ISI Mark Product : बनावट प्रेशर कुकर, हेल्मेट आणि घरगुती गॅस सिलिंडर विकणाऱ्यांना चाप
बनावट ISI Mark असलेले प्रेशर कुकर (Pressure Cooker), हेल्मेट (Helmet) आणि घरगुती गॅस सिलिंडर (Cooking Gas Cylinder) विक्रेत्यांविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक अभियान सुरू केलं जाणार आहे.
ISI Mark Product : केंद्रीय ग्राहक संरक्षण प्राधिकरणानं (CCPA) घरगुती वापराच्या वस्तूंमध्ये बनावट उत्पादनांना आळा घालण्यासाठीच्या मोहिमेला आता वेग देण्याचं ठरवलं आहे. बनावट आयएस (ISI Mark) चिन्हं असलेले प्रेशर कुकर (Pressure Cooker), दुचाकीसाठीचं हेल्मेट (Helmet) आणि घरगुती गॅस सिलिंडर (Cooking Gas Cylinder) विक्रेत्यांविरोधात नागरिकांमध्ये जनजागृती करण्यासाठी एक अभियान सुरू केलं जाणार आहे. सीसीपीएनं याआधीच अॅमेझॉन, फ्लिपकार्ट आणि पेटीएम मॉलसह पाच ई-कॉमर्स कंपन्यांना याबाबतची नोटीस जारी केली आहे.
CCPAच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी सांगितले की, आम्ही केवळ भौतिक बाजारपेठेतच नव्हे तर ई-कॉमर्स प्लॅटफॉर्मवरही बनावट उत्पादनांच्या विक्रीवर देखरेख आणि अंमलबजावणी वाढवली आहे. देशव्यापी मोहिमेचा भाग म्हणून आम्ही तीन दैनंदिन घरगुती उत्पादने ओळखली आहेत. यामध्ये घरगुती प्रेशर कुकर, दुचाकी हेल्मेट आणि स्वयंपाकाचा गॅस सिलेंडरचा समावेश आहे.
भौतिक बाजारपेठेत बनावट उत्पादने आणि बनावट वस्तूंच्या विक्रीला आळा घालण्यासाठी, CCPAने देशभरातील सर्व जिल्हाधिकार्यांना त्यांच्या अधिकार क्षेत्रातील एक वर्ग म्हणून ग्राहकांच्या हक्कांचे उल्लंघन केल्याच्या तक्रारींची चौकशी करण्याचे निर्देश देत पुढील दोन दिवसांत अहवाल सादर करण्यास सांगितल्याची माहिती निधी खरे यांनी दिली आहे.
CCPA दोषपूर्ण उत्पादनांची विक्री तपासण्यासाठी सर्व ई-कॉमर्स वेबसाइट्सचे वैयक्तिकरित्या निरीक्षण करत आहे. ज्यामध्ये विशेषत: मोहिमेचा एक भाग म्हणून ओळखल्या गेलेल्या तीन उत्पादनांवर अधिक भर आहे. ज्याच्या आधारे बनावट उत्पादनांवर कारवाईसाठी करता येईल, असंही त्यांनी म्हटलं आहे. ग्राहकांनी कोणतंही उत्पादन खरेदी करताना त्यावरील ISI (Indian Standard) गुणवत्ता चिन्ह तपासायला हवं. शिवाय वेबसाईटवरुनही उत्पादन खरेदी करताना ISI चिन्ह तपासून घ्यायला हवं, असंही त्यांनी सांगितलंय.
ग्राहकांनी हे लक्षात ठेवले पाहिजे की, प्रेशर कुकर, दुचाकीसाठीचं हेल्मेट आणि घरगुती गॅस सिलिंडर ही काही अनिवार्य उत्पादने आहेत. ही उत्पादनं BIS गुणवत्ता मानदंडांचे पालन करतात. त्यामुळे या उत्पादनांची ISI गुणवत्ता चिन्हाशिवाय विक्री करता येतं नाही.
ग्राहकांनी हेल्मेट खरेदी करताना 'IS 4151:2015' गुणवत्ता चिन्ह आणि प्रेशर कुकर खरेदी करताना 'IS 2347: 2017' गुणवत्ता चिन्ह असल्याची खात्री करुन नंतरच खरेदी करावं.
BIS कायद्याअंतर्गत कलम 7 अनुसार कोणत्याही व्यक्तीला 'IS' तिन्हाच्या अनिवार्य वापराशिवाय अशा कोणत्याही वस्तूंचे उत्पादन, आयात, वितरण, विक्री, भाड्यानं देणं किंवा विक्रीसाठी प्रदर्शन करण्यास मनाई आहे. BISला देशभरातील भौतिक बाजारपेठांमध्ये या बनावट उत्पादनांच्या विक्रीवर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आल्याची माहिती निधी खरे यांनी दिलीय.
प्रेशर कुकर, दुचाकीसाठीचं हेल्मेट आणि घरगुती गॅस सिलिंडर ही तीन उत्पादने प्रत्येक घरातील अत्यंत महत्त्वाची उत्पादनं आहेत. यापैकी किमान दोन उत्पादने प्रत्येक घरात आपल्याला पाहायला मिळतात. CCPA BIS मानकांशी जुळत नसलेल्या या तिन्ही अत्यावश्यक दैनंदिन वापराच्या उत्पादनांच्या विक्रीच्या संदर्भात अनुचित व्यापाराची दखल घेईल, असं CCPAच्या मुख्य आयुक्त निधी खरे यांनी सांगितले आहे.
महत्त्वाच्या बातम्या :
Union Cabinet Decision: मोदी सरकारचा मोठा निर्णय, मार्च 2022 पर्यंत गरिबांना मिळणार मोफत राशन
Farm Law Repealed : तीन कृषी कायदे मागे घेण्याच्या प्रस्तावावर शिक्कामोर्तब; केंद्रीय मंत्रिमंडळाचा निर्णय
Cryptocurrency : क्रिप्टोकरन्सीचा प्रकार म्हणजे चीट फंड सारखा, लवकरच फुगा फुटणार; रघुराम राजन यांचा इशारा
LIVE TV | मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज, महाराष्ट्रासह देश-विदेशातील प्रत्येक घडामोड पाहा लाईव्ह - ABP Majha