(Source: ECI/ABP News/ABP Majha)
श्रीकृष्णाने अर्जुनाला जिहाद शिकवला, शिवराज पाटील यांचं वादग्रस्त वक्तव्य
Shivraj patil chakurkar : शिवराज पाटील यांच्याकडून गीतेची तुलना जिहादशी, श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे, असेही त्यांनी म्हटले.
Shivraj patil chakurkar : श्रीकृष्णानं अर्जुनाला जिहाद शिकवला, असं वादग्रस्त वक्तव्य माजी केंद्रीय गृहमंत्री शिवराज पाटील चाकूरकर यांनी केलं आहे. दिल्लीमधील एका आयोजित कार्यक्रमात पाटील यांनी हे धक्कादायक वक्तव्य केलं आहे. यामुळे आता शिवराज पाटील चाकूरकर यांच्यावर टीका होत असून राजकीय वादाची शक्यता निर्माण झालीय.
शिवराज पाटील यांनी गीतेत श्रीकृष्णाने अर्जुनाला दिलेल्या उपदेशांची तुलना जिहादशी केली. फक्त कुराण आणि बायबलमध्ये जिहाद नसून श्रीकृष्णही अर्जुनाला जिहाद सांगायचे, अशा आशयाचं वक्तव्य शिवराज पाटील यांनी केलं आहे. शिवराज पाटील यांच्या या वक्तव्यामुळे आता नवा वाद सुरु होण्याची चिन्ह आहेत.
मोहसिना किडवई यांच्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमामध्ये बोलताना शिवराज पाटील यांनी बायबल आणि गीता यांची तुलना केली. पाटील म्हणाले की, महाभारत ग्रंथामध्ये सांगण्यात गीतेचा भाग समाविष्ट आहे. याच गीतेमध्ये श्रीकृष्ण अर्जुनाला जिहादच्या गोष्टी सांगत आहे.
काय म्हणाले पाटील?
"मनामध्ये कोणतीही किल्मिष नसतानासुद्धा एक मन सांगतं गोष्टी योग्य आहेत. तर दुसरं मन सांगतं गोष्टी अयोग्य आहेत. याच सगळ्या गोष्टींचा ऊहापोह करताना जेव्हा शक्तीचा वापर करावाच लागतो, तेव्हा तो करावाच लागतो. हे फक्त कुराणमध्येच नाही तर गीतेमध्येही सांगण्यात आलेलं आहे." श्रीकृष्ण अर्जुनाला जो जिहाद सांगायचे तो केवळ फक्त कुराणात नाही तर येशू ख्रिस्तांनी सांगितलेल्या बायबलमध्येही आहे, असेही त्यांनी म्हटले.
शिवराज पाटील आणि वाद -
शिवराज पाटील चाकूरकर आणि वाद हे समीकरण नवीन नाही. याआधीही अनेकदा त्यांनी वाद ओढावून घेतला आहे. मुंबईमध्ये सर्वात मोठा दहशतवादी हल्ला सुरु होता, तेव्हा गृहमंत्री असलेले शिवराज पाटील चाकूरकर कपडे बदलण्यामुळे चर्चेत आले होते. दहशतवादी हल्ला झाल्यानंतर केंद्रीय गृहमंत्रालयाची आपातकालीन बैठक बोलवण्यात आली होती. इतक्या महत्वाच्या बैठकीला चाकूरकर उशीराने पोहचले होते, कारण ते सूट बदलण्यात व्यस्त होते. दहशतावादी हल्ला झाला त्या दिवशी गृहमंत्रालयाच्या पाच बैठका झाल्या होत्या, या सर्व बैठकामध्ये चाकूरकर वेगवेगळ्या पोशाषात उपस्थित होते. यावरुन त्यांच्यावर टीकेची झोड उठली होती. या सगळ्या गदारोळानंतर त्यांच्याकडून यूपीआय सरकारनं गृहमंत्रीपदाचा राजीनामा घेतला होता.
इतकेच नाही तर मुंबईप्रमाणेच दिल्लीमधील सिलसिलेवार भागातही बॉम्बस्फोट झाला होता, त्यावेळी सगळ्या ठिकाणी एकच हल्लकल्लोळ माजला होता. नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण होतं, पण अशा वातावरणातही तत्कालीन गृहमंत्री शिवराज पाटील यांचं सर्व लक्ष पोशाखावर होतं. यावेळीदेखील दोन तासात त्यांनी तीन वेळा सूट बदलला होता.