(Source: ECI/ABP News/ABP Majha)
सतत मोबाईल वापरण्यावरुन वडिलांनी फटकारलं; रागाच्या भरात मुलीची थेट चित्रकोट धबधब्यात उडी, VIDEO
Chitrakote Waterfall Bastar: बस्तरच्या चित्रकोट धबधब्यात मंगळवारी एका मुलीनं उडी घेतली. मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या लोकांनी तिला वाचवलं.
Chitrakote Waterfall Bastar: छत्तीसगडमध्ये (Chhattisgarh) मिनी नायगारा (Niagara Falls) नावाच्या चित्रकोट धबधब्याजवळ (Chitrakote Waterfalls) एक धक्कादायक घटना घडली आहे. चित्रकोट धबधब्यात (Chitrakote Waterfall) एका मुलीनं उडी मारून आत्महत्येचा प्रयत्न केला. मात्र, वेळीच तिचा वाचवण्यात आल्यामुळे सुदैवानं मोठा अनर्थ टळला. मुलीनं एवढं टोकाचं पाऊल उचलण्यामागचं कारण समोर आलं आहे. हे कारण ऐकून सर्वांच्याच पायाखालची जमीन सरकली आहे.
मंगळवारी बस्तरच्या (Bastar) चित्रकोट धबधब्यात एका मुलीनं उडी घेतली. मात्र, घटनास्थळी तैनात असलेल्या लोकांनी तिला वाचवलं. मुलीच्या घरच्यांनी मोबाईल वापरल्याबद्दल तिला फटकारलं होतं, त्यामुळे रागाच्या भरात तिनं हे पाऊल उचलल्याचं पोलीस तपासात समोर आलं आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती मौर्य असं 21 वर्षीय तरुणीचं नाव आहे. तरुणी तिचा जास्तीत जास्त वेळ मोबाईलवर घालवत असे. तिच्या या सवयीमुळे घरातील लोक त्रस्त झाले होते. यासाठी सरस्वतीचे पालक तिला ओरडायचे. पोलिसांनी सांगितलं की, वडील संतो मौर्य मंगळवारी दुपारी एक वाजण्याच्या सुमारास सरस्वती मौर्यला सतत मोबाईल वापरण्यावरुन खूप ओरडले. वडील ओरडल्यामुळे सरस्वती खूप चिडली. राग अनावर झाल्यामुळे ती घरातून निघाली आणि थेट चित्रकोट धबधब्यापर्यंत पोहोचली.
पोलिसांनी सांगितलं की, धबधबा पाहण्यासाठी आलेल्या लोकांना सरस्वती आत्महत्येच्या प्रयत्नात असल्याचं दिसलं. लोकांनी तिला थांबवण्याचा खूप प्रयत्न केला पण सरस्वतीनं कोणाचंही ऐकलं नाही आणि धबधब्यात उडी घेतली. मात्र, लवकरच तिला आपली चूक लक्षात आली. यानंतर तिनं स्वत:ला बुडण्यापासून वाचवण्यासाठी पोहत बाहेर येण्याचा प्रयत्न सुरू केला.
चित्रकोट चौकीचे प्रभारी तमेश्वर चौहान यांनी एका हिंदी वृत्तवाहिनीला दिलेल्या माहितीनुसार, सरस्वतीला पाहताच धबधब्याजवळ सुरक्षेसाठी तैनात असलेले गावकरी बोट घेऊन सरस्वतीजवळ पोहोचले आणि त्यांनी तिला वाचवलं. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, सरस्वती मौर्य ही चित्रकोट गावातील रहिवासी आहे.
दरम्यान, पावसामुळे इंद्रावती नदीच्या पाण्याची पातळी खूप वाढली असून, चित्रकोट धबधब्याही कोसळत आहे. या धबधब्याची उंची 90 फूट आहे. सरस्वतीचं नशीब बलवत्तर म्हणून ती सुखरुप बचावली. नाहीतर रागाच्या भरात सरस्वतीनं आपला जीव गमावला असता.
महत्त्वाच्या इतर बातम्या :
Bhiwandi Crime: भांडण सोडवायला गेला अन्...; चाकूनं सपासप वार करुन तरुणाची निर्घृण हत्या