याची सुरुवात झाली. कॅबिनेट मिशनला ब्रिटीश सरकार आणि भारताच्या विविध राज्यांच्या प्रतिनिधींना भेटायचं होतं. या प्रतिनिधींना भेटून भारतीय संविधानाचा मसुदा तयार करण्याच्या हेतूने, संविधान सभेच्या स्थापनेबाबत चर्चा करायची होती.
संविधान सभेची स्थापना
1946 मध्ये कॅबिनेट मिशन प्लॅननुसार, संविधान सभेची स्थापना करण्यात आली. डॉ.राजेंद्र प्रसाद यांची सभेचे स्थायी अध्यक्ष आणि डॉ. भीमराव आंबेडकर यांची प्रारुप समितीचे अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली. मसुदा तयार करण्यासाठी 13 समित्यांची स्थापना केली. सुरुवातीला संविधान सभेत एकूण 389 सदस्य होते. यामध्ये संस्थानांचे 292 प्रतिनिधी, राज्यांचे 93 प्रतिनिधी, संस्थानांच्या मुख्य आयुक्तांचे तीन, बलुचिस्तानच्या एका प्रतिनिधींचा समावेश होता. यानंतर मुस्लीम लीगने स्वत:ला यापासून वेगळं केलं. त्यामुळे संविधान सभेच्या सदस्यांची संख्या 299 एवढीच राहिली. या सभेसाठी अंदाजे एक कोटी रुपयांचा खर्च झाला होता.
पहिला मसुदा आणि चर्चा
जानेवारी 1948 मध्ये भारताच्या संविधानाचं पहिलं प्रारुप चर्चेसाठी मांडलं. यावर 4 नोव्हेंबर, 1948 रोजी चर्चा सुरु झाली आणि 32 दिवस चालली. या कालावधीत 7,635 सुधारणा प्रस्तावित केल्या, ज्यापैकी 2,473 वर विस्ताराने चर्चा झाली. 2 वर्ष, 11 महिने आणि 17 दिवस संविधान सभेची बैठक झाली, यादरम्यान संविधानाला अंतिम स्वरुप देण्यात आलं.
संविधानावर स्वाक्षरी आणि स्वीकार
24 जानेवारी, 1950 रोजी संविधान सभेच्या 284 सदस्यांनी भारताच्या संविधानावर स्वाक्षरी केली. स्वाक्षरी करणाऱ्यांमध्ये 15 महिला सदस्यांचाही समावेश होता. 26 नोव्हेंबर, 1949 रोजी संविधानाचा स्वीकार करण्यात आला आणि दोन महिन्यांनी म्हणजेच 26 जानेवारी, 1950 संविधान लागू केलं.