(Source: ECI/ABP News/ABP Majha)
Brij Bhushan Sharan Singh: कुस्तीपटूंचे लैंगिक शोषण: बृजभूषण सिंह कोर्टात हजर, 25 हजारांच्या जातमुचलक्यावर दोन दिवसांचा अंतरिम जामीन मंजूर
Brij Bhushan Sharan Singh: भाजपचे खासदार बृजभूषण सिंह यांनी आज दिल्लीच्या राऊस एवेन्यू कोर्टात हजर करण्यात आलं. 25 हजारांच्या जातमुचलक्यावर त्यांना अंतरीम जामीन मंजूर करण्यात आला आहे.
Brij Bhushan Sharan Singh: दिल्लीच्या (Delhi) हाऊस राऊस एवेन्यू कोर्टाने भाजप खासदार बृजभूषण सिंह (BrijBhushan Singh) आणि विनोद तोमर यांनी दोन दिवसांचा अंतरीम जामीन मंजूर केला आहे. महिला कुस्तीपटूंनी (Women Wrestlers) केलेल्या लैंगिक शोषणाच्या आरोपाखाली बृजभूषण सिंह यांनी दिल्लीच्या कोर्टात हजेरी लावली. यावेळी कोर्टाने म्हटलं की, 'गुरुवार (20 जुलै) रोजी दुपारी 12.30 वाजता नियमित जामीन अर्जावर सुनावणी होईल.' तसेच या दोघांना 25 हजारांच्या जातमुचलक्यावर अंतरीम जामीन देण्यात आला आहे. बृजभूषण सिंह यांनी जामीन अर्जासाठी कोर्टात याचिका दाखल केली होती.
बृजभूषण यांच्याविरोधात 1599 पानाचं आरोपपत्र
दिल्ली पोलिसांनी बृजभूषण सिह यांच्या विरोधात 1599 पानांच आरोपपत्र दाखल केलं आहे. या आरोपपत्रामध्ये बृजभूषण सिंह यांच्या विरोधात भारतीय महिला कुस्तीपटूंनी लैंगिक शोषण केल्याचा गंभीर आरोप करण्यात आला आहे. तसेच या आरोपपत्रामध्ये बृजभूषण सिंह यांचा सचिव विनोद तोमर याच्यावरही अनेक आरोप करण्यात आले आहेत. या आरोपपत्रामध्ये एकूण 44 साक्षीदार आहेत आणि जवळपास 108 लोकांचा जबाब नोंदवण्यात आला आहे. तसेच आरोपपत्रामध्ये एकूण 15 लोकांनी महिला कुस्तापटूंच्या बाजूने जबाब नोंदवला आहे.
या कलमांतर्गत बृजभूषण सिंह यांच्यावर आरोप
पोलिसांच्या आरोपपत्रामध्ये बृजभूषण सिंह यांच्या विरोधात लैंगिक शोषणा प्रकरणी भारतीय दंड संहिता कलम 354, 354-A आणि 354- D अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत. तसेच विनोद तोमरच्या विरोधात कलम 109, 354, 354 (A) आणि 506 अंतर्गत आरोप करण्यात आले आहेत.
कलम 354 अंतर्गत आरोपीला पाच वर्षांच्या शिक्षेची तरतुद करण्यात आली आहे. पण यामध्ये आरोपीला जामीनासाठी अर्ज करता येत नाही. तर कलम 354 (A) अंतर्गत आरोपीला एक वर्षाची शिक्षा होते पण यामध्ये आरोपी जामीनासाठी अर्ज दाखल करु शकतो.
बृजभूषण सिंह यांना अटक का नाही?
अनेक विरोधी पक्षांकडून बृजभूषण सिंह यांच्या कारवाईवर प्रश्न उपस्थित करण्यात येत आहेत. तसेच त्यांना अद्याप अटक का कऱण्यात आली नाही असा प्रश्न देखील दिल्ली पोलिसांना विचारण्यात येत आहे. यावर उत्तर देताना दिल्ली पोलिसांनी म्हटलं की, 'बृजभूषण सिंह यांनी नियमांचं पालन केलं आहे आणि त्यांनी चौकशीसाठी देखील सहकार्य केलं आहे.'
दिल्ली पोलीस सध्या फॉरेन्सिक लॅबमध्ये जमा केलेल्या डिजिटल आणि इलेक्ट्रॉनिक उपकरणांच्या अहवालाची वाट पाहत आहेत. मात्र बृजभूषण शरण सिंह हे त्यांच्यावरील आरोप सतत फेटाळत आहेत. तसेच त्यांच्या महिला कुस्तीपटूंकडून खोटे आरोप करण्यात येत असल्याचं देखील त्याचं म्हणणं आहे.