Devendra Fadnavis: शरद पवारांना सहकारी कारखाने कमी झाल्याची खंत, फडणवीस म्हणाले, तिकडे प्रोफेशनल काम होत नाही, नुसती खोगीरभरती
Devendra Fadnavis in Mumbai: सहकाराची मुहूर्तमेढ घटनेच्या १५० वर्षपुर्तीनिमित्त आयोजित 'सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण' विषयावरील परिसंवाद आयोजित करण्यात आला होता.

Devendra Fadnavis & Sharad Pawar: गेल्या काही वर्षांमध्ये राज्यातील सहकारी साखर कारखान्यांची संख्या कमी झाली आहे. पूर्वी राज्यात 80 टक्के सहकारी साखर कारखाने आणि 20 टक्के खासगी साखर कारखाने होते, अशी खंत ज्येष्ठ नेते शरद पवार (Sharad Pawar) यांनी व्यक्त केली होती. ते सोमवारी मुंबईतील (Mumbai) यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये दख्खनचा उठाव आणि सहकाराची मुहूर्तमेढ घटनेच्या 150 वर्षपुर्तीनिमित्त 'सहकाराचे सक्षमीकरण आणि राज्य शासनाचे धोरण' विषयावर आयोजित करण्यात आलेल्या परिसंवादात बोलत होते. शरद पवार यांच्या भाषणानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra Fadnavis) यांनी भाषण केले. यावेळी त्यांनी सहकारी साखर कारखान्यांमध्ये व्यावसायिक वातावरण नसल्याच्या त्रुटीवर बोट ठेवले.
राज्यात 50 टक्के सहकारी साखर कारखाने खाजगी झाले आहेत, हे शरद पवारांनी सांगितलं, हे खरं आहे. साखर उद्योगात केवळ साखरेवर कारखाना चालू शकत नाही. आता त्याच्याशी संबंधित आणि इतर व्यवसाय करावे लागणार आहेत. सहकारी कारखान्यात प्रोफेशनल काम पाहायला मिळत नाही. मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी खोगीरभरती पाहायला मिळत आहे, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले.
सावकारांनी शेतकऱ्यांना कर्जाच्या विळख्यात अडकवले. त्यावेळी शेतकऱ्यांमधे संतापाची भावना निर्माण झाली. त्यावेळी शेतकऱ्यांनी सावकार यांच्या विरोधात भूमिका घेतली. दोन वर्ष दख्खनच बंड सुरू झालं. त्यावेळी एक कार्यालय उघडण्यात आलं होत तिथ कोणत्या सावकाराकडे किती जमीन आहे हे पाहिलं जायच आणि ती कागदपत्रे ताब्यात घेऊन जाळली जात होती. देशात मोदी सरकार आल्यानंतर पहिल्यांदा सहकार विभागच वेगळं मंत्रालय करण्यात आले. अमित शाह यांच्या हातात याची जबाबदारी दिली. मोठ्या प्रमाणात त्यामुळे सहकार क्षेत्रात आपण पुढे गेलो आहोत, असा दावा देवेंद्र फडणवीस यांनी केला.
शरद पवार यांनी सहकारी साखर कारखान्यांसाठी एक समिती स्थापन करण्याची एक मागणी केली होती. ही मागणी देवेंद्र फडणवीस यांनी मान्य केली. सहकारी संस्थाच्या बळकटीकरण करण्यासाठी आम्ही एक समिती स्थापन करू आणि अभ्यास करू, असे देवेंद्र फडणवीस यांनी जाहीर केले.
सहकारात गैरप्रकार करुन सत्तेत येणाऱ्यांना सुतासारखं सरळ करा: अजित पवार
या कार्यक्रमात राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनीही महाराष्ट्रातील सहकार कारखान्यांबाबत भाष्य केले. आज सहकारामध्ये अमुलाग्र बदल होत आहेत. अजूनही काही बदल झाले पाहिजेत, अशा प्रकारची अनेकांची भावना आहे. इथे अनासकर यांनी सांगितलं की, संस्थेने चांगला नफा मिळवल्यानंतर संचालक बोर्डाला देखील त्या ठिकाणी काही मिळाले पाहिजे. त्याबद्दल देवेंद्रजी सांगतील. पण, ज्यावेळेस संस्था अडचणीत आणण्याचे काम संचालक बोर्ड करते. त्यावेळेस त्यांच्याकडून काहीतरी वसूल केलं पाहिजे. पण ते होत नाही. त्याला स्थगिती मिळते. मग संचालक बोर्ड सत्ता कोणाची आहे ते बघते आणि सहकार मंत्र्यांच्या पक्षाकडे ते जातात. हे कुठेतरी बंद झाले पाहिजे. माझे तर स्पष्ट मत आहे देवेंद्रजी... अशा पद्धतीने चुकीचे वागणारे लोक उद्या सत्ताधारी पक्षामध्ये येण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना थांबवलं पाहिजे. जरी प्रवेश दिला तरी त्यांच्यावर पुढची ॲक्शन झालीच पाहिजे. मग हे लोक सगळी सुतासारखी सरळ होतील, असे अजित पवार यांनी म्हटले.
आणखी वाचा
अजित पवारांसमोर शरद पवारांची मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांना विनंती, म्हणाले...
























