Chandrayaan-3 : 'नासा' ही ISRO चा 'फॅन'! चांद्रयान-3 चं तंत्रज्ञान मागवलं, चंद्र मोहिमेतील उपकरणं विकत घेण्याची अमेरिकेची तयारी
NASA on ISRO Space Mission : अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाला इस्रोच्या कामगिरीची भूरळ पडली आहे. नासाने चांद्रयान-3 चं तंत्रज्ञान विकत घेण्याची तयारी दाखवली आहे.
ISRO Chandrayaan-3 : भारताच्या (India) चांद्रयान-3 (Chandrayaan-3) ने ऐतिहासिक कामगिरी केली आहे. भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर (ISRO Moon Mission) उतरणारा पहिला देश ठरला आहे. जगभरातील अंतराळ संस्था (Space Agency) आणि शास्त्रज्ञांकडून इस्रोच्या चंद्र मोहिमेचं कौतुक केलं जात आहे. अमेरिकन अंतराळ संशोधन संस्था नासाला इस्रोच्या कामगिरीची भूरळ पडली आहे. नासाच्या शास्त्रज्ञांनी भारताकडून चांद्रयान-3 च्या सॉफ्ट लँडिंगचे तंत्रज्ञान मागवलं आहे, अशी माहिती इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी दिली आहे. इतकंच नाही तर, नासाने चांद्रयान-3 चं तंत्रज्ञान विकत घेण्याची तयारी दाखवली आहे.
इस्रोकडून चांद्रयान-3 चं तंत्रज्ञान मागवलं
अंतराळ मोहिमेत भारत नवी ताकद म्हणून समोर येत आहे. अंतराळ मोहिमेत भारताचं यश उल्लेखनीय असल्याचं अमेरिकन अंतराळ संस्था नासानंही मान्य केलं आहे. नासाने इस्रोला विनंती केली की, 'तुम्ही चांद्रयान-3 कसे बनवले, तुम्ही त्याची स्वस्त उपकरणे अमेरिकेला का विकत नाही'. इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी याबाबत माहिती दिली आहे. रामेश्वरम येथे 15 ऑक्टोबर रोजी डॉ. एपीजे अब्दुल कलाम फाउंडेशनच्या एका कार्यक्रमात इस्रोचे प्रमुख सोमनाथ बोलत होते. यावेळी त्यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे.
नासाला इस्रोच्या कामगिरीची भूरळ!
इस्रोचे प्रमुख एस. सोमनाथ यांनी सांगितलं की, आम्ही जेव्हा चांद्रयान-3 विकसित केलं, तेव्हा आम्ही नासा-जेपीएल (JPL-Jet Propulsion Laboratory) मधील शास्त्रज्ञांना बोलावलं होतं. नासा-जेपीएलमधील शास्त्रज्ञांनी जगातील अनेक रॉकेट आणि अनेक अवघड अंतराळ मोहिमा राबवल्या आहेत. नासा-जेपीएलचे पाच ते सहा शास्त्रज्ञ इस्रोच्या मुख्यालयात आले होते. 23 ऑगस्ट रोजी चांद्रयान-3 चंद्राच्या पृष्ठभागावर सॉफ्ट लँडिंग कसे करेल, हे आम्ही त्यांना समजावून सांगितले. आम्ही त्यांना चांद्रयान-3 आणि मोहिमेची रचना समजावून सांगितली. आमच्या अभियंत्यांनी चांद्रयान कसं बनवलं हे देखील सांगितलं. या सर्व गोष्टी ऐकून शास्त्रज्ञांनी, सर्व काही चांगले होणार असा विश्वास व्यक्त केला होता.
जगातील सर्वात स्वस्त चंद्रमोहिम
चांद्रयान-3 प्रक्षेपणानंतर 41 व्या दिवशी 23 ऑगस्ट रोजी चंद्रावर उतरले. यासह भारत चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा पहिला देश ठरला आहे. महत्त्वाचं म्हणजे भारताची चंद्रमोहिम जगातील सर्वात स्वस्त चंद्र मोहिम आहे. भारताचीही चंद्र मोहिम इतर देशांच्या तुलनेने फार कमी आहे. ही जगातील सर्वात स्वस्त चंद्र मोहिम आहे. यामुळेच नासालाही भारतीय तंत्रज्ञानाची भूरळ पडली आहे.