(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Capture of Delhi (1771): अटकपासून ते कटकपर्यंत... मराठ्यांचे साम्राज्य महादजी शिंदेंनी स्थापित केलं: ज्योतिरादित्य शिंदे
Capture of Delhi (1771): मराठ्यांनी दिल्ली काबीज केल्याच्या घटनेला 251 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने नवी दिल्लीमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
नवी दिल्ली: ज्याची दिल्ली, त्याचा भारत असं म्हटलं जायचं. त्यामुळे दिल्लीवर सत्ता मिळवण्यासाठी अनेकांनी प्रयत्न केले. एक वेळ अशी होती की दिल्ली भारतीयांच्या हातून निघून गेली होती. पण पानीपतच्या युद्धानंतर केवळ दहा वर्षांमध्ये मराठ्यांनी दिल्लीवर भगवा फडकावला. अटक पासून कटकपर्यंत, भारतमातेच्या नावावर मराठ्यांचे साम्राज्य महादजी शिंदेंनी स्थापित केलं असं केंद्रीय मंत्री ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले. मराठ्यांनी 1771 साली दिल्लीवर भगवा फडकवल्याच्या घटनेला 251 वर्षे पूर्ण झाल्यानिमित्ताने दिल्लीमध्ये एक विशेष कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. त्यावेळी ते बोलत होते.
ज्योतिरादित्य शिंदे म्हणाले की, "पानीपतचे युद्ध हे भारतातील सर्वात मोठे महासंग्राम होतं. पंजाबमध्ये नरसंहार केल्यानंतर दिल्लीकडे जाणाऱ्या फौजेला मराठ्यांनी पानीपतमध्ये रोखलं. मराठा सैनिकांची संख्या केवळ एक लाख इतकी होती तर अब्दालीचे सैन्य 15 लाख इतकी होती. पण तरीही मराठा डगमगला नाही. त्यांनी अब्दालीला अडवलं. महादजी शिंदेंनी पानीपतात आपल्या 16 भावांना गमावलं. महादजी स्वत: या लढाईत गंभीर जखमी झाले होते."
ज्योतिरादित्य शिंदे पुढे म्हणाले की, "महादजी शिंदेची 30 वर्षांची कारकीर्द ही भारताच्या इतिहासातील सुवर्णकाळ होता. महादजी शिंदेंच्या नावाने काबुल ते कंदहारपर्यंतचे सरदार कापत असायचे. भारतमातेच्या रक्षणासाठी आघाडी निर्माण करण्याची पहिली भूमिका महादजींची. त्यांनी गुज्जर, जाट, राजपूतांना एकत्र आणलं. त्यावेळी सैन्य तलवारीनं लढायचं. पण महादजी शिंदेंनी इंग्रजांशी लढण्यासाठी बंदूक, तोफखाना असला पाहिजे हे ओळखत सैन्याचं आधुनिकीकरण केलं. सोमनाथ मंदिराचे दरवाजे गझनीनं तोडले होते, महादजी 1782 मधे लाहोरमध्ये जाऊन ते परत घेऊन आले. साताऱ्यातल्या कण्हेरखेडचा हा व्यक्ती दिल्ली, लाहोर पर्यंत आपल्या पराक्रमाने दबदबा गाजवत होता. महादजींच्या नावासमोर पाटीलबुवा कायम कारण ते साताऱ्यातल्या कण्हेरखेडचे पाटील होते."
मराठ्यांच्या इतिहासातील एक महत्त्वाचे नाव म्हणजे महादजी शिंदे. एक पराक्रमी योद्धा म्हणून महादजी शिंदे यांची इतिहासात ओळख आहे. मराठ्यांनी पानीपतच्या पराभवाचा कलंक दिल्ली काबीज करुन 10 वर्षांनी पुसला. 1761 ला मराठ्यांचा पानीपतच्या युद्धात पराभव झाला होता. अखेर 10 वर्षांनी म्हणजे 1771 ला मराठ्यांनी त्या पराभवाचा वचपा काढत दिल्लीत भगवा फडकवला होता. या घटनेला आज 251 वर्ष पूर्ण होत आहेत.
महादजी शिंदे मूळचे साताऱ्यातील, कोल्हापुरातील जोतिबा कुलदैवत
दिल्लीवर भगवा फडकवणारे महादजी शिंदे हे मूळचे साताऱ्यातील कण्हेरखेड या गावचे. कण्हेरखेड या गावची पाटीलकी त्यांच्याकडे होती. गावचे पाटील ते दिल्लीची सत्ता काबीज करणारा महापराक्रमी सरदार असा त्यांचा प्रवास थक्क करणारा होता. या शिंदे घराण्याचे कुलदैवत हे कोल्हापुरातील जोतिबा आहे. महादजी शिंदे यांची समाधीही पुण्याजवळील वानवडी येथे आहे.
संबंधित बातम्या:
- Capture of Delhi (1771): 'दिल्लीचेही तख्त राखितो महाराष्ट्र माझा'; मराठ्यांच्या दिल्ली विजयाला 251 वर्षे पूर्ण
- Mahadaji Shinde : पराक्रमी महादजी शिंदे नेमके कोण? त्यांचा पराक्रम काय होता?
- Mahadaji Shinde: महादजी शिंदेंच्या कर्तबगारीमुळे भारतात इंग्रजांच्या अंमलाची सुरुवात 50 वर्षे उशीरा : डॉ. सदानंद मोरे