Delhi : दिल्लीत आता एकच महापालिका! तीनही महापालिकांचे एकत्रिकरण होणार; विधेयकाला केंद्राची मंजुरी
Delhi Municipal Corporations Bill : दिल्लीमध्ये येत्या काळात महापालिकेच्या निवडणुका होणार असल्याने केंद्राच्या या निर्णयाकडे राजकीय निर्णय म्हणून पाहिलं जातंय.
नवी दिल्ली: दिल्लीतील तीन महापालिका एकत्रित करुन एकच महापालिका निर्माण करण्याच्या विधेयकाला केंद्रीय कॅबिनेटने मंजुरी दिली आहे. त्यामुळे दिल्लीत आता तीन ऐवजी एकच महापालिका असणार आहे. दिल्लीत लवकरच महापालिकेच्या निवडणुका होणार आहेत. त्या पार्श्वभूमीवर ही महत्त्वाची घडामोड मानली जातेय.
आजच्या कॅबिनेटच्या बैठकीत द दिल्ली मुन्सिपल कॉर्पोरेशन अमेन्डमेन्ट अॅक्ट 2022 या विधेयकाला मंजुरी देण्यात आली. त्यामुळे आता दिल्लीतील तीनही महापालिकांचे एकत्रिकरण होणार असून त्यातून केवळ एकच महापालिका निर्माण केली जाणार आहे. आता या विधेयकाला संसदेत मंजुरी मिळवण्यात येणार आहे.
या तीनही महापालिकांमध्ये कर्मचाऱ्यांकडून वेतनासंदर्भात सातत्याने आंदोलन केलं जात आहे. त्यामुळे त्यांच्या वेतनाचा प्रश्न तसेच तीनही महापालिकांच्या उत्पन्नामध्ये येणाऱ्या अडचणी सोडवण्यासाठी हे एकत्रिकरण केलं जाणार असल्याचं केंद्रीय गृहमंत्रालयाने स्पष्ट केलं आहे.
दिल्ली मुन्सिपल अॅक्ट, 1957 या कायद्यान्वये दिल्लीत महापालिकेचे 2012 ला विभाजन करण्यात आलं होतं. त्यातून एक ऐवजी तीन महापालिका निर्माण केल्या गेल्या. गेल्या पंधरा वर्षांपासून दिल्लीच्या तीनही महापालिकेत भाजपची सत्ता आहे. आम आदमी पक्षाची दिल्लीत दुसऱ्यांदा आणि पंजाबमध्ये अल्पावधीत सत्ता आल्यानंतर आता दिल्ली महापालिका टिकवणे हे भाजपासाठी मोठं आव्हान असणार आहे. त्या पार्श्वभूमीवर शह-काटशहाच्या राजकारणाला सुरुवात झाली असून केंद्राचा हा निर्णय त्यापैकीच एक असल्याचं समजलं जातंय.
दिल्लीत सलग दोनवेळा सत्तेत आलेल्या आपने आता दिल्ली महापालिकेतही सत्ता मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. आता या महापालिकांच्या एकत्रिकरणाचा निर्णयाचा फायदा हा भाजपला होणार की आम आदमी पक्षाला याची उत्सुकता सर्वांना लागली आहे.
संबंधित बातम्या :
- Bjp Agitation : शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी केजरीवाल यांच्या घरासमोर आंदोलन, भाजप किसान मोर्चा आक्रमक
- दिल्ली दंगलीत जीव गमावलेल्या अंकित शर्माच्या भावाला केजरीवाल सरकारकडून सरकारी नोकरी, कुटुंबाला 1 कोटी रुपये