(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Congress Agitation : राहुल गांधींच्या समर्थनार्थ काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर, भाजपविरोधी जोरदार घोषणाबाजी
नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. त्यानंतर राहुल गांधी आज ईडीपुढं जबाब नोंदवणार आहेत. याविरोधात काँग्रस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत.
Congress Agitation : नॅशनल हेराल्डप्रकरणी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांना ईडीनं समन्स बजावलं आहे. त्यानंतर राहुल गांधी आज ईडीपुढं जबाब नोंदवणार आहेत. याविरोधात काँग्रस कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. देशभरात राहुल गांधींच्या समर्थनार्थ कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. महाराष्ट्रातही काँग्रेस कार्यकर्ते राहुल गांधींच्या समर्थनार्थ रस्त्यावर उतरले आहेत. नागपुरातही काँग्रेसने जोरदार आंदोलनाची जोरदार तयारी केली आहे. दरम्यान, दिल्लीतही काँग्रेस कार्यकर्ते रस्त्यावर उतरले आहेत. काँग्रेसचे बडे नेते यामध्ये सहभागी झाले आहेत.
महाराष्ट्र काँग्रेसनेही याविरोधात जोरदार आंदोलन केलं आहे. सुनो तानाशाहा, तोतों से डरा न पाओगे तुम हाथकंडों से हमें झुका ना पाओगे असे म्हणत भाजपविरोधी घोषणाबाजी केली आहे. नॅशनल हेराल्ड प्रकरणी काँग्रेसचे नेते राहुल गांधी हे आज ईडीसमोर (ED) आपला जबाब नोंदवणार आहेत. राहुल गांधी ईडीच्या कार्यालयाकडे रवाना झाले आहेत. या विरोधात काँग्रेसचे कार्यकर्ते चांगलेच आक्रमक झाले आहेत. राहुल गांधी यांना ईडीनं पाठवलेल्या समन्स विरोधात काँग्रेस नेते आणि कार्यकर्ते दिल्लीत मोर्चा काढणार होते. मात्र, दिल्ली पोलिसांनी या मोर्चाला परवानगी नाकारली आहे. त्यानंतर काँग्रेस कार्यकर्त्यांनी राहुल गांधींच्या घरासमोर एक पोस्टर लावले आहे. हे पोस्टर सगळ्यांचे लक्ष वेधून घेत आहे. या पोस्टरवर 'सत्य झुकेगा नही'! असं लिहलं आहे.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते पी. चिदंबरम यांनी पीटीआय या वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत सांगितले की, मनी लाँड्रिंग प्रकरणी राहुल गांधींना ईडीने पाठवलेले समन्स 'निराधार' आहेत. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीत विरोधी पक्षांमध्ये ऐक्य निर्माण करण्यासाठी सर्वतोपरी प्रयत्न केले पाहिजेत आणि ते केले जातील, असे चिदंबरम म्हणाले.
सोनिया गांधी उपस्थित राहणार नाहीत
काँग्रेस नेते राहुल गांधी यांना नॅशनल हेराल्ड प्रकरणी ईडीनं नोटीस बजावली आहे. राहुल गांधी यांना यापूर्वी दोन जून रोजी चौकशीसाठी बोलावलं होतं. पण ते विदेश दौऱ्यावर असल्यामुळं त्यांनी ईडीकडं वेळ वाढवून मागितली होती. त्यानंतर ईडीनं त्यांना 13 जूनला हजर राहण्याचे निर्देश दिले होते. दुसरीकडे, सोनिया गांधी यांनाही ईडीनं नोटीस बजावली आहे. काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी ईडीसमोर उपस्थित राहण्यासाठी आणखी वेळ मागितला आहे. कारण त्यांना कोरोनाची लागण झाली असून अद्याप त्या कोरोनामुक्त झाल्या नाहीत.