Fuel price : शेजारच्या देशांमध्ये भारतापेक्षाही इंधन स्वस्त; काँग्रेसची भाजपवर टीका
congress on fuel price hike : काँग्रेसने इंधन दरवाढीच्या मुद्यावरून सत्ताधारी भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. शेजारच्या देशांमध्ये कमी दरात इंधन उपलब्ध असल्याचा दावा काँग्रेसने केला आहे.
Petrol Diesel Price News: भारतात इंधन दरवाढीमुळे अनेकांचे बजेट कोलमडले आहे. पोटनिवडणुकांच्या निकालानंतर केंद्र सरकारने करात कपात करत काही प्रमाणात दिलासा देण्याचा प्रयत्न केला. मात्र, विरोधी पक्षांनी सरकारकडे इंधन दर आणखी कमी करण्याची मागणी केली आहे. काँग्रेसने केंद्र सरकारवर निशाणा साधताना शेजारच्या देशांमध्ये इंधन दर भारतापेक्षाही कमी असल्याचे म्हटले.
काँग्रेसने इंधन दराच्या मुद्यावरून भाजपवर टीकास्त्र सोडले आहे. भाजप खोटं बोलू शकते मात्र, आकडे खोटं बोलू शकत नाही, असे काँग्रेसने म्हटले. काँग्रेसने अफगाणिस्तान, श्रीलंका, बांगलादेश, पाकिस्तान, नेपाळ आणि भूतान या देशांतील पेट्रोल आणि डिझेल दराचे आकडे प्रसिद्ध करत भाजपवर निशाणा साधला आहे.
काँग्रेसने याबाबतचे ट्विट केले आहे. काँग्रेसच्या दाव्यानुसार, श्रीलंकेत पेट्रोलची किंमत 68.2 रुपये प्रति लीटर असून डिझेलची किंमत 41.1 रुपये प्रति लीटर आहे. अफगाणिस्तानमध्ये पेट्रोलची किंमत 62.5 रुपये प्रती लीटर असून डिझेलची किंमत 57.6 रुपये प्रती लीटर इतकी आहे. बांगलादेशमध्ये पेट्रोलची किंमत 77.7 रुपये प्रती लीटर असून डिझेलची किंमत 56.8 रुपये प्रती लीटर आहे.
पाकिस्तानमध्येही पेट्रोलचा प्रति लीटर दर 60.1 रुपये असून डिझेलची किंमत 58.7 रुपये प्रति लीटर आहे. नेपाळमध्ये पेट्रोलची किंमत प्रती लीटर 81.2 रूपये असून डिझेलची किंमत 70.5 रुपये प्रती लीटर आहे.
Remember, numbers don't lie, BJP does. #DefeatBJPSaveIndia pic.twitter.com/jVP25OBw76
— Congress (@INCIndia) November 6, 2021
पुन्हा इंधन दरवाढीचा भडका?
पुढील काही दिवसांत पेट्रोल आणि डिझेलच्या किंमतीमध्ये वाढ होण्याची शक्यता आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढणे, हे यामागील प्रमुख कारण असू शकतं. कोरोना महामारीमुळे आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किंमती वाढण्याची शक्यता तज्ज्ञांनी व्यक्ती केली आहे. त्यामुळे केंद्राने इंधन दरावरील करात काही प्रमाणात घट केली असली तरी त्याचा मोठा फायदा होणार नसल्याचे म्हटलं जातं आहे.