काश्मीर बॉर्डरवर BSF जवान मोहम्मद इम्तियाज शहीद; पाकिस्तानला प्रत्त्युत्तर देताना वीरमरण
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निष्पाप नागरिकांना ठार मारलं, त्यामुळे भारतातील हिंदू मुस्लिम दरी वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला

नवी दिल्ली : भारत पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य परिस्थितीत सीमारेषेवरील लाखो जवान तैनात आहेत. जम्मू काश्मीरसह सर्वच सीमारेषांवर भारतीय सैन्य दलाच्या जवानांनी आपल्या बंदुका रोखून धरल्या आहेत. सैन्यातील जवानांच्या सुट्ट्या रद्द करण्यात आल्या असून लग्नानंतर दुसऱ्याच दिवशी जवान पु्न्हा युद्धभूमीवर परतल्याचं पाहायला मिळालं. पहलगाम हल्ल्यानंतर देशभरातून संताप व्यक्त होत असून दहशतवाद्यांना जशास तसे उत्तर द्यायला पाहिजे, पाकिस्तानला धडा शिकवला पाहिजे हीच सर्वांची भूमिका आहे. त्यामुळे, भारताने एअर स्ट्राईक करत पाकिस्तानला हादरला दिला. त्यानंतर, चवताळेल्या पाकिस्तानकडून सीमारेषेवर कारवाया सुरू आहेत. त्यामध्ये, आत्तापर्यंत 5 जवानांना वीरमरण प्राप्त झालं आहे. त्यात, आज जम्मू काश्मीर सीमारेषेवर तैनात बीएएसएफ जवान मोहम्मद इम्तियाज शहीद झाले आहेत. रविवार (11 मे) रोजी जम्मूतील फ्रंटियर मुख्यालयात त्यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात येणार आहे. त्यांच्या शौर्याला बीएसएफने सलाम केला आहे.
पहलगाम हल्ल्यात दहशतवाद्यांनी धर्म विचारुन निष्पाप नागरिकांना ठार मारलं, त्यामुळे भारतातील हिंदू मुस्लिम दरी वाढवण्याचा जाणीवपूर्वक प्रयत्न केला. पण, दहशतवाद्यांचा तो कट देशवासियांनी उधळून लावला. भारतातील हिंदू-मुस्लिम ऐक्याचं नवं उदाहरण या हल्ल्यानंतर पाहायला मिळालं. भारतातील मस्जिद आणि मुस्लिमांकडून ठिकठिकाणी पाकिस्तानचा निषेध करण्यात आला. तर, आता सैन्य दलातील पाकिस्तानशी लढताना मोहम्मद इम्तियाज शहीद झाले आहेत. मोहम्मद यांनी भारत मातेच्या रक्षणासाठी बलिदान दिलं.
बीएएसएफ जम्मूकडून श्रद्धांजली
जम्मू सीमा सुरक्षा दलाच्या अधिकृत ट्विटर हँलडवरुन यासंदर्भात माहिती देण्यात आली आहे. "आम्ही 10 मे 2025 रोजी आर एस पुरा क्षेत्रातील, जिल्हा जम्मू येथे अंतराष्ट्रीय सीमारेषेवर क्रॉस बॉर्डर फायरिंगमध्ये बीएसएफचे बहादुर सब इंस्पेक्टर मोहम्मद इम्तियाज यांना वीरगती प्राप्त झाली. देशसेवेच्या रक्षणात मोहम्मद इम्तियाज यांनी सर्वोच्च बलिदान दिलं असून त्यांच्या शौर्याला सलाम! असे सुरक्षा दलाच्या अधिकृत ट्वटिर अकाऊंटवरुन सांगण्यात आले आहे.
शस्त्रसंधीनंतर काही तासांतच शस्त्रसंधीचं उल्लंघन
कुत्र्याचं शेपूट वाकडं ते वाकडं म्हणतात तीच गत पाकिस्तानच्या (Pakistan) बाबतीत आहे का, असा प्रश्न आता पु्न्हा उद्भवला आहे. कारण, आज सायंकाळी 5.00 वाजल्यापासून भारत आणि पाकिस्तान यांच्यातील युद्धजन्य कारवाईला विराम देण्यात आल्याची घोषणा भारताच्या परराष्ट्र सचिवांनी केली. त्यासाठी, पाकिस्तानच्या संरक्षण विभागातील महासंचालकांचा फोन आला होता, ही माहिती देखील त्यांनी दिली. त्यामुळे, आता युद्धविराम झाला असून सीमारेषेवरील तणाव निवळेल अशी अपेक्षा भारतासह जगभरातील राष्ट्रांना होती. मात्र, 5 वाजता युद्धविरामाची (ceasefire) घोषणा झाली आणि सीमारेषेवर पुन्हा पाकिस्तानच्या नापाक कारवायाला सुरुवात झाल्याचं चित्र पाहायला मिळत आहे. हीच का शस्त्रसंधी? असा सवाल जम्मू काश्मीरचे मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला (Omar abdullah) यांनी विचारला आहे. ओमर अब्दुल्ला यांनी एकामागोमाग एक ट्विट करत शस्त्रसंधीवर प्रश्न उपस्थित केले आहेत. त्यामुळे, पाकिस्तानच्या लष्करावर पाकिस्तान सरकारचे नियंत्रण नसल्याचे पुन्हा सिद्ध झाले आहे.



















