Mucormycosis: कोरोनानंतर काळ्या बुरशीचा कहर, 14 राज्यांत साथरोग म्हणून जाहीर; कोणत्या राज्यात किती केसेस?
म्युकरमायकोसिस म्हणजेचं काळ्या बुरशीच्या सर्वाधिक केसेस गुजरातमध्ये आढळल्या आहेत गुजरातमध्ये आतापर्यंत 2281 लोकांना काळ्या बुरशीचा त्रास झाला आहे.
नवी दिल्ली : एकीकडे कोरोनाचं थैमान सुरु असताना आता देशासमोर नवीन संकट उभं राहिलं आहे. कोरोनानंतर आता म्युकरमायकोसिस म्हणजे काळी बुरशी या आजाराने डोकं वर काढलं आहे. म्युकरमायकोसिस या आजाराने गेल्या काही दिवसात हजारो लोकांना बाधा झाली आहे. आतापर्यंत हरियाणा, गुजरात, उत्तर प्रदेश आणि पंजाबसह 14 राज्यांत हा आजार साथीचा रोग जाहीर झाला आहे.
म्युकरमायकोसिसच्या कोणत्या राज्यात किती केसेस?
म्युकरमायकोसिस म्हणजेचं काळ्या बुरशीच्या सर्वाधिक केसेस गुजरातमध्ये आढळल्या आहेत गुजरातमध्ये आतापर्यंत 2281 लोकांना काळ्या बुरशीचा त्रास झाला आहे. याशिवाय महाराष्ट्रात 2000, आंध्र प्रदेशात 910, मध्य प्रदेशात 720, राजस्थानात 700, कर्नाटकात 500, दिल्लीत 197, उत्तर प्रदेशात 124, तेलंगणामध्ये 350, हरियाणामध्ये 250, पश्चिम बंगालमध्ये 6 आणि बिहारमध्ये 56 केसेस समोर आल्या आहेत. पश्चिम बंगालच्या कोलकाता येथील रुग्णालयात उपचार घेत असताना आज एका 32 वर्षीय महिलेचा काळ्या बुरशीमुळे मृत्यू झाला आहे.
Mucormycosis : तुमचा मास्क बनू शकतो का ब्लॅक फंगसचं कारण? एक्सपर्ट काय सांगतात?
म्युकरमायकोसिस या राज्यांमध्ये साथीचा रोग घोषित
कोरोना रूग्णांमध्ये काळ्या बुरशीचे वाढते प्रमाण लक्षात घेत हरियाणा, मध्य प्रदेश, हिमाचल प्रदेश, कर्नाटक, उत्तर प्रदेश, पंजाब, गुजरात, तामिळनाडू, राजस्थान, ओडिशा, बिहार, चंदीगड, उत्तराखंड, तेलंगणासह सुमारे14 राज्यांत या आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित केलं आहे.
Mucormycosis : म्युकरमायकोसिससाठीही आता साथीचे रोग नियंत्रण कायदा लागू
साथीचा रोग घोषित केल्यास मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करावे लागते
राज्यांनी एखाद्या आजाराला साथीचा रोग म्हणून घोषित केले तर त्यानंतर केस, उपचार, औषधोपचार आणि रोगामुळे होणाऱ्या मृत्यूंची नोंद ठेवणे बंधनकारक असते. तसेच, सर्व केसेसची नोंद मुख्य वैद्यकीय अधिकाऱ्यांना करावी लागेल. याशिवाय केंद्र सरकार आणि भारतीय वैद्यकीय संशोधन परिषद अर्थात आयसीएमआरच्या मार्गदर्शक सूचना पाळल्या लागतात.
केंद्राकडून औषधासाठी आणखी 5 कंपन्यांना परवाना
या आजाराच्या वाढत्या केसेस लक्षात घेत केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सांगितलं की, काळ्या बुरशीमुळे उद्भवलेल्या आजाराच्या उपचारात वापरल्या जाणार्या 'अॅम्फोटेरिसिन-बी' या औषध निर्मितीसाठी आणखी पाच कंपन्यांना परवाना देण्यात आला आहे. जुलै महिन्यापासून दरमहा या औषधाच्या 1 लाख 11 हजार कुपींचे उत्पादन सुरू होईल. विविध राज्यांमध्ये म्युकरमायकोसिसच्या वाढत्या रुग्णसंख्येचा सविस्तर आढावा घेतल्यानंतर अॅम्फोटेरिसिन बी औषधाच्या एकूण 23680 अतिरिक्त कुप्या आज सर्व राज्ये/केंद्रशासित प्रदेशांना वितरित करण्यात आल्या आहेत असे केंद्रीय रसायन व खते मंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांनी जाहीर केले आहे.