(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Sonia Gandhi: काँग्रेसचा मोठा डाव, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाणार?
Sonia Gandhi : काँग्रेस नेत्या सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. चर्चांना उधाण आलं असून राजकीय वर्तुळात खळबळ माजली आहे.
Congress Leader Sonia Gandhi : नवी दिल्ली : आगामी राज्यसभा (Rajya Sabha Election 2024) आणि लोकसभा (Lok Sabha Elections 2024) निवडणुकांच्या (Elections) पार्श्वभूमीवर काँग्रेसच्या (Congress) गोटात मोठी खलबतं पाहायला मिळत आहे. काँग्रेसच्या (Congress) माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी (Sonia Gandhi) यांचं राज्यसभेवर जाणार असल्याचं बोललं जात आहे. सोनिया गांधी यांचं जाणं जवळपास निश्चित झालं असल्याची माहिती समोर येत आहे. सोनिया गांधी लोकसभा निवडणूक लढवणार नसून राजस्थानमधून (Rajasthan) राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चांना उधाण आलं आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, काँग्रेसच्या माजी हंगामी अध्यक्षा सोनिया गांधी यांचं राज्यसभेवर जाणं जवळपास निश्चित झालं आहे. तसेच, सोनिया गांधी राजस्थानमधून राज्यसभेवर जाण्याची शक्यता आहे. दरम्यान, यापूर्वीही सोनिया गांधी राज्यसभेवर जाणार असल्याच्या चर्चा सुरू होत्या. त्यावेळी सोनिया गांधी हिमाचल प्रदेशमधून राज्यसभेवर जाणार असल्याचं सांगितलं जात होतं. त्यावेळी काँग्रेसच्या वतीनं सांगण्यात आलं होतं की, सोनिया गांधींच्या प्रकृती अस्वास्थामुळे त्या लोकसभा निवडणुका लढवण्याची शक्यता फारच कमी आहे. त्यामुळे त्या राज्यसभेवर जाण्याचा मार्ग निवडू शकतात.
एप्रिल-मे 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणूक लढणं आणि त्यासाठी प्रचार करणं प्रकृती अस्वास्थामुळे सोनिया गांधींना शक्य नसल्याचं बोललं जात आहे. सोनिया गांधींच्या लोकसभा निवडणूक लढवण्यावरुन सध्या अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. तसेच, सोनिया गांधी जर राज्यसभेवर जाणार असतील, तर त्यांचा मतदारसंघ उत्तर प्रदेश रायबरेलीमधून लोकसभेसाठी काँग्रेसमधून कोणाची वर्णी लागू शकते? यावरही राजकीय वर्तुळात चर्चा सुरू आहेत. जर सोनिया गांधी रायबरेलीतून निवडणूक लढवणार नाहीत, तर तिथून कोण निवडणूक लढवणार? तिथून त्यांची मुलगी आणि काँग्रेस नेत्या प्रियांका वाड्रा गांधी यांना संधी मिळण्याची शक्यता वर्तवली जात होती.
रायबरेलीवर 66 वर्षांपासून काँग्रेसचंच वर्चस्व
सोनिया गांधी सध्या उत्तर प्रदेशातील रायबरेलीच्या खासदार आहेत. रायबरेलीची जागा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखली जाते. गेली अनेक दशकं या जागेवर काँग्रेसचंच वर्चस्व आहे. गेल्या चार निवडणुकांत सोनिया येथून विजयी होत आहेत. येथील प्रत्येक निवडणुकीत त्यांना 50 टक्क्यांहून अधिक मतं मिळाली आहेत. देशात आतापर्यंत झालेल्या 17 लोकसभा निवडणुकांमध्ये 3 निवडणुका वगळता ही जागा प्रत्येक वेळी काँग्रेसकडे आहे. देशाच्या 72 वर्षांच्या निवडणुकीच्या इतिहासात उत्तर प्रदेशची रायबरेली ही जागा 66 वर्षांपासून काँग्रेसकडेच आहे.
रायबरेली गांधी कुटुंबाचा परंपरागत मतदारसंघ
खरं तर रायबरेलीची जागा काँग्रेस आणि गांधी परिवारासाठी सुरुवातीपासूनच खास आहे. गांधी कुटुंबाचं या मतदारसंघाशी गेल्या अनेक वर्षांपासूनचं नातं आहे. सोनिया गांधींपूर्वी फिरोज गांधी (जवाहरलाल नेहरूंचे जावई), इंदिरा गांधी, अरुण नेहरू, शीला कौल (कमला नेहरूंच्या भावाच्या पत्नी) असे गांधी कुटुंबातील अनेक लोक याच जागेवरुन निवडणूक लढले आहेत. तिथून या जागेवरून फक्त गांधी कुटुंब आणि त्यांचे नातेवाईक निवडणूक लढले होते.