(Source: ECI/ABP News/ABP Majha)
शाहीन बाग आंदोलनाला अनुराग कश्यपची हजेरी; मोदी सरकारचा 'अशिक्षित' असा उल्लेख
राजधानी दिल्लीतील शाहीनबागमध्ये मागील 2 महिन्यांपासून नागरिकता दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व महिला करत आहेत. हे आंदोलन दिल्ली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोठा कळीचा मुद्दा बनलं होतं. काही दिवसांपूर्वी शाहीनबागमध्ये आंदोलनस्थळी गोळीबार करण्यात आला होता.
नवी दिल्ली : सीएए आणि एनआरसीच्या विरोधाचं केंद्र बनलेल्या शाहीन बागमध्ये सुरू असलेल्या आंदोलनाला शुक्रवारी चित्रपट दिग्दर्शक अनुराग कश्यप याने हजेरी लावली. यादरम्यान त्याने नरेंद्र मोदी सरकारवर थेट निशाणा साधला आहे. दोन महिन्यांपासून सुरू असलेल्या या आंदोलनामध्ये सहभागी झालेल्या आंदोलकांना संबोधित करताना अनुराग कश्यप म्हणाला की, 'मला गेल्या बऱ्याच दिवसांपासून शाहीन बागमध्ये येण्याची इच्छा होती. तुम्हा लोकांमुळे खूप हिम्मत मिळते, याच हिमतीमुळे देशात इतरही शाहीन बाग तयार झाले आहेत.'
शाहीन बाग़ की दादियों में जितना प्यार है उतना तो कहीं नहीं देखा। और वहाँ की उम्दा बिरयानी भी खाई । उँगलियाँ तक चाटीं । मज़ा आ गया बस यही कहूँगा कि,शाहीन बाग़ ज़िंदाबाद ।
— Anurag Kashyap (@anuragkashyap72) February 14, 2020
अनुराग कश्यपने म्हटले की, 'मी येथे येऊन स्टेजवर बिर्यानी खाण्याचा विचार करत होतो. मी कोणत्याही राजकीय पक्षाचा नाही. ही लढाई खरच खूप अवघड आहे. धैर्याची लढाई आहे, जी तुम्ही लढत आहात आणि खूप लोक तुम्हाला पाहत आहेत, ते विचार करत आहेत की, तुम्ही सोडून निघून जाणार.'
WATCH: Anurag Kashyap eats the most talked about Biryani at #ShaheenBagh! Biryani unites all! ✨ pic.twitter.com/6Tt3d1zrn6
— Prashant Kumar (@scribe_prashant) February 14, 2020
केंद्र सरकारवर निशाणा साधत अनुराग कश्यप म्हणाला की, 'मी सरकारच्या अनेक गोष्टींशी असहमत आहे. सरकारकडे हृदय नाही, त्यांना प्रेमाची परिभाषाच समजत नाही. फक्त या पद्धतीने आपण लढू शकतो. सरकारला तुम्ही फक्त प्रेम देत रहा, सरकारला फक्त ताकदीला आपल्या हातात ठेवायचं आहे. त्यांनी कोणतीच वचनं पाळली नाहीत. मी त्यांच्यावर विश्वास ठेवत नाही. भारत सीमारेषांनी नाही तर येथील लोकांनी बनतो.'
अमित शहांवर निशाणा साधत अनुराग कश्यप म्हणाला की, 'आपल्या देशाचे गृहमंत्री आपल्याला सुरक्षित वातावरण देऊ शकत नाही, तर त्यांना गृहमंत्री कसं म्हणाव?' अनुराग म्हणाला की, जर कोणताही गैरसमज असेल तर सरकारने शाहीन बागमध्ये यावं आणि त्यांच्याशी बोलावं, जोपर्यंत बोलत नाही तोपर्यंत तोडगा कसा निघणार?'
