(Source: ECI/ABP News/ABP Majha)
राहुल गांधी यांनी एकाच दिवसात अनेक नेते, सहकारी, पत्रकारांना अनफॉलो केलं; काय आहे कारण?
काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी एकाच दिवसात पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेते, निकटवर्तीय आणि पत्रकारांना अनफॉलो केलं आहे.
नवी दिल्ली : काँग्रेसचे खासदार आणि माजी अध्यक्ष राहुल गांधी सध्या आपल्या ट्विटर हॅण्डलमुळे चर्चेत आहेत. राहुल गांधी यांनी एकाच दिवसात पक्षाच्या अनेक वरिष्ठ नेते, निकटवर्तीय आणि पत्रकारांना अनफॉलो केलं आहे. यानंतर राजकीय अटकळ बांधण्यास सुरुवात झाली आहे. परंतु राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट रिफ्रेश केलं जात आहे, त्यामुळे अनेक अकाऊंट अनफॉलो केल्याचं पक्षाने म्हटलं आहे. रिफ्रेशची प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर त्यांना पुन्हा एकदा फॉलो केलं जाईल, असं पक्षातर्फे सांगण्यात आलं आहे.
ज्या लोकांना राहुल गांधी यांच्या ट्विटर हॅण्डलवरुन अनफॉलो करण्यात आलं आहे त्यामध्ये त्यांच्या कार्यालयात काम करणारे सहकारी आणि कर्मचाऱ्यांचाही समावेश आहे. राहुल गांधी यांनी आपले प्रमुख सहकारी केबी बायजू, निखिल आणि निवेदिता अल्वा, कौशल विद्यार्थी यांच्यासह अलंकार सवाई यांना अनफॉलो केलं आहे. मात्र पक्षातील अनेक नेत्यांनी अनफॉलो केल्याबाबत प्रश्न उपस्थित केले आहेत. तर काही वरिष्ठ नेत्यांनी राहुल गांधी यांच्यावर पक्षपात केल्याचा आरोप केल्याचं वृत्त होतं. त्याविरोधात राहुल गांधी यांनी ही कारवाई केल्याचं म्हटलं जात आहे. काँग्रेसमध्ये युवा आणि ज्येष्ठ नेत्यांमध्ये वाद सुरु झाल्याचे हे संकेत असल्याचीही चर्चा आहे.
याशिवाय राहुल गांधी यांना असे अनेक नेते फॉलो करत होते, ज्यांचं निधन झालं आहे. यामध्ये तरुण गोगोई, अहमद पटेल आणि राजीव सातव यांचा समावेश आहे.
फोलोईंगच्या संख्येत घट
राहुल गांधी यांच्या ट्विटर अकाऊंटवर फोलो करणाऱ्यांच्या संख्येत सातत्याने बदल होत आहे. मंगळवारी (1 जून) सकाळी राहुल गांधी 281 जणांना फॉलो करत होते. यानंतर संध्याकाळी ही संख्या आणखी कमी झाली. बुधवारी (2 जून) संध्याकाळपर्यंत या संख्येत घट होऊन 219 एवढी झाली. मात्र या दरम्यान राहुल गांधई ट्विटरवर सातत्याने सक्रियही दिसत होते. तर राहुल गांधी यांच्या फॉलोअर्सची संख्या 1.88 कोटी एवढी आहे.
अकाऊंट रिफ्रेश केलं जातंय : काँग्रेस
काँग्रेस सूत्रांच्या माहितीनुसार, राहुल गांधी यांचं ट्विटर अकाऊंट रिफ्रेश केलं जात आहे. त्यामुळेच त्यांच्या अकाऊंटवरुन अनेकांना अनफॉलो केलं आहे. लवकरच नव्या रणनीतीसह ते परततील आणि नव्या यादीअंतर्गत लोकांना फॉलोही करतील. ज्यांना सध्या अनफॉलो केलं आहे, अशा लोकांचाही नव्याने फॉलो करणाऱ्यांमध्ये समावेश असू शकतो.
राहुल गांधी या नेत्यांना फॉलो करतात
राहुल गांधी यांनी अनेक नेत्यांना अनफॉलो केलं असलं तरी त्यांच्या फॉलोअर्सच्या यादीत अनेक मोठ्या नेत्यांचा समावेश आहे. यामध्ये खासदार मनिकम टागोर, शक्तीसिंह गोहिल आणि ओमन चांडी यांसारखे नेते आहेत. याशिवाय अभिषेक मनु सिंघवी आणि पवन खेडा हे प्रवक्ते आहेत. तसंच तृणमूल काँग्रेसचे नेते डेरेक ओ ब्रायन यांच्यासह डीएमकेच्या कनिमोळी यांनाही राहुल गांधी फॉलो करतात.