Budget 2021: मोदी सरकारच्या बजेटवर शशी थरुर यांची मजेदार पद्धतीने टीका, म्हणाले.....
Budget 2021: काँगेस खासदार शशी शरुर यांनी केंद्र सरकारची तुलना 'मोटर मेकॅनिक'शी केली. तर विरोधी पक्षांनी हा अर्थसंकल्प निरुपयोगी असल्याची टीका केली
Budget 2021: केंद्रीय अर्थमंत्र्यांनी आज संसदेत 2021-22 या वर्षासाठी अर्थसंकल्प सादर केला. पंतप्रधान नरेंद्र मोदीनी त्याचं कौतुक केलं. पण काँग्रेस नेते शशी थरुर यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून अर्थसंकल्पावर मजेदार पद्धतीने टीका केली आहे. त्यांनी केंद्र सरकारची तुलना मोटर मेकॅनिकशी केली आहे.
शशी थरुर यांनी आपल्या ट्वीटच्या माध्यमातून केंद्र सरकारच्या अर्थसंकल्पावर टीका केली आहे. ते म्हणाले की, "भाजप सरकार मला त्या गॅरेज मेकॅनिकची आठवण देते की जो आपल्या ग्राहकाला म्हणतो, मी आपल्या गाडीचे ब्रेक व्यवस्थित करु शकलो नाही म्हणून गाडीच्या हॉर्णच्या आवाजात वाढ केली आहे."
This BJP government reminds me of the garage mechanic who told his client, “I couldn’t fix your brakes, so I made your horn louder.” #Budget2021
— Shashi Tharoor (@ShashiTharoor) February 1, 2021
या मजेदार ट्वीटवर अनेकांनी कमेन्ट केली आहे. या माध्यमातून शशी थरुर यांनी केंद्र सरकार हे महत्वाच्या गरजेच्या गोष्टींवर खर्च करत नसून इतर अनावश्यक गोष्टींवर भर देतंय अशी टीका केली आहे.
सीपीएम नेता म्हणाले- अर्थसंकल्प आहे की OLX सरकारच्या अर्थसंकल्पावर विरोधी पक्षांनी टीका केली आहे. सीपीएम नेते मोहम्मद सलीम यांनीही आजच्या अर्थसंकल्पावरुन केंद्र सरकारवर टीका केली आहे. ते म्हणाले की, "या अर्थसंकल्पाच्या माध्यमातून सरकार रेल्वे, बॅंक, विमा, संरक्षण आणि स्टील असं सर्व काही विकत आहे. हा अर्थसंकल्प आहे की OLX."
काँग्रेस नेते अधीर रंजन म्हणाले की, "आम्हाला असं वाटत होतं की असामान्य परिस्थितीत सादर होणारा हा अर्थसंकल्प असामान्य स्वरुपाचा असेल. परंतु सरकार या संकटाच्या परिस्थितीत खासगीकरणाच्या मार्गावर चाललं आहे."
शिवसेना नेते खासदार संजय राऊत यांनीही सरकारवर टीका केली आहे. कोरोना काळात, संपूर्ण देशाला अर्थमंत्र्यांकडून मोठी घोषणा होण्याची अपेक्षा होती. मात्र, या बजेटकडून निराशा झाल्याची टीका त्यांनी केली. अर्थसंकल्पाचा डोलारा महाराष्ट्रावर अवलंबून असताना बजेटमध्ये राज्याला काहीही मिळाले नसल्याची टीकाही संजय राऊत यांनी केलीय.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या अर्थसंकल्पावर समाधान व्यक्त करताना सांगितलं की सर्वच क्षेत्रातून या अर्थसंकल्पाबद्दल समाधान व्यक्त केलं जातंय.
Budget 2021 : समजून घ्या अर्थसंकल्पाची भाषा अगदी सोप्या शब्दात.....