अनुराग कश्यप म्हणाला की, 'रस्ता बंद नाही, कोणीही येथे ये-जा करू शकतं. लोक मला ट्विटरवर म्हणतात की, गृहमंत्र्यांशी सन्मानाने बोलणं गरजेचं आहे, परंतु त्यांच्यासाठी माझ्या मनात थोडासाही सन्मान नाही. त्यांना कायद्याबाबत माहीतीच नाही, हे सरकार अशिक्षित आहे.'
पाहा व्हिडीओ : शांततापूर्ण आंदोलन करणारे 'देशद्रोही', 'गद्दार' नाहीत : मुंबई उच्च न्यायालय
तर, आम्ही आंदोलन मागे घेऊ
शाहीन बागेतील आंदोलनकर्ता तासीर अहमद म्हणाला की, पंतप्रधान मोदी असो वा गृहमंत्री अमित शहा किंवा इतर कोणी, ते येऊन आमच्याशी बोलू शकतात. जर ते आम्हाला समजावून सांगतील की जे घडत आहे ते घटनेच्या विरोधात नाही तर आम्ही हे आंदोलन मागे घेऊ. तो म्हणाला, की सरकारच्या दाव्यानुसार सीएए 'एखाद्याचे नागरिकत्व देतही नाही आणि घेतही नाही. पण ते देशासाठी कसे उपयुक्त ठरेल हे कोणी सांगत नाही.
चर्चा करण्यास तयार : अमित शाह
केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी नागरिकत्व दुरस्ती कायद्याबद्दल कुणाला शंका असल्यास त्यांनी आम्हाला भेटून त्यावर चर्चा करावी, असं आवाहन केलंय. शाहीनबाग येथील आंदोलकांना सुधारित नागरिकत्व कायद्याबाबत कोणत्याही प्रकारचा संशय असेल तर ते आम्हाला येऊन भेटू शकतात. गृहमंत्रालयाच्या कार्यालयाकडून त्यांना तीन दिवसांच्या आत भेटण्याची वेळ दिली जाईल, असा शब्दही अमित शाह यांनी दिलाय. "ज्या कोणालाही नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल आक्षेप आहे, त्यांनी माझ्या कार्यालयाकडून चर्चेसाठी वेळ घ्यावा. भेटण्याची वेळ घेतल्यानंतर तीन दिवसांच्या आत मी त्यांना भेटेन आणि नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावर चर्चा करेन", असं अमित शाहांनी म्हटलं. यावेळी अमित शाह यांनी एनपीआरवरही आपली भूमिका मांडली. एनपीआरअंतर्गत कोणतेही कागदपत्रे देण्याची आवश्यकता नसल्याचं त्यांनी यावेळी सांगितलं.
दरम्यान, राजधानी दिल्लीतील शाहीनबागमध्ये मागील 2 महिन्यांपासून नागरिकता दुरूस्ती कायद्याविरोधात आंदोलन सुरू आहे. या आंदोलनाचं नेतृत्व महिला करत आहेत. हे आंदोलन दिल्ली विधानसभेच्या पार्श्वभूमीवर मोठा कळीचा मुद्दा बनलं होतं. काही दिवसांपूर्वी शाहीनबागमध्ये आंदोलनस्थळी गोळीबार करण्यात आला होता. आंदोलन सुरू असल्याने बॅरिकेट्स उभारण्यात आले असून तिथेच हा गोळीबार झाला होता. यामुळे परिसरात खळबळ उडाली. मात्र पोलिसांनी वेळीच हस्तक्षेप करत आरोपीला ताब्यात घेतलं होतं.
संबंधित बातम्या :
शाहीनबागेत येऊन गिफ्ट घेऊन जा; आंदोलनकर्त्यांचे मोदींना 'व्हॅलेंटाईन डे'चे आमंत्रण
जामियानंतर शाहीनबागमध्ये सीएए विरोधातील आंदोलनात गोळीबार, हल्लेखोर पोलिसांच्या ताब्यात
नागरिकत्व दुरुस्ती कायद्याबद्दल ज्यांना शंका आहे, त्यांच्याशी चर्चा करण्यास तयार : अमित शाह