आधी ज्योतिरादित्य, आता जितीन प्रसाद... राहुल गांधींच्या टीममधला आणखी एक युवा नेता भाजपवासी
एखाद्या राज्याची निवडणूक जवळ आली की तिथल्या अनेक बड्या नेत्यांचे भाजप प्रवेश सुरु होतात. पश्चिन बंगालच्या निवडणुकीतही अशी रांग लागली होती. आता जितीन प्रसाद यांच्या प्रवेशानं भाजपला किती फायदा होतो हे पाहावं लागेल.

नवी दिल्ली : काँग्रेसचा आणखी एक नेता आज भाजपमध्ये सामील झालाय. कधीकाळी राहुल गांधी यांच्या जवळच्या वर्तुळातले मानले जाणारे जितीन प्रसाद हे भाजपवासी झालेत. आधी ज्योतिरादित्य शिंदे आणि आता जीतिन प्रसाद.अवघ्या सव्वा वर्षाच्या काळात राहुल गांधींचे दोन युवा साथीदार भाजपमध्ये दाखल झालेत. यूपीच्या निवडणूका आता सहा महिन्यांवर आहेत. त्या डोळ्यासमोर ठेवत भाजपने काँग्रेसचा हा मासा गळाला लावलाय. आज भाजप मुख्यालयात केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या उपस्थितीत हा प्रवेश पार पडला.
जीतिन प्रसाद यांच्या जाण्यानं काँग्रेसचं किती नुकसान?
47 वर्षांचे जीतिन प्रसाद हे यूपीएच्या काळात केंद्रात राज्यमंत्री होते. उत्तर प्रदेशच्या लखीमपूर जिल्ह्यातला धरोहरा हा त्यांचा मतदारसंघ. त्यांचे वडील काँग्रेसचे ज्येष्ठ नेते, त्यांनी सोनिया गांधींविरोधात अध्यक्षपदाची निवडणूक लढवली होती. काँग्रेसमध्ये काही दिवसांपूर्वी सोनिया गांधींना पक्षाच्या कामकाजाबाबत पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांमध्ये त्यांचा समावेश होता.
एखाद्या राज्याची निवडणूक जवळ आली की तिथल्या अनेक बड्या नेत्यांचे भाजप प्रवेश सुरु होतात. पश्चिन बंगालच्या निवडणुकीतही अशी रांग लागली होती. आता जितीन प्रसाद यांच्या प्रवेशानं भाजपला किती फायदा होतो हे पाहावं लागेल. जितीन प्रसाद हे उत्तर प्रदेशात काँग्रेसचा मोठा ब्राम्हण चेहरा होते. भाजपचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ हे ठाकूर आहेत. उत्तर प्रदेशात ब्राम्हण समाज 13 टक्क्यांच्या आसपास आहे. आणि योगींचं सरकार आल्यापासून ब्राम्हणांना बेदखल केलं जात असल्याचा आरोप होतोय. त्यामुळे हे संतुलन जीतिन प्रसाद यांच्या प्रवेशानं साधलं गेलंय का असा प्रश्न आहे.
उत्तर प्रदेशात थेट प्रियंका गांधी याच महासचिव म्हणून काम करतायत. जीतिन प्रसाद हे लोकसभा निवडणुकीच्यावेळीही भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चा सुरु होत्या. पण त्यावेळी प्रियंका गांधींनी त्यांना थांबवल्याची चर्चा होती. अर्थात जितीन प्रसाद यांची खदखद सतत दिसतच राहिली. काँग्रेसमध्ये सोनिया गांधींना पत्र लिहिणाऱ्या 23 नेत्यांच्या गटात जितीन होते.
पंजाबमध्ये कॅप्टन अमरिंदर आणि सिद्धू यांच्यातल्या भांडणानं काँग्रेसची डोकेदुखी वाढली आहे. राजस्थानमध्ये एका वर्षानंतरही न्याय न मिळाल्यानं सचिन पायलट यांची कुरबुर पुन्हा सुरु झालीय. त्यात आता यूपीत जितीन प्रसाद यांच्यासारखा तरुण नेता साथ सोडून गेलाय. जीतिन प्रसाद 2014 ची लोकसभा, 2017 ची विधानसभा, 2019 ची लोकसभा निवडणूक पराभूत झाले होते. त्यांच्या जाण्यानं आता भाजपला किती फायदा होणार हे आता लवकरच कळेल.
महत्त्वाच्या बातम्या
ट्रेंडिंग न्यूज
