Chandrayaan-3 Mission: अखेर चंद्राचं दर्शन झालं! चांद्रयान- 3 यानाने पाठवला पहिला फोटो
ISRO Published Moon Photos: चांद्रयान-3 ने शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर चंद्राची काही छायाचित्रं घेतली आहेत, इस्रोने त्यांच्या ट्विटर पेजवरुन ती प्रसिद्ध केली आहेत.
Chandrayaan-3 Mission: भारतीय अंतराळ संशोधन संस्था ISRO ने चांद्रयान 3 मोहिमेअंतर्गत चंद्राचा पहिला फोटो प्रसिद्ध केला आहे. भारताच्या या तिसऱ्या चंद्र मोहिमेला आलेलं हे पहिलं यश आहे. चांद्रयान 3 ने (Chandrayaan-3) शनिवारी चंद्राच्या कक्षेत प्रवेश केल्यानंतर ही छायाचित्रं (Chandrayaan 3 Moon Photo) घेतली आहेत.
भारताच्या चांद्रयान-3 ने अखेर चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे. बंगळुरु येथून इस्रोने दिलेल्या कमांडप्रमाणे चांद्रयान-3 ने चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला आहे आणि चंद्राचे फोटो घेतले आहेत, जे ट्विटर पेजवरुन प्रसारित करण्यात आले आहेत. शनिवारी संध्याकाळी सात वाजण्याच्या सुमारास चांद्रयान-3 चंद्राच्या कक्षेत प्रवेश करण्याची प्रक्रिया सुरु झाली आणि ती यशस्वी झाल्याचं इस्रोने म्हटलं आहे. त्यामुळे आता चांद्रयान-3 चा चंद्राच्या भूमीवर लॅंड होण्याचा प्रवास सुरु झाला आहे.
आता 23 ऑगस्ट रोजी चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर चांद्रयान सॉफ्ट लॅंडिंगचा प्रयत्न करणार आहे. हा प्रयत्न जर यशस्वी झाला तर अमेरिका, रशिया, चीननंतर भारत हा चंद्रावर पोहोचणारा चौथा देश ठरणार आहे. चंद्रयान-3 14 जुलै रोजी आंध्रप्रदेशातील श्रीहरीकोटा येथून अवकाशात झेपावलं आहे.
The Moon, as viewed by #Chandrayaan3 spacecraft during Lunar Orbit Insertion (LOI) on August 5, 2023.#ISRO pic.twitter.com/xQtVyLTu0c
— LVM3-M4/CHANDRAYAAN-3 MISSION (@chandrayaan_3) August 6, 2023
अजून दोन महत्त्वाच्या टप्प्यांची प्रतीक्षा
चांद्रयान चंद्राच्या कक्षेत गेल्याने मैलाचा दगड पार पडला आहे, त्यामुळे इस्रोच्या कामगिरीत आणखी मानाचा तुरा रोवला गेला आहे. आता सोप्या शब्दात सांगायचं झाल्यास चांद्रयानाचे आणखी दोन टप्पे असतील. येत्या 17 ऑगस्ट रोजी विक्रम लँडर वेगळे होईल आणि 23 ऑगस्टला यान चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरेल. जेव्हा चांद्रयान-3 लँडर चंद्रावर उतरेल, तेव्हा असं करणारा भारत हा जगातील चौथा देश असेल. यापूर्वी हा पराक्रम केवळ अमेरिका, रशिया आणि चीनलाच करता आला आहे. चांद्रयान-3 चे रोव्हर ज्या भागात उतरणार आहे, त्या भागावर आतापर्यंत कोणत्याही देशाचा रोव्हर नसल्याने या कामगिरीकडे देशासह संपूर्ण जगाचे लक्ष लागून राहिलं आहे.
चांद्रयान मोहिमेचा उद्देश काय आहे?
चंद्राच्या कक्षेत प्रवेश केला असला, तरी चंद्रावर उतरणं ही सुद्धा अत्यंत आव्हानात्मक प्रक्रिया असते. रोव्हर जेव्हा उतरेल तेव्हा सूर्यप्रकाश आवश्यक असतो. चंद्रावर सूर्य फक्त 14-15 दिवस बाहेर येतो. इस्रोच्या शास्त्रज्ञांनी याची तंतोतं काळजी घेतली असली तरी हे आव्हान कायम असेल. लँडरसोबत एक रोव्हर (छोटा रोबो) देखील आहे, जो चंद्राच्या पृष्ठभागाचा शोध घेईल आणि आवश्यक डेटा पृथ्वीवर पाठवेल. चांद्रयान-3 चा रोव्हर चंद्राच्या पृष्ठभागावर कोणती खनिजं आहेत? हवा आणि पाण्याच्या काय शक्यता आहेत? याचा शोध घेणार आहे.
हेही वाचा: