Congress : सोनिया गांधी राजीनामा देणार असल्याची बातमी चुकीची आणि तथ्यहीन; काँग्रेसचे स्पष्टीकरण
Sonia Gandhi : गांधी परिवारातील तीनही सदस्य आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची चर्चा सुरू आहे. त्यावर आता काँग्रेसने स्पष्टीकरण दिलं आहे.
नवी दिल्ली: रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक होणार असून या बैठकीत सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी राजीनामा देणार असल्याचं वृत्त काही ठिकाणी प्रसिद्ध झालं असून ते चुकीचं आणि तथ्यहीन असल्याचं काँग्रेसचे प्रवक्ते रणदीप सुरजेवाला यांनी स्पष्ट केलं आहे.
रणदीप सुरजेवाला यांनी एका ट्वीटच्या माध्यमातून काँग्रेस पक्षाची भूमिका स्पष्ट केली आहे. ते म्हणाले की, "एनडीटीव्हीच्या हवाल्याने राजीनाम्याच्या ज्या काही बातम्या प्रसिद्ध होत आहेत त्या चुकीच्या आणि तथ्यहीन आहेत. एका टीव्ही चॅनेलने सत्ताधारी भाजपच्या अशा प्रकारच्या चुकीच्या प्रचाराला बळी पडणे हे गंभीर आहे."
काय आहे बातमी?
पाच राज्यांमध्ये झालेला पराभव काँग्रेसच्या चांगलाच जिव्हारी लागल्याचं चित्र आहे. याची जबाबदारी घेऊन सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी आपापल्या पदाचा राजीनामा देणार असल्याची माहिती एनडीटीव्हीने प्रसिद्ध केले होते. विधानसभा निवडणुकीत काँग्रेसच्या पराभवावर विचारमंथन करण्यासाठी काँग्रेस नेत्या सोनिया गांधी यांनी रविवारी काँग्रेस वर्किंग कमिटीची बैठक बोलावली आहे. त्यामध्ये हे तिघेही आपल्या पदाचा राजीनामा देणार असल्याचं एनडीटीव्हीच्या वृत्तामध्ये सांगितलं होतं.
उत्तर प्रदेश , उत्तराखंड, पंजाब, गोवा आणि मणिपूर विधानसभा निवडणुकीत काँग्रेसचा दारूण पराभव झाला आहे. पंजाबसारखं मोठं राज्यही काँग्रेसच्या हातून गेलं आहे, तर गोव्यामध्ये अपेक्षित कामगिरी करता आली नाही. उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी जोरदार प्रचार केला. पण त्या राज्यामध्ये पक्षाला केवळ दोन जागा मिळाल्या, त्यांना दुहेरी आकडाही गाठता आला नाही. काँग्रेसचा बालेकिल्ला असलेल्या अमेठी आणि रायबरेली या ठिकाणीही काँग्रेसला पक्षाचे उमेदवार निवडून आणता आले नाहीत
संबंधित बातम्या:
- Congress : पाच राज्यांतील पराभव काँग्रेसच्या जिव्हारी; सोनिया गांधी, राहुल गांधी आणि प्रियंका गांधी उद्या राजीनामा देणार?
- Yashwantrao Chavan : हिमालयाच्या मदतीला सह्याद्री धावला! दगाबाज चीनच्या बंदोबस्तासाठी यशवंतराव जेव्हा दिल्लीत पोहोचले
- Congress : पाच राज्यांतील पराभवावर काँग्रेस करणार विचारमंथन, उद्या दुपारी 4 वाजता बैठक