CBSE 10th Exam 2021 Cancelled: दहावीची परीक्षा रद्द, बारावीच्या परीक्षेसंदर्भात लवकरात लवकर निर्णय घ्यावा, प्रियंका गांधीची मागणी
कोरोनाच्या परिस्थितीत सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली होती. परीक्षा रद्द झाल्यानंतर गांधी यांनी ट्वीट करत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
नवी दिल्ली : देशभरात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं हाहाकार माजवला आहे. अशातच मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी विरोधी पक्षांकडून केली जात होती. अखेर आज सीबीएसई बोर्डाच्या परीक्षांसंदर्भात मोठा निर्णय घेण्यात आला आहे. कोरोनाच्या परिस्थितीत सीबीएसईच्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात अशी मागणी काही दिवसांपूर्वी कॉंग्रेस नेत्या प्रियंका गांधी यांनी केली होती. परीक्षा रद्द झाल्यानंतर गांधी यांनी ट्वीट करत घेण्यात आलेल्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त केला आहे.
प्रियंका गांधी आपल्या ट्वीटमध्ये म्हणाल्या की, "सरकारने दहावीची परीक्षा रद्द केली या निर्णयामुळे मी आनंदी आहे. परंतु बारावीच्या विद्यार्थ्यांबाबत लवकरात लवकर निर्णय घेतला पाहिजे. जून पर्यंत विद्यार्थ्यांना दबावाखाली ठेवण्यात काही अर्थ नाही. हे अयोग्य आहे. बारावी परीक्षेसंदर्भात देखील सरकारने लवकरात लवकर निर्णय घ्यावा."
Glad the government has finally cancelled the 10th standard exams however a final decision MUST be taken for the 12th grade too. Keeping students under undue pressure until June makes no sense.
— Priyanka Gandhi Vadra (@priyankagandhi) April 14, 2021
It’s unfair. I urge the government to decide now.#cancelboardexam2021
सीबीएसईसारख्या बोर्डांनी विद्यार्थ्यांना सध्याच्या परिस्थितीत परीक्षा द्यायला भाग पाडणं बेजबाबदारपणाचं आहे.सध्या बोर्डाच्या परीक्षा रद्द कराव्यात किंवा परीक्षा पुढे ढकलून नवं वेळापत्रक जारी करावं, अशी मागणी प्रियांका गांधी यांनी काही दिवसांपूर्वी केली होती. पंतप्रधानांनी आणि शिक्षणमंत्र्यांनी विद्यार्थ्यांच्या मनातील गोष्ट समजावी आणि परीक्षा घेण्याचा हट्ट सोडावा, असे देखील त्या म्हणाल्या होत्या.
आज दुपारी एक महत्त्वाची बैठक पार पडली. या बैठकीत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी शिक्षणमंत्री आणि इतर अधिकाऱ्यांसोबत चर्चा केली. या बैठकीनंतर शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल निशंक यांनी सीबीएसई परीक्षांसंदर्भात घोषणा केली. दरम्यान, कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मे महिन्यात होणाऱ्या सीबीएसई बोर्डाच्या दहावी आणि बारावीच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी जोर धरत होती. काँग्रेस, आम आदमी पार्टीसह अनेक विरोधी पक्षांनी केंद्र सरकारकडे सीबीएसई बोर्डाच्या परीक्षा रद्द करण्याची मागणी केली होती.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल म्हणाले की, "अंतर्गत मूल्यांकनाच्या आधारे दहावीच्या विद्यार्थ्यांना पुढील वर्गात पाठविले जाईल. जर विद्यार्थी मिळालेल्या गुणांवर समाधानी नसतील, तर ते कोरोनाचा प्रादुर्भाव कमी झाल्यानंतर परीक्षा देऊ शकतात."