Corbevax लसीच्या जागृतीसाठी बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, महाविद्यालयांवर कँप आयोजित करा; केंद्र सरकारचे राज्यांना निर्देश
केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व राज्यांना आणि केंद्र शासित प्रदेशांना Corbevax लसीच्या जागृतीसाठी प्रयत्न करण्याचे निर्देश दिले आहेत.
नवी दिल्ली: कोरोनावरील कॉर्बेव्हॅक्स लसीच्या उपलब्धतेविषयी आणि वापराविषयी लोकांमध्ये जागृती करण्यासाठी बस स्टॅन्ड, रेल्वे स्टेशन, विमानतळ, महाविद्यालयं आणि शक्य त्या सर्व सार्वजिनक ठिकाणी कॅंपचे आयोजन करा असे निर्देश केंद्र सरकारने दिले आहेत. केंद्रीय आरोग्यमंत्री मनसुख मांडवीय यांनी सर्व राज्य सरकार आणि केंद्र शासित प्रदेशांना हे निर्देश दिले आहेत.
कॉर्बेव्हॅक्स लस 12 ऑगस्टपासून सार्वजनिक आणि खाजगी दोन्ही लसीकरण केंद्रांवर उपलब्ध करण्यात आली असून ती 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी उपलब्ध असेल. यासाठी नागरिकांना COWIN अॅपवर बूस्टर डोससाठी नोंदणी मात्र करावी लागणार आहे. कॉर्बेव्हॅक्स निर्मात्या कंपनीचा दावा आहे की, या लसीच्या भारतीय रुग्णांवर व्यापक बूस्टर चाचण्या झाल्या आहेत आणि त्यानंतर भारतीय नियामक प्राधिकरणाकडून त्याच्या वापराला मान्यता मिळाली आहे. कॉर्बेव्हॅक्स ही विषम कोविड-19 बूस्टर म्हणून मान्यता मिळालेली भारतातील पहिली लस आहे. आरोग्य मंत्रालयाने या लसीला दिलेली मान्यता ही साथीच्या रोगाचा सामना करण्यासाठी एक महत्त्वाचा टप्पा मानला जात आहे.
ज्या नागरिकांनी Covaxin किंवा Covishield लशीचे दोन डोस घेतले आहेत, ते नागरिक कॉर्बेव्हॅक्स या मिक्स्ड लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात. हैदराबादच्या बायोलॉजिकल-ई कंपनीकडून विकसित कॉर्बेव्हॅक्स लसीला केंद्र सरकारनं परवानगी दिली आहे.
कोण घेऊ शकतं Corbevax लसीचा बूस्टर डोस?
देशातील 18 वर्षांहून अधिक वयाच्या व्यक्ती, ज्यांनी कोवॅक्सिन किंवा कोविशील्ड लसीचे दोन डोस घेतले आहेत. ते आता Corbevax लसीचा बूस्टर डोस घेऊ शकतात. केंद्र सरकारनं ई कॉर्बेवॅक्स बूस्टर डोसला मान्यता दिली आहे. ज्यांना Covishield किंवा Covaxin चे दोन्ही डोस मिळाले आहेत, अशा लोकांना तिसरा डोस (Booster Dose) म्हणून NTAGI बायोलॉजिकल ईद्वारे विकसित कॉर्बेव्हॅक्स लस देण्याची शिफारस केली होती. Corbevax ही भारतातील पहिली स्वदेशी विकसित रिसेप्टर बायडिंग डोमेन (RBD) प्रोटीन सब-युनिट लस आहे. जी कोरोनावर अत्यंत प्रभावी असल्याचंही सांगितलं जात आहे.
महत्त्वाच्या बातम्या:
- उद्या सकाळी 11 वाजता राष्ट्रगीताचे सामूहिक गायन, सर्वांनी सहभागी व्हावे; मुख्यमंत्र्यांचे आवाहन
- Maharashtra Monsoon Session : ठाकरे गट आणि शिंदे गट पुन्हा आमने-सामने; ठाकरे गटाकडून सर्व 55 आमदारांना व्हिप जारी
- Solapur Crime : आईला का मारहाण केली याचा जाब विचारत वडिलांना झाडाला बांधून केली मारहाण, मारहाणीत वडिलांचा जागीच मृत्यू