Corona | भारत आणि पाकिस्तानहून येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांवर 30 दिवसांचे निर्बंध, कॅनडाचा निर्णय
कॅनडाच्या (Canada) मते, भारत आणि पाकिस्तानातून येणाऱ्या विमानातील प्रवासी मोठ्या संख्येने कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्यामुळे कॅनडा सरकारने हा निर्णय घेतला आहे.
नवी दिल्ली : कॅनडाने भारत आणि पाकिस्तानातून येणाऱ्या सर्व प्रवासी विमानांवर पुढचे 30 दिवस निर्बंध आणले आहेत. या दोन देशात गेल्या काही दिवसांपासून कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणात वाढ होत आहे. तसेच या दोन देशांतून येणारे प्रवासी मोठ्या प्रमाणावर कोरोना पॉझिटिव्ह सापडत आहेत. त्यामुळे कॅनडाच्या सरकारने हा निर्णय घेतल्याचं सांगितलं आहे.
कॅनडाचे परिवहन मंत्री उमर अल्गबरा यांनी ही घोषणा केली. हे निर्बंध गुरुवारी रात्री 11.30 पासून लागू करण्यात आले आहेत. हे निर्बंध केवळ प्रवासी वाहतूक करणाऱ्या विमानांना लागू असतील. कार्गो फ्लाईट्सना हे निर्बंध लागू नसतील असंही सरकारच्या वतीनं स्पष्ट करण्यात आलं आहे.
#BREAKING: Canada is banning passenger flights from India and Pakistan for 30 days amid concerns over rising case COVID-19 cases and a new virus mutation, a senior government source has confirmed to Global News.https://t.co/hl9XWvhhIR
— Globalnews.ca (@globalnews) April 22, 2021
भारतातून कॅनडाला जाणाऱ्या एकूण प्रवाशांपैकी 50 टक्के प्रवासी हे कोरोना पॉझिटिव्ह सापडले आहेत अशी माहिती सरकारच्या वतीनं देण्यात आली आहे. पाकिस्तानच्या प्रवाशांमध्येही मोठ्या प्रमाणात कोरोनाचे संक्रमण आढळून आलं आहे.
या आधी गुरुवारी संयुक्त अरब अमिरातीने भारतातून येणाऱ्या सर्व विमानांवर निर्बंध लादले होते. तसेच फ्रान्सनेही भारतीय प्रवाशांना 10 दिवसांचा क्वॉरन्टाईन सक्तीचं केलं आहे.
ब्रिटनने भारताला 'रेड लिस्ट' मध्ये टाकलं
भारतातील कोरोनाचं संकट पाहता ब्रिटनकडून भारताची नोंद रेड लिस्टमध्ये करण्यात आली आहे. सदर यादीत नोंद झाल्यामुळं आता भारतीय आणि आयरिश नागरिकांना भारतातून ब्रिटनमध्ये जाण्यावर निर्बंध असतील. यासोबतच परदेशातून परतलेल्या ब्रिटनच्या नागरिकांनाही इथं एका हॉटेलमध्ये 10 दिवसांसाठी विलगीकरणात रहावं लागणार आहे. ब्रिटनमध्ये भारतात आढळलेल्या संसर्गाच्या प्रकारचे 103 रुग्ण आढळून आले आहेत. यापैकी अधिक रुग्ण हे परदेशातून परतलेले आहेत. समोर आलेल्या रुग्णसंख्येच्या विश्लेषणानंतरच भारताचं नाव रेड लिस्टमध्ये समाविष्ट करण्याचा मोठा निर्णय घेण्यात आला. त्यामुळं आता भारतीयांच्या ब्रिटन प्रवेशावर निर्बंध आले आहेत.
भारतात कोरोनाच्या रुग्णसंख्येत मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे, अशा वेळी भारताचा प्रवास करू नये असं आवाहन अमेरिकेने आपल्या देशातील नागरिकांना केलं आहे.
महत्वाच्या बातम्या :