गुजरातमधील जुनागडमध्ये ढगफुटी, चार तासांत तब्बल 8 इंच पाऊस, गिरनार डोंगराळ भागात 14 इंच पाऊस; उत्तराखंड, राजस्थानमध्येही पावसाचा कहर सुरूच
गुजरातमधील जुनागड शहरात आज शनिवारी (22 जुलै) दुपारी ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार केला. अवघ्या 4 तासांत 8 इंच पाऊस कोसळला. त्याचबरोबर गिरनार पर्वतीय भागात 14 इंच पावसाची नोंद झाली.
Junagadh Gujarat Rain: महाराष्ट्रासह देशाच्या विविध भागात ढगफुटीसदृश्य पावसाचा हाहाकार सुरुच आहे. गुजरातमधील जुनागड शहरात आज शनिवारी (22 जुलै) दुपारी ढगफुटी सदृश्य पावसाने हाहाकार केला. अवघ्या 4 तासांत 8 इंच पाऊस कोसळला. त्याचबरोबर गिरनार पर्वतीय भागात 14 इंच पावसाची नोंद झाली. डोंगरावरून वाहणारे पाणी जुनागड शहरात पोहोचले तेव्हा पूरसदृश्य स्थिती निर्माण झाली. रस्त्यांवर उभी असलेली वाहने क्षणात पुराच्या स्वाधीन झाली. शहरातील सखल भागात 5 फुटांपर्यंत पाणी साचले आहे. एनडीआरएफचे पथक पुरात अडकलेल्या लोकांना बाहेर काढण्यात गुंतले आहे.
भवनाथ परिसरात अनेक जनावरे वाहून गेली
शहरातील भवनाथ परिसराला पुराचा सर्वाधिक फटका बसला आहे. येथील गोठ्यात गाईंसह अनेक जनावरे पाण्याच्या जोरदार प्रवाहात वाहून गेली. कडवा चौकाजवळील मुबारक पाड्याचीही अशीच अवस्था झाली. याठिकाणी सुमारे 6 फूट पाणी भरल्याने लोकांची घरे पूर्णपणे पाण्याखाली गेली असून त्यामुळे मोठ्या प्रमाणात आर्थिक नुकसान झाले आहे. पाण्याच्या जोरदार प्रवाहामुळे जुनागडमधून जाणारा कुंडाचा पूल बंद करण्यात आला आहे.
रस्त्यावर 3 ते 4 फूट पाणी तुंबले
शहरातील दुर्वेश नगर, गणेश नगर, जोशीपारा आदी भागातही पाणी साचले होते. येथे रस्त्यावर ३ ते ४ फूट पाणी तुंबले आहे. येथे एक तरुण वाहून गेला, त्याला स्थानिक लोकांनी वेळीच वाचवले. परिसरातील अनेक दुचाकीही वाहून गेल्या आहेत.
उत्तराखंडमध्येही ढगफुटीसदृश्य पाऊस
दुसरीकडे, उत्तराखंडच्या उत्तरकाशी जिल्ह्यातील पुरोला गावात शुक्रवारी मध्यरात्री ढगफुटीसदृश्य पावसाने अनेक घरे आणि रस्त्यांचे नुकसान झाले. सुदैवाने आतापर्यंत कोणाचीही जीवितहानी किंवा दुखापत झाल्याचे वृत्त नसल्याचे अधिकाऱ्यांनी म्हटले आहे. उत्तराखंडमध्ये, भारतीय हवामान विभागाने (IMD) पुढील 24 तासांत डेहराडून, उत्तरकाशी, टिहरी, पौरी आणि नैनिताल येथे काही ठिकाणी गडगडाट आणि विजांच्या कडकडाटासह मुसळधार ते अति मुसळधार पावसाचा अंदाज वर्तवला आहे.
अमरनाथ यात्रेकरुंचा प्रवास थांबवला
अमरनाथ यात्रेकरूंच्या 3 हजारहून अधिक ताज्या तुकडीने शनिवारी काश्मीरसाठी बेस कॅम्प सोडला. परंतु, मुसळधार पाऊस आणि भूस्खलनामुळे जम्मू-श्रीनगर राष्ट्रीय महामार्ग बंद केल्याने त्यांचा ताफा रामबनमध्ये थांबवण्यात आला. काश्मीरला देशाच्या इतर भागाशी सर्व हवामानात जोडणाऱ्या एकमेव 270 किमी महामार्गावरील मेहर आणि दलवास भागात पावसामुळे भूस्खलन झाल्याची माहिती अधिकार्यांनी दिली आहे.
दुसरीकडे, तेलंगणामध्ये, आयएमडीकडून संपूर्ण राज्यात ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. गेल्या तीन दिवसांतील मुसळधार पावसामुळे दक्षिण ओडिशाच्या मलकानगिरी जिल्ह्यात पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. पाणी साचल्यामुळे आणि रस्ते पाण्याखाली गेल्याने संपर्क तुटला आहे.