(Source: ECI/ABP News/ABP Majha)
IMD Weather Forecast: 'या' राज्यांत येणार थंडीची लाट, कुठे बरसणार पाऊस? हवामान विभागाने दिली माहिती
IMD Weather Forecast: हिमालय पर्वतरांगांना लागून असलेल्या राज्यांमध्ये सध्या सुरु असलेल्या बर्फवृष्टीमुळे तापमानात घट झाली आहे. त्यामुळे थंडीची लाट येण्याची शक्यता असल्याचा अंदाज हवामान विभागाकडून देण्यात आलाय.
मुंबई : देशातील अनेक राज्यांमध्ये येत्या काही दिवसांत थंडीची लाट (Cold Wave) येण्याची शक्यता आहे. तसेच 5 ते 11 जानेवारी दरम्यान मध्य भारतातील काही भागात तापमानात घट होण्याचा अंदाज हवामान विभागाकडून वर्तवण्यात आलाय. त्यामुळे काही दिवस कडाक्याच्या थंडीचा सामाना नागरिकांना करावा लागणार असल्याचं भारतीय हवामान विभागाकडून (IMD) सांगण्यात आलं आहे. याशिवाय कमी दाबाच्या भागात, विशेषत: लक्षद्वीपमध्ये येत्या 3 दिवसांत मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. लक्षद्वीप परिसरात 40 ते 50 किमी वेगाने वारे वाहणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आलीये.
एएनआयने दिलेल्या माहितीनुसार, भारतीय हवामान विभागाचे महासंचालक डॉ. मृत्युंजय महापात्रा यांनी सांगितले की, रात्रीचे रात्रीचे तापमान कमी होऊ शकते, ज्यामुळे मध्य भारताचा काही भाग आणि मैदानी भाग, विशेषत: मध्य प्रदेश, महाराष्ट्राचा उत्तरी भाग, उत्तर प्रदेशचा दक्षिण भाग तसेच हरियाणा आणि राजस्थानच्या आसपासच्या भागात थंडी वाढू शकते. त्याचप्रमाणे दिवसाचे तापमान हे सामान्य तापमानापेक्षा कमी राहण्याचा अंदाज वर्तवण्यात आलाय. त्याचप्रमाणे लक्षद्वीप परिसरात पावसाचा अंदाज असल्यामुळे या ठिकाणी मच्छिमारांनी समुद्रकिनारी न जाण्याचा सल्लाही हवामान तज्ज्ञांनी दिलाय.
#WATCH | Delhi: Dr Mrityunjay Mohapatra, DG, IMD says, " During 5-11th January, we are expecting night temperature to fall, it may lead to cold wave conditions in some parts of central India...day temperature will also be below normal leading to cold day conditions especially in… pic.twitter.com/ay9jFLmYcF
— ANI (@ANI) January 1, 2024
'या' राज्यांच्या किमान तापमानात घट होण्याची शक्यता
हवामान खात्याने जारी केलेल्या बुलेटिनमध्ये जानेवारी 2024 मधील तापमानाचा संभाव्य अंदाज देताना असे म्हटले आहे की, देशातील अनेक भागांमध्ये महिन्याचे किमान तापमान सामान्यपेक्षा जास्त राहण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातील काही भाग वगळता या ठिकाणी किमान तापमान सामान्य ते सामान्यपेक्षा कमी राहण्याची शक्यता आहे.
जानेवारीत 'या' राज्यांत पाऊस पडण्याची शक्यता
पूर्व आणि पश्चिम उत्तर प्रदेश, उत्तराखंड, हरियाणा, पंजाब, हिमाचल प्रदेश, जम्मू आणि काश्मीर व्यतिरिक्त, हवामान विभागाने जानेवारी महिन्यात लडाखमध्ये सामान्यपेक्षा जास्त पावसाचा अंदाज वर्तवला आहे. देशाच्या बहुतांश भागात सरासरीपेक्षा जास्त पाऊस पडण्याची शक्यताही हवामान खात्याने वर्तवली आहे. उत्तर-पश्चिम भारतातील काही भाग आणि ईशान्य भारतातील काही भाग वगळता, जेथे सामान्य ते सामान्यपेक्षा कमी पावसाची शक्यता आहे.